ज्योतिषी बाबाविरुद्ध भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

बाबाने वेगवेगळी कारणे सांगून थोडे-थोडे करून तब्बल दोन लाख रुपये उकळले. त्यानंतर बारा बकऱ्यांचा बळी द्यावा लागेल, असे सांगून आणखी एक लाख रुपयांची मागणी केली. फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच सुधांशूने भोईवाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली.

0 65

ज्योतिषी बाबाविरुद्ध भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

 

मुंबई : चांगल्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाकडून भोंदूबाबाने तीन दिवसांत सर्व समस्या दूर करतो सांगून, दोन लाख रुपये उकळले. तर प्रेयसीकडून लग्नासाठी होकार मिळावा, म्हणून मृतदेहाची व्यवस्था कर. ते जमत नसल्यास बारा बकऱ्यांचा बळी दे, असे सांगितले. या अजब मागणीने चक्रावलेल्या त्या तरुणाने बाबाविरुद्ध भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

परळ परिसरात राहणारा सुधांशू (बदललेले नाव) हा व्यायामशाळेत ट्रेनर म्हणून काम करत होता. यातून मिळणाऱ्या पैशावर उदरनिर्वाह होत नसल्याने तो नोकरीच्या शोधात होता. इन्स्टाग्रामवरील संदेश पाहत असताना त्याला एका ज्योतिषी बाबाची जाहिरात दिसली. या जाहिरातीमधील क्रमांकावर संपर्क केल्यावर बाबाने त्याला १०१ रुपये पाठवून नोंदणी करण्यास सांगितले. त्यानंतर या बाबाने तरुणाच्या भूतकाळाबाबत काही माहिती दिली. काही गोष्टी खऱ्या वाटल्याने सुधांशूचा बाबावर विश्वास बसला. नोकरी आणि प्रेयसीचा होकार मिळवण्यासाठी बाबा जे सांगेल ते करायला तयार झाला.

पूजा, शांती तसेच अन्य विधी करण्याच्या बहाण्याने बाबाने सुधांशू याच्याकडून थोडे-थोडे पैसे घेण्यास सुरुवात केली. लग्नाला होकार मिळत नसल्याने बाबाने त्याला प्रेयसीसोबत न बोलण्याची अट घातली. प्रेयसी वारंवार फोन करीत होती मात्र सुधांशूने तिचा फोन घेतला नाही. बाबाच्या जादूटोण्याने काहीच फरक पडत नसल्याने त्याने एक फोन उचलला मात्र प्रेयसीच्या आवाजात अन्य कुणीतरी बोलत असल्याचे त्याला जाणवले. सुशांधूने बाबाला फोन करून तसे कळवले. त्यावेळी प्रेयसीला कुणीतरी करणी करून बांधले असून तिला यातून मुक्त करण्यासाठी एका मृतदेहाची व्यवस्था करावी लागेल, असे बाबाने सुधांशूला सांगितले. तसे करण्यास सुधांशूने नकार देताच बाबाने एक लाख रुपयाची मागणी केली. सुधांशू पैसे देण्यास तयार नव्हता. मात्र बाबाने वेगवेगळी कारणे सांगून थोडे-थोडे करून तब्बल दोन लाख रुपये उकळले. त्यानंतर बारा बकऱ्यांचा बळी द्यावा लागेल, असे सांगून आणखी एक लाख रुपयांची मागणी केली. फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच सुधांशूने भोईवाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.