जिल्ह्यात 6 महिन्यांत 34 सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले

6 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश

0

जिल्ह्यात 6 महिन्यांत 34 सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले

-6 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश

बीड : जिल्ह्यात शासकीय सेवेत कार्यरत असणारे कर्मचारी सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. या महिन्यात ५ सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या काळात एकूण ३४ सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले आहेत. यात ६ पोलिस कर्मचारी व २८ इतर कर्मचारी यांचा समावेश आहे. या घटनांमुळे चोर, माफियांची मुजोरी वाढल्याने यात पोलिसच असुरक्षित असल्याचे दिसत आहे.

आठवडाभरापूर्वीच गेवराईत एका पोलिसांना मारहाण केली गेली होती. त्यानंतर २४ तासांत आणखी दोन ठिकाणी पोलिसांना मारहाण, दगडफेक करण्यात आल्याचा घटना समोर आली. याशिवाय बुधवारी तलवाडा येथील गणेशनगर भागात अवैध वाळू वाहतूक करणाºया ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी तलवाडा ठाण्याचे पोलिस कर्मचारी विठ्ठल चव्हाण हे गेले होते. या वेळी वाळूमाफियासह २५ ते ३० जणांच्या जमावाने त्यांना ट्रॅक्टर घेऊन जाण्यास विरोध केला. यावेळी पोलिस कर्मचारी चव्हाण यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात १२ ते १३ जणांविरोधात गुन्हा नोंदवला.

याशिवाय हिरापूरजवळ महामार्ग पोलिस विभागाचे पोलिस कर्मचारी सचिन जायभाये, संघर्ष गोरे व अन्य काही जण गुरुवारी मध्यरात्री गस्त करत असताना त्यांना एक संशयित जीप आढळून आली. यावेळी त्यांनी जीपचा पाठलाग केला असता जीपचालकाने जीप थांबवून पोलिसांच्या वाहनाच्या दिशेने दगड फेकून पळ काढला. मात्र पोलिसांकडून ही जीप जप्त करण्यात आली आहे. यामुळे नव्या एसपींसमोर धाक निर्माण करण्याचे आव्हान आहे.

एसपी नंदकुमार ठाकूर यांची बदली

बीडचे एसपी नंदकुमार ठाकूर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता अमरावतीच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे एसपी अविनाश बारगळ यांची नियुक्ती झाली आहे. ते लवकरच पदभार घेणार आहेत. त्यामुळे नव्या एसपींसमोर आता जिल्ह्यात कायद्याचा धाक निर्माण करण्याचे आव्हान असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.