महाप्रसादानंतर ५० हून अधिक जणांना विषबाधा

0 86

महाप्रसादानंतर ५० हून अधिक जणांना विषबाधा

 

 

‍Nashik News : नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव बाऱ्हे गावात हनुमान जयंतीच्या महाप्रसादातून सुमारे ५० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

राज्यातील अनेक भागात यापूर्वी देखील विषबाधेचे प्रकार घडले आहेत. अशातच नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव बाऱ्हे येथे ५० ते ६० जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. आज (७ एप्रिल) सकाळी या सप्ताहाअंतर्गत काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसाद वाटण्यात आला. याच महाप्रसादाचा लाभ घेणाऱ्या गावकऱ्यांना विषबाधा झाली आहे. घटना घडल्यानंतर लागलीच रुग्णांना ठाणगाव ग्रामीण आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अनेकांना उलटी, मळमळ, पोटदुखीचा त्रास

ठाणगाव बारे परिसरात काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गावातील असंख्य गावकऱ्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. यानंतर अनेकांना उलटी, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास झाला. त्यांनी तातडीने ग्रामीण आरोग्य केंद्रात धाव घेतली. पाहता पाहता आरोग्य केंद्रामध्ये जवळपास शंभर रुग्ण दाखल झाले. यातील काही जणांना प्राथमिक उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे तर, काही जणांवर उपचार सुरु आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर आरोग्य प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून महाप्रसादाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून विचारपूस

दरम्यान आज गुड फ्रायडे निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने बाऱ्हे आणि ठाणगाव आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते. त्यामुळे उपचारात अनेक अडचणी आल्या. ग्रामस्थांनी विविध पातळ्यांवर संपर्क साधल्यानंतर तात्काळ आरोग्य यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. उर्वरित रुग्णांना बाऱ्हे येथे उपचार सुरु आहेत. या सर्व परिस्थितीबाबत पालकमंत्री दादा भुसे संपर्कात असून सर्व यंत्रणेला सर्वतोपरी मदतीचे निर्देश दिले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांना घटनास्थळी पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.