अर्थसंकल्पात सूडभावनेतून महाराष्ट्राला वगळले

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने

0

अर्थसंकल्पात सूडभावनेतून महाराष्ट्राला वगळले

-जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने

बीड : केंद्राकडून नुकताच मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला ठोस निधी तर नाहीच, पण इतर राज्यांच्या बरोबरीनेही काही देण्यात आले नसून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजप सरकारला कमी जागा मिळाल्यामुळे महाराष्ट्रावर सूडभावनेतून झालेल्या अन्यायाचा निषेध व्यक्त करण्यासाठी बीड येथे बुधवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. यावेळी अर्थसंकल्पात एकच रोष, महाराष्ट्र दोष… महाराष्ट्र दोष! अशा घोषणा देत केंद्र सरकार आणि अर्थसंकल्पाच्या विरोधात निषेध व्यक्त केला.

केंद्र सरकारच्या वतीने संसदेत २०२४-२५ चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. परंतु या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याला काहीच मिळालेले नाही. केवळ महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार केंद्रशासनाने केला आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपला म्हणजेच एनडीए आघाडीला कमी जागा मिळाल्यामुळे त्याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील, अशा प्रकारची भाजपची सूडबुद्धीची घातक प्रवृत्ती या अर्थसंकल्पाच्या निमीत्ताने समोर आली आहे, असे यावेळी आंदोलकांनी म्हटले. जनतेच्या भावना अतिशय तीव्र आहेत. जनतेच्या मनात असलेल्या याच भावना प्रकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष आ. संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली.

अर्थसंकल्पात नेमका महाराष्ट्र कुठे?

महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी आहे. या प्रकारचा अन्याय महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला ठोस निधी तर सोडाच पण इतर राज्यांच्या बरोबरीनेही काही देण्यात आले असते, तरी समाधान वाटले असते. परंतु या अर्थसंकल्पात नेमका महाराष्ट्र कुठे आहे? महाराष्ट्र भारतात येतोच का नाही? असे प्रश्न जनतेला पडलेला आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.