नितेश राणेंच्या झटका मटनाला जेजुरी संस्थानकडून झटका
मल्हार नाव वापरू नये; देवस्थानची मागणी
पुणे : राज्याचे मत्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे हे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यात आता त्यांनी मांस विक्रेत्यांना मल्हार झटका सर्टिफिकेट दिलं जाणार अशी घोषणा केल्याने याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. कारण हलाल सर्टिफिकेटच्या धरतीवर हिंदू मांस विक्रेत्यांसाठी मल्हार सर्टिफिकेट दिलं जाणार असल्याने या घोषणेवर जेजुरी संस्थानने आक्षेप घेत मल्हार हे नाव देऊ नये, मागणी केली आहे. तर दुसरीकडे श्यामाप्रसाद मुखर्जी व दिनदयाळ उपाध्याय यांचे नाव वापरून झटका मटन विक्री करावे असा खोचक टोलाही सोशल मीडियावर अनेकांकडून लगावला जात असल्याचे पहायला मिळत आहे.
मंत्री नितेश राणे यांनी मटण विक्रेत्यांसाठी मल्हार झटका सर्टिफिकेट आणलं. त्यासाठी या विक्रेत्यांना मल्हार सर्टिफिकेट देणार असल्याची नुकतीच घोषणा केली होती. पण आता मात्र याला जेजुरी ट्रस्टने विरोध दर्शवला असून मटणाच्या वेबसाइटला हिंदु देवाचं नाव नको, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राणेंच्या झटका मटनाला जेजुरी देवस्थानने झटका दिल्याचं बोललं जातं आहे.
मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या घोषणेमुळे राज्यातील हिंदू मांस विक्रेत्यांसाठी मल्हार सर्टिफिकेट मिळणार असं बोललं जातं असतानाच या सर्टीफिकेट मधील मल्हार या नावाला जेजुरी संस्थानकडून विरोध केला जात आहे. राणेंनी केलेल्या घोषणेप्रमाणे मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून केवळ हिंदू समाजातील मांस विक्रेत्यांना हे सर्टिफिकेट दिले जाणार आहे. यावेळी त्यांनी मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मांस खरेदी करू नका, असे आवाहन केल्याने विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी त्याला विरोध केला आहे. देवस्थानने मल्हार हे नाव वापरण्यास असहमती दर्शविल्याप्रमाणे सोशल मीडियावर दिनदयाळ उपाध्याय अथवा मुखर्जी झटका मटन हे नाव देण्यात यावे असा खोचक टोलाही काही यूजर्सकडून लगावला जात असल्याचे दिसत आहे.