लक्ष्मण हाके कोणत्या उद्दिष्टाने व कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहे हेच स्पष्ट नाही – राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांचा वडीगोद्रीतील आंदोलनाला विरोध

ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवण्याची भाषा लक्ष्मण हाके करत असले, तरी ओबीसींचे आरक्षण कसे धोक्यात आले आहे, हे तरी कळले पाहिजे. ओबीसींच्या नावाने केलेल्या या आंदोलनामुळे ओबीसी समाजाची दिशाभूल तर होणार नाही ना? असा प्रश्न तायवाडे यांनी यावेळी उपस्थित केला.

0 170

लक्ष्मण हाके कोणत्या उद्दिष्टाने व कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहे हेच स्पष्ट नाही
– राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांचा वडीगोद्रीतील आंदोलनाला विरोध

जालना : लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावात सुरू करण्यात आलेल्या ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठीच्या आंदोलनाची गरजच नव्हती, अशी टीका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केली आहे. ओबीसींच्या आरक्षणावर संवैधानिक गदा आली आहे अशी कोणतीही परिस्थिती सध्या नाही. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय करताना राज्य सरकारने लिहून दिले होते, की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र ही देणार नाही, त्या आश्वासनावर सरकार आजही ठाम आहे. त्यामुळे लक्ष्मण हाके हे कोणत्या उद्दिष्टाने व कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहे, हेच स्पष्ट नाही, अशी टीका बबनराव तायवाडे यांनी करीत या आंदोलनाला एक प्रकारे आपला विरोध दर्शवला आहे.
डॉ. बबनराव तायवाडे हे रविवार रोती नागपूरमध्ये माध्यमांशी बोतल असताना त्यांनी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाविषयी नापसंती व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये लक्ष्मण हाके यांच्या प्राणांतिक उपोषणाविषयी एकमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी तायवाडे म्हणाले की, ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवण्याची भाषा लक्ष्मण हाके करत असले, तरी ओबीसींचे आरक्षण कसे धोक्यात आले आहे, हे तरी कळले पाहिजे. ओबीसींच्या नावाने केलेल्या या आंदोलनामुळे ओबीसी समाजाची दिशाभूल तर होणार नाही ना? असा प्रश्न तायवाडे यांनी यावेळी उपस्थित केला. हाके यांचा या आंदोलनामुळे ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी ही लक्ष्मण हाके यांनी घेण्याची गरज असल्याचे तायवाडे म्हणाले.
यावेळी डॉ. बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाविषयी भाष्य केले. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला आता एक महिन्यांचा वेळ दिला आहे. मात्र आंदोलन सुरू करण्यापूर्वीच जरांगे यांनी एक महिन्यांचा वेळ दिला असता, तर त्यांनाही आंदोलन करण्याची गरज नव्हती. कारण प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सरकारला वेळ द्यावाच लागते. एखादी मागणी संविधानाच्या चौकटीत, न्यायालयाच्या नियमात बसत नसेल, तर सरकार कोणत्याही पक्षाचा असो ती मागणी पूर्ण करू शकत नाही, असे सूचक वक्तव्य तायवाडे यांनी केले.
जरांगे आणि हाके या दोघांनी संयम ठेवण्याची गरज
मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके दोघांनीही संयम ठेवण्याची गरज आहे. आपल्या कृतीमुळे दोन्ही समाजात संघषार्ची स्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी त्यांनी घ्यावी असा सल्लाही डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.