मंत्री अब्दुल सत्तार यांनी जमिन बळकावली? – पत्राद्वारे माहिती

-पठाण कुटुंबाची मुख्यमंत्री शिंदे यांचाकडे पत्राद्वारे माहिती

0

मंत्री अब्दुल सत्तार यांनी जमिन बळकावली

-पठाण कुटुंबाची मुख्यमंत्री शिंदे यांचाकडे पत्राद्वारे माहिती

छत्रपती संभाजीनगर : शिंदे सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सत्तार यांनी आपली जमिन बळकावली आहे. त्या ठिकाणीच शुक्रवारी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होत असून, या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी येऊ नये, अशी मागणी सिल्लोडमधील पठाण कुटुंबाने एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली असून, सदर योजनेतील लाभार्थी महिलांसाठी कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड शहरात उद्या भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. परंतु मुख्यमंत्री यांचा सिल्लोड दौरा व कार्यक्रम रद्द करण्यात यावा, अशी मागणी सिल्लोड येथील पठाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

यावेळी पठाण परिवाराचा आरोप आहे की, मंत्री अब्दुल सत्तार सदर कार्यक्रम ज्या ठिकाणी घेत आहेत ती जमीन आमची वडिलोपार्जित आहे. सदर सर्वे नंबर ३७७ जमिनीचा वाद सध्या न्यायालयात असून न्यायप्रविष्ठ आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी बळजबरी घुसखोरी करून जागेवर ताबा मिळवला/जमिन बळकावली आहे. अशा बळजबरी ताब्यात घेतलेल्या बेकायदेशीर जागेत मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री यांनी येऊ नये, कारण हा त्यांच्या पदाचा अपमान आहे, असे पठाण कुटुंबियांनी म्हटले आहे.

पठाण कुटुंब म्हणाले की, सदर जमिनीवर सन २०२१ साली मोठ्या प्रमाणावर वादविवाद झाल्यानंतर पोलिसप्रशासनाने पठाण परिवारास समजपत्र दिले होते. सदर जागेवर भांडण तंटे न करता न्यायालयातून आदेश प्राप्त करण्याबाबत पोलिसांनी सूचना केली होती. पठाण यांच्या सांगण्यानुसार त्यांनी सिल्लोड दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला असून, महसूल विभागाकडे सुद्धा अर्ज दाखल केलेले आहेत. त्यानुसार तत्कालीन तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या बाजूने कायदेशीर निर्णय पारित केला आहे. परंतु निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याकारणाने मा. उच्च न्यायालय येथे सध्या अधिकाºयांच्या विरोधात अवमान याचिका प्रलंबित आहे. निर्णयाची अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी करू नये यासाठी मंत्री अब्दुल सत्तार सातत्याने अधिकाºयांवर दबाव टाकत आहेत. त्यामुळे आम्हाला न्याय मिळण्यास विलंब होत आहे, असा गंभीर आरोप पठाण परिवाराने केला आहे.

पठाण परिवाराकडून मेलद्वारे निवेदन

मंत्री अब्दुल सत्तार यांनी जमिन बळकावली असल्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस प्रशासन, नगर विकास विभाग, महसूल विभाग यांच्याकडे पठाण परिवाराने हे निवेदन ई-मेल द्वारे पाठवले आहे. पोलिस प्रशासन याबाबत काय निर्णय घेईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंत्री सत्तार यांची कोंडी

लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम जिथे होतो आहे, त्या जागेवर केलेले सर्व बांधकाम, विकासकाम नियमबाह्य बेकायदेशीर आहे. हा कार्यक्रम घेण्यासाठी कोणतीही कायदेशीर परवानगी घेतली नाही, आरोप पठाण कुटुंबाने केला आहे. यामुळे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची कोंडी झाल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.