मासिक पाळी असताना देवळात जावसं वाटतं ? जा! नाही जावसं वाटत ? नको जाऊ ! अभिनेत्री हेमांगी कवी

0 325

मासिक पाळी असताना देवळात जावसं वाटतं ? जा! नाही जावसं वाटत ? नको जाऊ ! अभिनेत्री हेमांगी कवी

मुंबई : अभिनेत्री हेमांगी कवी ही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. या अभिनेत्रीने इन्स्टाग्राम तसेच फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्ट नेहमी चर्चेत येतात. आताच तिने मासिक पाळी संदर्भात एक लेख शेअर करून तीने आपल मत व्यक्त केले आहे. या पोस्टमध्ये मासिक पाळीदरम्यान महिलांना देवळात जाण्यास बंदी आणि विज्ञान याचा संबंध अधोरेखित केला आहे. तीने पोस्ट शेअर करताना दिलेले ही खुप महत्त्वाचं आहे. मासिक पाळी असताना देवळात जावंसं वाटतं जा! नाही वाटत ? नका जाऊ ! पण मग या सगळ्यात विज्ञानाची माती करू नका !’ अभिनेत्रीने मैत्रियी बांदेकर या फेसबुक युजरच्या प्रोफाइवरील एक पोस्ट शेअर करताना असे कॅप्शन दिले आहे.

“आत्ता थोड्याच वेळापूर्वी एक व्हिडिओ बघितला, इन्स्टाग्रामवर मैत्रिणीने पाठवलेला. स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळी देवळात का जाऊ नये याची ‘वैज्ञानिक कारणं’ सांगणारा. का तर म्हणे आपल्या शरिरात सात का नऊ वायू असतात, पैकी मासिक पाळी वेळी अशुद्ध रक्त (इथेच आधी हाणलं पाहिजे लोकांना!) खाली ढकलणारा प्रसूती वायू कार्यरत असतो. देवळात वरच्या दिशेने जाणारे वायू असतात आणि ते एकमेकांना अडथळा करतात मग तुम्हाला शारीरिक त्रास होऊ शकतो! हद होती है यार!
तुम्हाला देवळात नसेल जायचं तर नका जाऊ, कोण हाताला धरून ओढून नेत नाहीत, पण या सगळ्याला किमान वैज्ञानिक तरी म्हणू नका ना! बरं याला जवळपास १ मिलियन लाइक्स! आणखी अलार्मिंग गोष्ट अशी की यात आपल्या ओळखीत लाइक कोणी केलंय हे तपासलं तर रील पाठवणारीसोबत अजून बऱ्याच जणी होत्या, सगळ्या मुलीच! एक आत्ता विज्ञान शाखेतून बारावी पास झालेली विद्यार्थिनी, एक मायक्रोबायोलॉजीमध्ये मास्टर्स केलेली मैत्रीण, एक बायोटेकच्या फिल्डमध्ये रिसर्च करणारी सीनियर आणि एक तर चक्क डॉक्टर! आता तर बोलणंच खुंटलं ना! अजून किती दिवस आपण आपल्या परंपरागत कुरवाळलेल्या अंधश्रद्धा वैज्ञानिक म्हणून रेटणार आहोत ?
बरं माझं असंही म्हणणं नाही की लोकांनी एका अमूक विचारसरणीला फॉलो करावं! तुम्हाला जे फॉलो करावंसं वाटतं ते करा, मासिक पाळी असताना देवळात जावसं वाटतं? जा! नाही जावसं वाटत? नको जाऊ! पण या सगळ्यात विज्ञानाची माती करू नका ना किमान! तुम्हाला परंपरागत आलेलं जोखडच आता प्रिय आणि योग्य वाटतंय तर हरकत नाही, ते वागवा, मिरवा; जसं नव्वद टक्के लोक करतातच! त्यात विज्ञानाचं व्हॅलिडेशन कशाला हवं? समाजाचं आहे की! “याच्यामागे कोणतंही लॉजिक नाही पण मी लहानपणी पासून हेच शिकत आले आणि आता इतक्या वर्षांनी मला ही सवय सोडवणार नाही” हे मान्य करुन पुढे जाताच येतं की! त्याकरता प्रत्येक अतर्क्य गोष्टीशी विज्ञानाचा बादरायण संबंध लावायची काहीही गरज नाही आणि त्यातून काही सिद्धही होत नाही!

कधी कधी खूप छान वाटतं की आपल्याला मुलांना बायोलॉजी शिकवायची संधी मिळतेय, त्यांना ह्युमन रीप्रोडक्श, मेनस्टुअल सायकलच्या मागचं विज्ञान शिकवता येतंय. किमान या ऐकणाऱ्या चाळीसांपैकी दहा जण तरी पुढे आयुष्यभर या गैरसमजुतींपासून फटकून राहतील याचं दरवर्षी मनोमन एक समाधान असतं. मग कधीतरी हा गैरसमजुतींनी व्यापलेला विशाल समुद्र दूरवर पसरलेला दिसतो! आता फक्त खिन्न वाटतंय, यातून कुणीच वाचणार नाही. विज्ञानही कधीतरी यातच बुडून संपणार आहे! पण मनोमन एक खात्री आहे , स्वतःला दिलेलं वचन आहे, अगदी शेवटापर्यंत. या लोकांनी विज्ञानाला पुन्हा मंत्रतंत्राच्या जाळ्यात लोटून पार नाहीसं करेपर्यंतही म्हणू हवं तर, पण मी मात्र विज्ञानाच्या बाजूनेच राहणार आहे!”
मैत्रियी बांदेकर यांच्या फेसबुक वॉलवरील पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने त्यांच्या मताशी सहमती दर्शवली. शिवाय तिच्या या पोस्टवर कमेंट करणाऱ्यांनाही तिने अचूक रिप्लाय दिला आहे. एकाने उपहासात्मक कमेंट करत लिहिलं की, ‘आपल्याला मागे जायचय, थेट अश्म युगात, मेंदू बाजुला काढला जातोय, धर्माच्या नावावर सरसकट स्वीकारल्या जातायत या विचारसरणी’. यावर अभिनेत्रीने असे उत्तर दिले की, ‘बायका यात अग्रेसर आहेत! याचं राहून राहून आश्चर्य वाटतंय!’ अन्य एकाने लिहिलं की, ‘मला हे माझ्या बायकोला सुद्धा समजावता आलेले नाहीये अजूनपर्यंत, ती कॉलेजमध्ये लाइफ सायन्सची प्राध्यापिका आहे.’ त्यावर हेमांगी म्हणते की, ‘म्हणजे हे किती खोलवर रूजलंय!’

Leave A Reply

Your email address will not be published.