सुषमाताई अंधारे यांस एका आंबेडकरी कार्यकर्त्यांचे पत्र…..

89

सुषमाताई अंधारे यांस एका आंबेडकरी कार्यकर्त्यांचे पत्र…..

प्रति,
प्रा.सुषमाताई दगडू अंधारे.
उपनेत्या.
शिवसेना उबाठा.
महाराष्ट्र राज्य.
दिनांक :- ०५-०४-२०२३

विषय :- कालपर्यंत देवी देवतांच्या नावे साभिनय बोंब मारणाऱ्या सुषमाताईंमध्ये झालेल्या अनाकलनीय परिवर्तनाबद्दल……..

सन्माननीय सुषमाताई,
सविनय जयभीम.
ताई तुम्हाला जयभीम केलेला चालतोय ना ? नाही म्हणलं ,आजकाल तुमच्यात प्रचंड परिवर्तन घडलंय म्हणून विचारतोय.ज्या देवीची कालपर्यंत सुषमा अंधारे नावाची माझी बहिण ‘देवी बसली , देवी खाटेवर बसली’ अशी साभिनय हेटाळणी करायची ,त्याच देवीची चैत्रोत्सवात अगदी मनोभावे आरती गाताना आमची सुषमाताई दिसली.अर्थात त्यांनी काय करावं आणि काय करू नये , याचा सर्वस्वी अधिकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानाने इतर भारतीय नागरिकांप्रमाणे त्यांनाही दिला आहे.काल त्या देवाला मानत नव्हत्या , आज त्या त्याची आरती करताहेत , त्यांनी देव मानावा किंवा न मानावा , हा त्यांचा अधिकार आहे , ज्याच्या त्याच्या श्रद्धेचाच तो भाग आहे , आणि त्यांचे ते अधिकार शाबूत राहिले पाहिजे , त्यात आपण ढवळाढवळ करता कामा नये , ह्याच मताचा मी आहे. त्यामुळे तुमच्या (सुषमाताईंच्या) अचानक बदललेल्या भूमिकेला विरोध असण्याचे कारणच नाही.
अर्थात तथागत बुद्धांनी मानवी जीवनात परिवर्तन हा सृष्टीचा अटळ नियम असल्याचे प्रतिपादन केले आहे.त्यामुळे साहजिकच आमच्या सुषमाताईंच्या जीवनात असे काही परिवर्तन घडले असेल तर काहीच नवल असण्याचे कारण नाही.अगदी आजपर्यंत ताई आम्हाला आंबेडकरवाद शिकवत होत्या , त्यासाठी उगीचच त्या इतर धर्मियांच्या श्रद्धास्थानांवर साभिनय घाव घालत होत्या.अर्थात आंबेडकरी जनतेकडून त्या घसघशीत बिदागी घेऊनच आंबेडकरवाद सांगत होत्या.ताई ज्या जातीत जन्माला आल्या त्या जातीला त्यांनी कितपत आंबेडकर सांगितले , त्यांच्यात कितपत आंबेडकरवाद ओतला , हे समजायला मार्ग नाही.पण ज्या जातीत बाबासाहेब जन्माला आले त्याच जातीला मात्र त्या आंबेडकरवाद शिकवत होत्या , हे विशेष.अर्थात ताईंच्या व्याख्यानातून कितपत परिवर्तन घडलं , हा जरी संशोधनाचा विषय असला तरी ,आज मात्र ताईंमध्येच आमूलाग्र बदल झालाय , ताई आरपार बदलून गेल्यात हे मात्र १००% खरं आहे.आता एका दिवसांत ताईंमध्ये इतके प्रचंड परिवर्तन कसे काय घडले ? उध्दवसाहेब ठाकरे यांनी असे कोणते व्याख्यान दिले की ताई १८० अंश कोनात बदलून गेल्या ? खासदार राजन विचारे यांनी अशी कोणती जडीबुटी दिली की ताई आरपार बदलूनच गेल्या ? कालपर्यंत देवी देवतांची हेटाळणी करणारी आमची बहीण आज त्याच देवीदेवतांची आरती करताना पाहिल्यावर , आम्हीही ‘ते’ माणसाला आरपार बदलवणारे व्याख्यान ऐकण्यास उत्सुक आहोत.अर्थात ताईंनी बदलू नये , ताईंच्या मतात बदल होऊ नये , असे थोडीच आहे? ताई सुद्धा एक मानव आहेत , त्यांच्यातही मानवी संवेदना आहेत.पण तशाच संवेदना इतर माणसांमध्येही असणे साहजिकच आहे , हे मात्र ताई मान्य करायला तयार नाहीत.आणि त्यातल्या त्यात राजकारणी लोकांच्या संवेदना ह्या बोथट असतात.ज्याप्रमाणे स्वतःच्या मतांमध्ये बदल घडविण्याचा अधिकार ताईंना आहे , तसा अधिकार इतरांना नाही काय ? ताईंनी केलं तर ते परिवर्तन असतं आणि इतरांनी केलं तर ती गद्दारी असते ? असं कसं असू शकतं ताई ? कालपर्यंत ज्या एका नेतृत्वाखाली काम केले , आज तेच नेतृत्व बदलण्याचा अधिकार इतरांना नाही काय ? जर तसा अधिकार इतरांनाही असेल तर मग वारंवार त्यांना गद्दार म्हणून हिणवण्याचा अधिकार ताईंना कोणी दिला ? मुद्दा असा निर्माण होतोय की , काल आंबेडकरी समाजाला आंबेडकरवाद सांगत असताना ताईंनी देवाला नाकारले , आज ताई त्याच देवांची आरती करत आहे , ही सामाजिक गद्दारी नाही का ? ही सामाजिक प्रतारणा नाही का ? काल त्या राष्ट्रवादी काँग्रेस , स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षामध्ये होत्या , आज त्या उध्दव साहेबांच्या शिवसेना उबाठा मध्ये आहे , मग ही पक्षीय गद्दारी नाही का ? अर्थात एखाद्या विशिष्ट पक्षाशी केलेली गद्दारी आणि एखाद्या विशिष्ट समाजाशी केलेली गद्दारी , ह्यात जमीन-अस्मानचा फरक आहे.एकवेळ पक्षाशी गद्दारी परवडली , कारण तो राजकारणाचा एक अटळ असा भाग असतो.राजकारणात शह-काटशह होतच असतो.राजकारणात कालचा मित्र आजचा दुष्मन आणि कालचा दुष्मन आजचा मित्र तसेच दुष्मणाचा दुष्मन आपला मित्र असतो.त्यामुळे गद्दारी / खुद्दारी ह्या गोष्टींना इथे गौण स्थान असते….पण तशी मुभा सामाजिक जीवनात बिल्कुलच नसते.ही सामाजिक गद्दारी खूप डेंजर असते आणि ती गद्दारी तुम्ही केली हे तुम्हीच तुमच्या कृतीतून वारंवार सिध्द करत आहात.ताई ,इतर आमदारांनी त्यांच्या पक्षाशी / नेतृत्वाशी गद्दारी केली किंवा आणखी काही केलं असेल तर तो त्यांच्या राजकारणाचा भाग आहे.त्यांनी योग्य केलं की अयोग्य केलं , हे येणारा काळ सांगेल.तशी त्यांना त्याची राजकीय किंमत मोजावी लागेल.आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आम्हाला त्यांच्या पक्षीय राजकारणाशी काहीही घेणेदेणे नाही…..पण ताई तुमचं काय ? तुम्ही तर थेट आमच्या आंबेडकरी समाजाशीच गद्दारी केली , आंबेडकरवादाशीच प्रतारणा केली , त्याचे काय ? अमोलभाऊ मिटकरी पासून ते तुमच्यापर्यंत सगळ्यांनीच आम्हाला आमचेच पैसे घेऊन बाबासाहेब सांगितले आणि शेवटी पक्षीय निष्ठा कुठे वाहिली ? तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस तर कधी शिवसेना उबाठा ? हा उफराठा प्रवास नाही का ताई ? म्हणजे त्याचं असं झालंय की , तुम करे सो खुद्दारी और बाकी लोग करेगा तो गद्दारी ? ऐसा कैसा चलेगा ताई ?
ताई , तुम्ही आजपर्यंत आंबेडकरी समाजाला गृहीत धरून जे जे काही भलेबुरे निर्णय घेतले , त्याची आम्ही एक समाजघटक म्हणून पाठराखणच केली.भलेही आम्हाला तुमचे काही निर्णय आवडलेही नसतील पण बहिणीला वाऱ्यावर सोडणारी आमची औलाद नसल्यामुळे आम्ही तुम्हाला फुल्ल सपोर्ट केला.ज्या ज्यावेळी तुम्हाला विरोधकांनी ट्रोल केलं , त्या त्यावेळी तुमच्या आधी आम्ही त्यांना उत्तर दिलं.भाऊ म्हणून आम्ही तुमची अभेद्य कवचकुंडले बनलो , भाऊ म्हणून आम्ही तुमची ढाल बनून विरोधकांचे वार आम्ही आमच्या पाठीवर झेलले.पण दुर्दैवाने तुम्ही आमच्याच पाठीत खंजीर खुपसला ? ( म्हणूनच कदाचित आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जाहीरपणे म्हणाले होते की “कोण सुषमा अंधारे ? मी नाही ओळखत?”) ताई , तुम्हाला तुमचा राजकीय सोयरपणा लखलाभ असो , आम्हाला तुमच्या राजकारणाशी काहीही घेणेदेणे नाही.पण , तुमच्या राजकीय मतलबासाठी आंबेडकरवाद वापरू नका.सोईस्करपणे आंबेडकरवादाच्या आडून तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजून घेऊ नका.तूर्त इतकेच…..तुमच्या आरपार बदललेल्या भूमिकेला आमच्या महामंगल सदिच्छा!तुमच्या प्रत्येक चांगल्या ‘लोकहितवादी समतावादी’ लढ्यात आम्ही तुमच्यासोबत राहू , पण तुमच्या बदललेल्या भूमिकेला आम्ही कदापि समर्थन देऊ शकत नाही.
( तुमचा अगोदरचा “देवी बसली” हा व्हिडीओ आणि आता त्याच देवीची आरती करतानाचा व्हिडीओ , हे दोन्ही व्हिडीओ माझ्या डोळ्यासमोर असल्यामुळे कदाचित माझ्या लिखाणात तिखटपणा आला असेन तर तो तुम्ही समजून घ्यावा.)

तुमचाच धम्मबंधू.
भिमपँथर मा.राजेश गवळी.
आंबेडकरी साहित्यिक.
संपर्क क्र :- ९०८२८०७६३९

Comments are closed.