मुलांच्या दप्तराचे ओझे कधी कमी होणार?
– ३.५ किलो ते ९ किलोच्या ओझ्याने मुलांना पाठदुखीसह विविध आजार
छत्रपती संभाजीनगर : शहरातील खासगी इंग्रजी शाळा, सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणार असल्याची घोषणा करण्यात आली असली तरी ते कमी झालेले दिसत नाही. शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ मध्ये ओझे कमी करण्यास सांगितले आहे. २०१५ मध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी परिपत्रक काढूनही अंमलबजावणी झाली नाही. यामुळे डीबी स्टारने केलेल्या तपासणीत मुलांच्या दप्तराचे वजन ३.५ किलो ते ९ किलोपर्यंत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे मुलांना पाठदुखीसह विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.
शहरातील मनपाच्या प्रियदर्शिनी शाळेतील इयत्ता पाचवीच्या वगार्तील मुलीच्या दप्तराचे वजन ४.९ किलो, तर चौथीच्या वगार्तील मुलाच्या दप्तराचे वजन ३.९ किलो भरले. फ्रान्सलियन स्कूल आॅफ एक्सलन्स शाळेतील इयत्ता आठवीच्या वगार्तील मुलाचे ६.८ किलो, ब्रिलियंट इंग्लिश स्कूलच्या मुलाच्या दप्तराचे वजन ९.३ किलो होते. शासनाच्या निर्देशानुसार मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याची जबाबदारी शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाची आहे. मात्र शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे मुलांना रोज पाठीवर ओझे घेऊन शाळा गाठावी लागत असल्याने त्यांना पाठदुखीच्या आजाराचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शाळेतील दप्तराच्या ओझ्यामुळे मुले वाकून चालतात. या ओझ्याने मुलांना पाठीचा त्रास व मणक्याचे आजार होण्याची शक्यता आहे. मुलांच्या पुस्तक, वह्यांसाठी शाळेतच स्वतंत्र लॉकर्स पाहिजेत. मात्र शाळा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.
शाळेतील मुलांच्या ओझ्याबात तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार २०१५ मध्ये दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळांना निर्देश दिले होते. याची जबाबदारी मुख्याध्यापक व विश्वस्तांवर टाकल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली होती. मात्र दप्तराचे ओझे कमी करण्यासाठीच्या शिफारशींची अंमलबजावणी झालीच नाही. दप्तराचे वजन मुलांच्या वजनाच्या १० टक्यांपेक्षा अधिक असू नये. मात्र दप्तराचे वजन २० टक्क्यांहून अधिक आहे. पहिलीच्या वर्गातील मुलाचे वजन २० किलो तर आठवीच्या मुलांचे वजन साधारण ४२ किलो असते. त्यानुसार पहिलीचे दप्तर २ तर आठवीचे ४.२ किलोपेक्षा अधिक असू नये, असे तज्ज्ञांच्या समितीने सांगितले.
मुलांच्या दप्तराचे ओझे कशाचे?
मुलांच्या पाठीवर असलेल्या दप्तरात बालभारती भाग-१, भाग-२, गणित भाग-१, भाग-२, उजळणीचे पुस्तक, इंग्रजी, पाटी, कंपास पेटी, चित्रकला वही, रंगपेटी, शब्दकोश, रायटिंग पॅड, गाइड्स, फॅशनेबल वजनदार दप्तर, स्वाध्याय पुस्तिका, शिकवणीचे दप्तर, स्वेटर, रेनकोट, डे केअरचे साहित्य, खेळाचे साहित्य, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली इत्यादी साहित्य असते. या साहित्याचे वजन जवळपास ३ ते ९ किलोपर्यंत असल्याने मुले वाकत चालताना दिसत आहेत. त्यामुळे ओझे कमी करण्यासाठी शाळा प्रशानसाने पावले उचलण्याची मागणी होत आहे.
पाठीच्या आजारापासून सुटका
दप्तराच्या ओझ्यामुळे मुलांच्या खांद्याची ठेवण बदलते. याशिवाय त्यांना पाठदुखी, मणक्याचे आजार होतात. यावर मात करण्यासाठी दररोज ११ सूर्यनमस्कार केल्यास पाठीच्या आजारापासून सुटका मिळेल, असे बाल ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.विशाल चांडक यांनी सांगितले.