मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयामुळे राजकारणात खळबळ

-७ ऑगस्टपासून आंतरवाली सराटी येथे इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जाणार

0

मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयामुळे राजकारणात खळबळ

-७ ऑगस्टपासून आंतरवाली सराटी येथे इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जाणार

जालना : प्रतिनिधी
राज्य सरकारने आश्वासन देऊनही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न दिल्याने शेवटी मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणाचा मार्ग निवडल्याचे दिसत आहे. यामुळे प्रस्थापित पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. जरांगे पाटील यांनी विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज मागविले असून यामध्ये इच्छुकांना स्वत:च्या परिचयपत्रासह मतदारसंघातील जातीनिहाय मतदारांची माहिती सादर करावी लागणार आहे. यासाठी ७ ऑगस्टपासून आंतरवाली सराटी येथे अर्ज स्वीकारला जाणार आहे. अर्जाच्या छाननीसाठी ११ किंवा २१ सदस्यांची कोअर समिती स्थापन केली जाणार आहे.

या उमेदवार निवड प्रक्रियेत जरांगे उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड करतील, अशी समोर येत आहे. यामुळे अनेक राजकीय पक्षांचे धाबे दणाणल्याची कुजबुज सुरू झाली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सगेसोयरे कायदा लागू करावा तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागण्यांसाठी जरांगे आग्रही आहेत. मात्र राज्य सरकार जाणिपूर्वक या मागण्यांकडे दुर्लक्ष करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत आहे.

सरकारने जे 10 टक्के आरक्षण दिले ते असंविधानिक असल्याने जरांगेंना ते मान्य नाही. त्यामुळे त्यांनी ओबीसीतूनच आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. मात्र सरकार आणि विरोधक या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे जरांगेंच्या लक्षात येत असल्याने त्यांनी विधानसभेसाठी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी इच्छुकांना ७ ऑगस्टपासून जरांगे यांच्या कोअर कमिटीकडे परिचयपत्र आणि मतदारसंघांचा जातीनिहाय आढावा सादर करावा लागणार आहे. मतदारसंघात उमेदवार कशा पद्धतीने प्रचार करणार, याचीही माहिती घेतली जाणार आहे.

मी माझे आयुष्य समाजासाठी दान केले आहे, मग शरीर का राहू द्यायचे? असा सवाल करत जरांगेंनी १ ऑगस्ट या आपल्या वाढदिवशीच देहदानाचा संकल्प केला. फक्त माझे तळहात आणि पाय माज्या कुटुंबाला द्यावेत, असे सांगत मराठा समाजातील तरुणांनी सातारा, कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना मदत करावी, असेही आवाहन त्यांनी केले. ते ७ ऑगस्टपासून सोलापूर येथून राज्याचा दौरा सुरू करत आहेत. शांतता रॅलीसाठी मराठा समाज एकत्र येणार आहे. यावेळी ते म्हणाले की, सरकारशी खेटायला मी खंबीर आहे. सरकारने आम्हाला वारंवार गुंतवण्याचा प्रयत्न केला. मात्र मी मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सरकारने पोरांचे वाटोळे केले

आंतरवाली सराटी येथे गुरुवारी मनोज जरांगे पाटीलच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर झाले. त्यावेळी ते म्हणाले की, सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द केल्याने पोरांचे वाटोळे झाले. त्यामुळे ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि १० टक्केचे आरक्षण सुरु ठेवावे. मी जे बोलतो ते करतो. आता मी गरीब मराठे, मुस्लिम, दलित, धनगर, माळी यांना मुख्यमंत्री करणारच असा विश्वास दिला.

उमेदवारीसाठी अटी

विधानसभेत मराठा आरक्षणाच्या बाजूने ठाम भूमिका मांडली पाहिजे. उमेदवार हा निर्व्यसनी व चळवळीत सक्रिय असावा लागणार आहे. त्याला जनतेच्या प्रश्नांची सखोल माहिती असावी लागणार आहे. त्यासोबतच त्याला तालुक्याच्या प्रश्नांची जाण असणे आवश्यक आहे. त्याने मतदारसंघातील जातीनिहाय मतदार संख्या आणि त्याची यादी सादर करावी लागणार आहे.

माझ्या तोंडात फक्त मराठा हेच नाव असेल

सरकार, विरोधी पक्षाने वेदना दिल्या तर त्या सहन करायच्या हे मी ठरवून घेतले आहे. समाजाने माझ्यावर विश्वास टाकला तो मी व्यर्थ जाऊ देणार नाही. माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला, मी रक्ताच्या थारोळ्यात जरी पडलो तरी माझ्या तोंडात फक्त आणि फक्त मराठा हेच नाव असेल, असे म्हणताना जरांगे भावुक झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.