वाशीममध्ये मनोहर भिडेच्या विरोधात जन आक्रोश सामाजिक व राजकीय संघटना रस्त्यावर

0 207

वाशीममध्ये मनोहर भिडेच्या विरोधात जन आक्रोश सामाजिक व राजकीय संघटना रस्त्यावर

– काळे झेंडे व निदर्शने देणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक व सुटका

 

वाशीम :  भारतीय संविधानाबद्दल तसेच राष्ट्रसंत व महापुरुषांबद्दल व महिलांबद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत वक्तव्य करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या मनोहर कुलकर्णी उर्फ मनोहर भिडे यांची सभा उधळवून लावण्यासाठी दि. 30 जुलै रोजी सकाळी दहा वाजता स्थानिक अकोला नाका येथे शहरातील सामाजिक व राजकीय संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
यावेळी कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून मनोहर भिडे च्या विरोधात तसेच त्यांचा कार्यक्रम पोलीस बंदोबस्तात पार पाडणाऱ्या राज्य सरकार व पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी निदर्शने देणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष मनोहर भिडे हे संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यात सभा घेऊन बहुजन समाजातील युवकांची माथी भडकविण्याचे काम करत आहेत. त्यांनी यापूर्वीही क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना देशद्रोही संबोधले आहे. तसेच संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज या राष्ट्र संतांबद्दल गलिच्छ विधान केले आहे. तसेच भारतीय संविधान, भारतीय तिरंगा ध्वज, भारताचे राष्ट्रगीत मला मान्य नसल्याचे ते जाहीर बोलत असतात. आणि सातत्याने मनुस्मृतीचे समर्थन करत असतात. त्यांच्या अशा समाजविघातक व घटनाविरोधी वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा ठपका ठेवून त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यामुळेच वाशीम
शहरात दि. 30 जुलै रोजी होऊ घातलेला त्यांचा कार्यक्रम रद्द करावा या मागणीसाठी शहरातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन भिडे यांना कार्यक्रमास परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती. मात्र, याउपरही प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात भिडे यांची सभा होण्याचे नियोजन केले होते. यामुळे संतापलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी अकोला नाका येथे एकत्र येऊन आंदोलन सुरू केले. दरम्यान काळे शेले, फिती लावून तसेच निषेधाचे फलक झळकवून कार्यकर्त्यांनी मनोहर भिडेच्या विरोधात तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या राज्य शासन व पोलीस प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. आणि सभा रद्द करण्याची मागणी लावून धरली. यावेळी मनोहर भिडे वापस जावो, मनोहर भिडे मुर्दाबाद, भाजप सरकार चा जाहीर निषेध, पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध आदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
स्थानिक काळे लॉन येथे असलेल्या कार्यक्रमासाठी चहूबाजूंनी दूरपर्यंत बॅरिगेट्स लावून प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. असे असतांनाही आंदोलनकर्त्यांनी संविधानिक मार्गाने आंदोलन करून घोषणाबाजी केली. यावेळी सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी भिडेचा निषेध करणारी आक्रमक भाषणे केली. यावेळी बॅरिगेट्स तोडून कार्यक्रम स्थळाकडे जात असलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून अटक केली आणि पोलीस व्हॅन मध्ये पोलीस स्टेशनला आणून स्थानबद्ध केले. त्यानंतर भिडेंची सभा संपल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. या कार्यक्रमामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रचंड विरोध असतांनाही भिडे यांची सभा झाल्यामुळे भिडेंना राज्य सरकारचा पाठिंबा व पोलीस प्रशासनाचे पूर्ण सहकार्य असल्याचे दिसून आले.
या आंदोलनाचे नेतृत्व संभाजी ब्रिगेडचे गजानन भोयर, समनक जनता पार्टी चे डॉ. रामकृष्ण कालापाड, गजानन धामणे, भारतीय बौद्ध महासभेचे सिद्धार्थ गायकवाड, अखिल भारतीय माळी महासंघाचे गजानन ठेंगडे, भीम टायगर सेनेचे सुमित कांबळे, भारत मुक्ती मोर्चाचे इंजि. सिताराम वाशिमकर, जय भीम तरुण उत्साही मंडळाचे रवी पट्टेबहादूर, काँग्रेसचे शंकर वानखेडे, शिवसेनेचे नितीन मडके, शेतकरी संघटनेचे गणेश अढाव, ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेनेचे जगदीश मानवतकर, वंचित बहुजन आघाडीचे सोनाजी इंगळे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पी एस खंदारे, अखिल भारतीय माळी महासंघाच्या किरणताई गिऱ्हे, सामाजिक कार्यकर्त्या मीनाताई उलेमाले, गोरसेनेचे निलेश राठोड, माळी युवा मंचचे नागेश काळे, सत्यशोधक समाजाचे प्रल्हाद पौळकर, बहुजन मुक्ती पार्टीचे सौरभ गायकवाड आदी नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.