जातीय अहंकार कुरवाळून मिरवत बसविणे म्हणजे पेशवाईचा ‘मेंदू’ घेवून वावरणे

0 138

जातीय अहंकार कुरवाळून मिरवत बसविणे म्हणजे पेशवाईचा ‘मेंदू’ घेवून वावरणे

 

गणेश मोहिते

 

आम्ही जन्मतः मोहिते पाटील आडनाव धारण करुनच जन्मलो होतो.मराठ्यांत काहीच आडनावे अशी आहेत की जिथे पुढे ‘पाटील’ आपसूकच लागते..त्यात आपला पराक्रम काहीच नसतो.इतिहासातील पूर्वजांची कर्तृत्व आणि पराक्रम यामुळे मिळालेली ‘पाटीलकी’ इतकाच तो काय सबंध.शिक्षण पूर्ण होईपर्यंत ‘पाटील’ लावण्याची मला ही प्रचंड भूक होती.पण जसे जसे वाचत गेलो,अनुभवत गेलो..प्रागतिक विचारांकडे आकर्षित झालो.तसे ‘पाटील’ लिहिणे,बोलणे बाद केले.वर्ण,वंश,जातीय अहंगंड ध्वनित करणाऱ्या गोष्टी माणूसपणापासून दूर सरंजामी वृत्तीकडे घेवून जातात.आपले ‘पाटील’पण संपवत गेले पाहिजे याची जाणीव प्रकर्षांने झाली.आणि सहेतुक तो शब्द प्रयोग टाळत आलो.
मूलतः पाटीलकी,देशमुखी या महसुली प्रशासकीय व्यवस्थेतील त्याकाळातील सोयी होत्या. ‘पाटीलकी’ची सनद असेल तर गाव आणि गावाचा परिसर हा महसुली दृष्ट्या त्याच्या अधिपत्याखाली असायचा.तर ‘देशमुखी’ ची सनद असणाऱ्याकडे एक ‘परगणा’ किंवा पंचक्रोशी वगैरे असा महसुली भाग वसुलीसाठी असायचा.राज्याच्या तिजोरीत ‘महसूल’ वसूल करून जमा करण्याचे मोजमाप ठरलेले असायचे.मात्र त्यापेक्षा अधिकचा ‘महसूल’ लूटमार करून शोषाणाधारित व्यवस्था या दोन्ही ‘मुलकी’ पदांनी गावगाड्यात निर्माण केली होती.गोरगरीबांच्या जमिनी ओरबडल्या आणि आपल्या ‘गढ्या’ आणि साम्राज्य उभे केले.हा पाया जसा शोषणाचा होता.तशी दुसरी बाजू उदारमतवाद,किंवा पालकत्वाची जबाबदारी देखील प्रसंगी तो घेत होता.हे महत्त्वपूर्ण म्हणून जनता स्वीकारत गेली. गंमत अशी की हा अधिकार एका वेळी एका कुटुंबाकडे होता.तो पाटील किवा देशमुख.पण कालांतराने संबधित भावकीच स्वतःला पाटील,देशमुख समजू लागली. बरं यात देखील पुढे श्रेष्ठ-कनिष्ठत्व आले.हा शुद्ध दांभिकपणा होता..
उदाहरणार्थ मोहितेंच्या विविध घराण्याकडे जशी ‘पाटीलकी’ होती तशी ‘देशमुखी’ देखील होती.
मुद्दा इतकाच की ही पदे राज्यव्यवस्थेतील मुलकी प्रशासकीय यंत्रणेचा भाग होती.जातीय वर्चस्वाचा नाही.मात्र बेटी व्यवहार करताना आज देखील अर्थकारणातील सममूल्यता लक्षात घेतली जाते तसेच प्रत्येक काळात होते..वर्ण,वंश,जातीय श्रेष्ठत्व यापेक्षा कोणत्याही काळात ‘सांपत्तिक’ शक्तीच वरचढ ठरली आहे.फक्त त्याकाळात अठरापगड जातीस आपली सांपत्तिक स्थिती सुधारण्यास वाव कमी होता.किंवा तशी मोकळीक नव्हती.म्हणून पाटील,देशमुख ही बहुसंख्याक घराणे हे मराठ्यांत आहेत.अपवादभूत इतर जातीत देखील आहेत.

तर सांगायचा मुद्दा की पाटील,देशमुख हे संविधानाची अंमलबजावणी झाली तसे बाद झालेले ‘मुलकी’ पदे आहेत…त्यास उगी जातीय अहंकार कुरवाळून मिरवत बसविणे म्हणजे २१व्या शतकात १७ व्या शतकातील पेशवाईचा ‘मेंदू’ घेवून वावरणे असे आहे…
गौतमी पाटीलने काय आडनाव वापरावे हा तिचा प्रश्न आहे.मात्र सार्वजनिक ठिकाणी तिने कसा ‘नाच’ करावा याविषयी मतमतांतरे होवू शकतात..’पाटील’ लावले म्हणून नाही.

गणेश मोहिते यांच्या फेसबुक वाॅलवरून

Leave A Reply

Your email address will not be published.