1 एप्रिल 2025 पासून कारमध्ये रिअर सीट बेल्ट अलार्म लावणे अनिवार्य
केंद्रीय मोटार वाहन नियमात बदल
नवी दिल्ली : सरकारने रस्ते सुरक्षेशी संबंधित या नियमाची अधिसूचना कंपन्यांना जारी केली आहे. यामध्ये ऑटो निर्मात्यांना सर्व कारच्या मागील सीटमध्ये सीट बेल्ट रिमाइंडर प्रदान करावे लागणार आहे. येणाऱ्या १ एप्रिल २०२५ पासून देशात विकल्या जाणाऱ्या सर्व कारमध्ये रिअर सीट बेल्ट अलार्म लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या वर्षी मार्चमध्ये मसुदा जारी केला होता आणि नवीन नियमाबाबत सर्वसामान्यांकडून मते मागविण्यात आली होती. त्यावर सरकारने रस्ते सुरक्षेशी संबंधित या नियमाची अधिसूचना कंपन्यांना जारी केली आहे. येणाऱ्या १ एप्रिल २०२६ पासून बसेसमध्ये सीट बेल्ट बसवणे आवश्यक असणार आहे. रिअर सीट बेल्ट अलार्म हा नियम १ एप्रिल २०२५ नंतर उत्पादित झालेल्या सर्व प्रवासी कारसाठी लागू होणार आहे.
आता केंद्रीय मोटार वाहन नियमात बदल करण्यात येणार आहेत. या अंतर्गत सीट बेल्ट, रेस्ट्रेंट सिस्टीम आणि सीट बेल्ट रिमाइंडरचा वापर करावा लागणार आहे. त्याच वेळी १ एप्रिल २०२६ पासून, बसेस आणि इतर अवजड वाहनांमध्ये सुरक्षा सीट बेल्ट जोडण्याचा नियम देखील लागू केला जाईल, असे सांगितले जात आहे.
सीट बेल्टमुळे अपघातात जखमी होण्यापासून प्रवाशांचे रक्षण होते. याशिवाय या सीट बेल्ट हे सेफ्टी फीचर कारमध्ये बसलेल्या प्रवाशाला सीट बेल्ट घालण्यासाठी बीपिंग आवाजाने अलर्ट करते आणि जोपर्यंत प्रवाशाने सीट बेल्ट लावला नाही तोपर्यंत हा आवाज थांबत नाही. यामुळे अपघातादरम्यान प्रवाशाला इजा होण्यापासून संरक्षण मिळते. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर मंत्रालयाने कारमध्ये तीन सुरक्षा वैशिष्ट्ये अनिवार्य करण्यासाठी मसुदा अधिसूचना जारी केली होती. यामध्ये कारमध्ये कंपनीने बसवलेला सीट बेल्ट, सीट बेल्ट अलार्म आणि ६ एअरबॅग्ज देण्याचा प्रस्ताव होता. यामध्ये ६ एअरबॅगचा प्रस्ताव प्रत्यक्षात आला नाही आणि अखेरीस संपूर्ण अधिसूचना रद्द करण्यात आली.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड
बहुतेक लोक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ट्रॅफिक पोलिसही काही प्रवाशांकडून सीट बेल्ट न लावल्याबद्दल दंड आकारतात. सध्या इन-बिल्ट सीट बेल्ट रिमाइंडर ड्रायव्हर आणि पुढच्या सीटच्या प्रवाशांसाठी अनिवार्य आहे. सीट बेल्ट न लावणाऱ्या मागील सीटच्या प्रवाशांना केंद्रीय मोटार वाहन नियमाच्या नियम १३८ (३) अंतर्गत रूपये १,००० एवढा दंड आकारला जातो.