रमाईला वाचुन रडायचे नाही लढायचे….

0 133

रमाईला वाचुन रडायचे नाही लढायचे….

 

विनोद पंजाबराव सदावर्ते
समाज एकता अभियान
रा. आरेगांव ता. मेहकर
मोबा: ९१३०९७९३००

 

रमाई अर्थात संघर्ष व त्याचे प्रतीक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनातील सर्वात मोठा आधार म्हणजे रमाई. रमाई हे नाव नाही तर संघर्ष आणि त्यागातून जनकल्याण कसे साधता येते याची व्यवस्था म्हणजे रमाई होय. काबाड कष्ट करून, कुटूंबाची जबाबदारी स्विकारून कुटुंबाच्या सुखासाठी झटत राहणे. कुटुंबातील अनेक सदस्यांचे मृत्यू स्वतः च्या डोळ्यांनी बघणे, आणि नवरा काही तरी चांगले काम करतोय, त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नाही म्हणून स्वतः ची मुले स्वतः च्या हाताने मातीत गाडून करोडो मुलांचे जिवन उज्वल करणारी रमाईचे मन असेल तरी केवढे याचा विचारही करू शकत नाही. जगातील सर्वात विद्वान व्यक्तीची बायको, आमदार, बँरिस्टर यांची बायको, ज्यांना भेटायला राजर्षी शाहु महाराज चाळीत भेटायला येतात अशा गुणवान व्यक्तीची बायको, निरक्षर होती पण अशिक्षित नव्हती. विषमतेचे चटके हा समाज सहन करतोय, आणि यातून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेब शिकत आहेत, मेहनत घेत आहेत म्हणून रमाईने स्वत:च्या इच्छा मारल्या, गौऱ्या थापून घर चालविले, त्यातून उरलेल्या पैसे बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामी येतील म्हणून जपुन ठेवून बाबासाहेब आंबेडकर यांना दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पैसे कमावायला लागल्या नंतरही कोणताही हट्ट न करता बाबासाहेब आंबेडकर यांना बळ देण्याचे काम रमाईने केले. समाईचा एकुणच संघर्ष, त्याग आणि समजूतदार पणा बघुन आजही आपल्या डोळ्यात पाणी येते. आयुष्य भर अत्यंत आर्थिक गरीबीमध्ये जिवन जगणाऱ्या रमाईच्या मनाची श्रीमंती आपण कोणत्याही मापात मोजली जाऊ शकत नाही. म्हणून स्वतः च्या अंगावर साधे लुगडे, गळ्यात काळा मनी यातच जिवन काढलेल्या रमाई मुळे करोडो महिलांच्या अंगावर हजारो रुपयांची साडी आणि आणि सोन्याच्या ताईत रमाई बसली हे केवळ आणि केवळ रमाईचा त्याग, संघर्ष व बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याप्रती असलेला विश्वास. वरिल सर्व गोष्टी सर्वांना माहिती आहेत. रमाईचा त्याग, त्यांनी कसे जिवन जगले, बाबासाहेब यांच्या पाठीशी कशा उभ्या राहील्या, बाबासाहेब आंबेडकर यांच्या आधार कशा झाल्या, आणि रमाईने जर बाबासाहेब आंबेडकर यांना थोडे जरी अडवले असते तर कदाचित बाबासाहेब आंबेडकर यांनी ठरलेले ध्येय पुर्ण झाले नसते. यातून आपल्या लक्षात येते कि रमाई अडाणी असली तरीही तिच्या ऐवढे जाणकार,. सुशिक्षित व समजदार आज कोणी असेल? हा खुप मोठा प्रश्न आहे. रमाईचा संघर्ष व त्याग बघुन रडू येते हे साहजिकच आहे. परंतु फक्त रडल्याने रमाईला आपण मानतो किंवा रमाई समजली असे मुळीच नाही. रमाईने संघर्ष व त्याग कशासाठी केला तर देशातील करोडो लोकांना समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय मिळावा, माणसिक गुलामी तोडून प्रत्येकाला मान सन्मान स्वाभिमान मिळून माणसाला माणसाची वागणूक मिळावी. विषमेतेची व अस्पृश्यतेची व्यवस्था नष्ट करून समता प्रस्थापित होऊन प्रत्येकाला आदर्श जगण्याचा अधिकार मिळावा आणि करोडो लोकांच्या उद्धाराचे द्वार उघडून तेथे प्रत्येकाला जाण्याची संधी मिळावी म्हणून रमाईने संघर्ष केला, त्याग केला. परंतु मुख्य मुद्दा हा आहे की, रमाईच्या त्याग,.संघर्षाच्या मुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही निर्माण करून ठेवले. सोन्याचे दिवस आपल्याला मिळाले, हक्क अधिकार मिळाले ते आज संरक्षित आहेत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहून दिली आणि घटना कोणीच बदलु शकत नाही असे जर वाटत असेल तर आपण गुलामीगीरीमध्ये फसलो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. चार मुल त्यागुन, स्वतः उपाशी राहुन, स्वतः च्या पगारातील पैसा लोकांच्या हितासाठी खर्च करून उभी केलेली व्यवस्थेला सुरूंग लागत आहे. रमाई अडाणी असताना समतावादी व्यवस्था निर्माण करायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वोतोपरी सहकार्य केले. त्याचमुळे बाबासाहेब आंबेडकर हि एवढी मोठी व्यवस्था निर्माण करून हजारो वर्षापासून चालत आलेली गुलामगिरी व विषमता नष्ट करून हक्क अधिकार बहाल करून माणसाला माणुस बनवले. आणि आज तीच व्यवस्था नष्ट करण्यासाठी शत्रु रांत्रदिवस प्रयत्न करत आहेत. आणि आजच्या शिकलेल्या स्त्रिया, नोकरदार स्त्रिया, नोकरी वाल्यांच्या स्त्रिया पैशाच्या जोरावर आम्हाला आज कोणतीच समस्या नाही असे समजत आहेत. हे सुद्धां गुलामीचेच लक्षण आहे. बाबासाहेब आंबेडकर यांना १९२२ नंतर कोणतीही वैयक्तिक अडचण नव्हती, पैसा, नोकरी मानसन्मान सर्व गोष्टी होत्या. तरीही ते लढले करोडो लोकांचे कल्याण केले तेच बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले काम आज धोक्यात आहे. संविधान धोक्यात आहे, शिक्षण, आरक्षण व नोकरी धोक्यात आहे. आमचे हक्क अधिकार धोक्यात आहेत. आणि हे सर्व वाचवण्यासाठी महिलांनी लढणे आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीही ईच्छा होती महिलांनी आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होणे आवश्यक आहे. मोफत व सक्तीचे शिक्षणाची तरतूद असताना लाखों करोडो रुपये शिक्षणावर खर्च होत आहेत. लाखो करोडो रुपये खर्च करून नोकरी नाही मग शिक्षण कशासाठी? हा प्रश्न उपस्थित होऊन बरेच लोक शिक्षणापासून दुर जातील. म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षणाचा अधिकार आपोआप बंद होईल. नोकरीचे खाजगीकरण करून आरक्षण व नोकरी संपवली आहे. खाजगीकरणामध्ये समोरच्या व्यक्तीची इच्छा असेपर्यंत आपण नोकरी करू शकू. ना पेन्शन ना कामाची शाश्वती ना इतर सुखसुविधा. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी नोकरी,पेन्शन इतर लाभाची गँरंटी संविधानाच्या माध्यमातून दिली ते ही गेले. आणि खाजगीकरणामध्ये आरक्षण नसल्याने उच्च पदे हे उच्च वर्णीय लोकांकडे जातील व चतुर्थ श्रेणी आपल्या कडे येईल म्हणजे पुन्हा आधुनिक मनुस्मृतीच लागु होईल. धर्माच्या नावाखाली पाखंड, अंधश्रद्धा, बुवाबाजी खुलेआम सुरू आहे, त्याला सरकार संरक्षण देत आहे. परंतु पाखंड, अंधश्रद्धा, बुआबाजी कायद्याने बंद असूनही त्याविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जाते, बऱ्याच वेळा धर्मांध लोकांकडु धमक्या मिळतात म्हणजे आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे. त्यांचे ते तर्क, पुरावा नसलेले, काल्पनिक अज्ञान पसरवत आहेत आणि आमच्या कडे पुरावे, तर्क व सत्य बाजु असूनही आम्ही ते छातीठोकपणे सांगु शकत नाही हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिराऊन घेतल्याचे लक्षण नाही तर काय आहे? इतर धर्माच्या धार्मीक भावना दुखवू नाही म्हणून देव अंधश्रद्धा यावर न बोलण्याचे सल्ले दिले जातात, यावेळी आम्ही हेच विसरून जातो आमचाही धम्म आहे. तो विज्ञानावर आधारित आहे, कोणत्याही प्रकारच्या काल्पनीक कथांवर वा दैवशक्ती वर अवलंबून नाही असा आमचा धम्म अंधश्रद्धा, दैविशक्ती व इतर थोतांड नाकारतो परंतु इतर धर्माचे लोक जेव्हा देवाला सार्वजनिक करतात, सरकारी कामामध्ये देव, अंधश्रद्धा, पाखंड आणतात तेव्हा आमच्या ही भावना दुखतात याचा विचार कोणी करतो का? काल्पनिक गोष्टी मानणाऱ्यांनाच भावना आहेत आणि सत्य माणणाऱ्यांच्या भावनेचा विचार होणार की नाही? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आणि याचे कारण आहे, आम्ही रमाईचा इतिहास वाचून, बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची जाणीव न ठेवता कोणताही एकत्रितपणे लढा उभा न करता भौतिक सुखामध्ये गुरफटून गेलो. आम्हाला काहीच समस्या नाहीत या भ्रमात राहून पुन्हा सर्वांसाठी समस्या निर्माण झाल्या. भिमजयंती, रमाई जयंती फक्त साजरी करून त्यांचे विचार सांगणे आज महत्त्वाचे नाही तर त्यांचा लढा मजबूत करणे महत्त्वाचे आहे. आंबेडकरवादी विचाराच्या नावाखाली स्वतः चे पोट भरणाऱ्यांना एकाछता खाली आणुन आपल्या लढणे आवश्यक आहे. मीच नेता, मीच विचारवंत ह्या गोष्टी बाजूला सारून बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणून काम करने आवश्यक आहे. आपल्या कामावर जनता ठरवेल कोण नेता आणि कोण विचारवंत. स्वतः स्वतः ची पाठ थोपटने, प्रस्थापितांची लाचारी करून दोन पैसे मिळतील म्हणून हातमिळवणी करणे, आंबेडकरवादी विचारांचा लिलाव करणे हे थांबले पाहून. स्वतः ला बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी समजून शत्रुसमोर नतमस्तक होऊन लाचारी करणारा बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी असुच शकत नाही. कारण आजचे हे सोन्याचे मानासन्माचे दिवस बघण्यासाठी किती मोठा संघर्ष व त्याग आहे याची जाणीव आपल्याला राहली नाही. चार मुल समाजासाठी गमावलेल्या रमाईचे मन कुठे असेल. आपल्या बाळाला थोडा ताप जरी आला तर चांगल्या दवाखान्यात उसने पेसे घेऊन आपण दाखल करतो. जोपर्यंत बाळाला बरे वाटतं नाही तोपर्यंत आईला चैन पडत नाही. मग थोडा विचार करा रमाईने काय आणि कसे भोगले असेल? म्हणून रमाईच्या संघर्ष व त्यागाला खरचं नमन करायचे असेल तर एकीकरणासाठी, संविधानाच्या संरक्षणासाठी, हक्क अधिकारासाठी, नेतेगीरी, मी पणा मातीत गाडून समतेचा व न्यायाचा लढा उभा करणे आवश्यक आहे. आणि यामध्ये महिलांनी पुढाकार घेतला तर लढा लवकर उभा राहील आणि खऱ्या अर्थाने रमाईला तिच सर्वात मोठी आदरांजली ठरेल.

करोडो मुलांची आई रमाई यांच्या स्मृतीदिना निमित्त रमाई च्या त्यागाला, संघर्षाला व समजूतदार पणाला विनम्र अभिवादन..

Leave A Reply

Your email address will not be published.