पाळीच्या रक्तस्त्रावाला शारीरिक संबंधाची खूण समजत बहिणीची सख्या भावानेच केली हत्या

0 545

पाळीच्या रक्तस्त्रावाला शारीरिक संबंधाची खूण समजत बहिणीची सख्या भावानेच केली हत्या

 

पाळीच्या रक्तस्त्रावाला शारीरिक संबंधाची खूण समजत संशय घेऊन १२ वर्षाच्या बहिणीची सख्या भावानेच हत्या केल्याची दुर्दैवी घटना महाराष्ट्रातील उल्हासनगर येथे घडली आहे.

बारा वर्षीय बहिणीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसल्यानंतर तिने कुणासोबत तरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत अशा संशयातून भावाने तिला विचारणा केली, मुलीची पहिलीच पाळी असल्याने हे रक्त कशाचे आहे हे तिलाही माहित नव्हते. तिच्याकडून समाधानकारक उत्तर न आल्याने संशय वाढत जाऊन भावाने लोखंडी सळईने जिभेवर, अंगावर चटके देत सळईने मारहाण केली. सलग चार दिवस विना अन्नपाणी जबर मारहाणीमुळे मुलगी बेशुद्ध पडली. जेव्हा रुग्णालयात नेले तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सेक्युरिटी गार्डचे काम करणाऱ्या या भावाला अटक करून उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला गेला आहे.

घडलेला हा प्रसंग फार हृदयदावक असून घटनेचा सारासार विचार केल्यास पाळीविषयी समाजात असणाऱ्या अज्ञानातून या मुलीचा नाहक जीव गेला असे समाजबंधला वाटते. वास्तविक पाहता कुठल्याही मुलीला वयात येण्याच्या आधीच तिच्या वयात होणारे बदल आणि मासिक पाळी याविषयी माहिती देणे गरजेचे आहे. ही माहिती देण्याची जबाबदारी नक्की कोणाची आहे? ती तिच्या कुटुंबीयांची, तिच्या शाळेची आणि समाज म्हणून तिच्या आसपास असणाऱ्या आपली देखील आहे. पण बहुतांश मुलींना आता बोलणे अपरिहार्यच आहे म्हणून पाळी आल्यानंतरच केवळ याविषयी माहिती दिली जाते, ती ही बऱ्याचदा अर्धवट आणि अशास्त्रीय असते. त्या बहुतांश मुलींप्रमाणेच या मुलीच्या केस मध्येही असे लक्षात येते की ना तिला शाळेमधून माहिती मिळाली, ना तीच्या कुटुंबातून याविषयी माहिती दिली गेली असेल. खरंतर तिच्या शाळेत याविषयीचे प्रबोधन सत्र व्हायला हवे होते.

तिची पहिली पाळी आलेली असताना हा होणारा रक्तस्त्राव म्हणजे नक्की काय आहे हे तिलाच माहीत नसल्याने ती ते भावाला सांगू शकली नाही आणि त्याचा संशय वाढत गेला. पाळीत होणारा रक्तस्राव पाहून घाबरून अनेक मुलींनी याआधी आत्महत्या देखील केलेल्या आहेत. आपल्या घरात, आपल्या आजूबाजूला पाळी येणाऱ्या कितीतरी महिला असताना देखील मासिक पाळी म्हणजे काय हे पुरुषाला वयाच्या तीशीत देखील माहीत नसणे यावरून पाळीविषयी समाजात किती संकोच आहे हे पुन्हा स्पष्ट होते. पाळीविषयी महिलांना खुलेपणाने बोलता यावे, पुरुषांसोबत संवाद साधता यावा असे वातावरण बनणे फार गरजेचे आहे. यासाठी केवळ मुलींना आणि महिलांना पाळी विषयी माहिती देणे पुरेसे नाही. पुरुषांसोबत देखील मासिक पाळी, त्यावेळी होणारे बदल, त्रास आणि कुटुंबातील सदस्य म्हणून एक पुरुष म्हणून असणारी त्यांची जबाबदारी या सर्व गोष्टींवर त्यांच्या सोबतही खुली चर्चा करणे गरजेचे आहे. बऱ्याचदा पुरुषांचा आणि महिलांचा देखील असा दृष्टीकोन असतो की हे सर्व पुरुषांना माहीत असण्याची काय गरज आहे? त्यामुळे अनेकदा ह्या गोष्टी पुरुषांपर्यंत पोहोचू दिल्या जात नाहीत, पुरुष ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. मासिक पाळी ही महिलांना येत असली तरी माणूस कुटुंबात रहात असल्याने हा केवळ महिलांचा विषय बनून न राहता मानवी विषय बनावा असे समाजबंधला वाटते. Menstruation is NOT only Women issue; but it’s a Human issue. यामुळेच पाळी विषयी सर्वांसोबत जास्तीत जास्त प्रबोधन आणि चर्चा करण्याचा समाजबंधचा प्रयत्न असतो. पण बरेचदा असे बोलले जाते की आता परिस्थिती बदलत आहे, आता शहरात सर्वजण सुशिक्षित झालेले आहेत त्यामुळे शहरात काही अडचण नाही, याची गरज फक्त ग्रामीण भागात आहे. पण अशा घटना घडतात तेव्हा आपल्या लक्षात येते की याविषयी कामाची सगळीकडेच अजूनही किती प्रमाणात गरज आहे. शहरांमध्ये पाळीत शोषक साहित्याची उपलब्धता आणि वापर वाढला असला तरी पाळीकडे पाहण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन मात्र आजही विकसित झालेला नाही. पाळी विषयी मुली-महिलांना शास्त्रशुद्ध माहिती देणे या इतकेच पाळीकडे पाहण्याचा समाजाचा शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करणे हे देखील गरजेचे आहे. आजवर समाजबंधने १००० हून अधिक ‘प-पाळीचा’ सत्र घेतली आहेत, पण जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा कामाचे समाधान उरत नाही. घडलेल्या घटनेचा निषेधच आहे पण त्या मुलीच्या जाण्याने आपल्याला खरंच वाईट वाटले असेल तर एक विनंती आहे; आपल्या कुटुंबातील, जवळच्या महिलांसोबत आजच पाळीविषयी बोला. अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी ‘मासिक पाळीस पूरक समाज निर्मिती’ करण्यात सहभागी व्हा. हीच त्या मुलीला खरी श्रद्धांजली असेल.

– सचिन, समाजबंध
7709488286

#menstrualcycle

Leave A Reply

Your email address will not be published.