हिंदू राष्ट्राशिवाय पर्याय नाही ?

0 686

हिंदू राष्ट्राशिवाय पर्याय नाही ?

 

दिपक इंगळे
राष्ट्रीय किसान मोर्चा

छत्रपती क्रांती सेना
शिवशाहीच्यापुनर्स्थापनेसाठी

 

भावांनो, तीन वर्षांपूर्वी माझा मित्र रोहित चवळे यांना उद्देशून लिहिलेली हिंदुराष्ट्र विषयी पोस्टची आठवण फेसबुकने आज वर काढली. अवघ्या एक तासात शेकडो लोकांनी ती शेअर पण केली होती.आपणांसाठी ती खाली देत आहे. तीन वर्षांनंतर हिंदुराष्ट्र विषयी मित्राचं मत काय आहे हे जाणून घेण्यास मीही उत्सुक आहे. आणि आपल्याही प्रतिक्रिया द्या, स्वागत आहे.

दि. २० जुलै २०२० या दिवशीच्या एका पोस्टमध्ये माझा वर्गमित्र रोहित चवळे म्हणाला की आता हिंदू राष्ट्राशिवाय पर्याय नाही.

निमित्त होतं छत्तीसगड मध्ये एका ख्रिश्चन व्यक्तीने गाईला फाशी देऊन गाईची हत्या केली . माझ्या मित्राचं म्हणणं होतं की छत्तीसगड मध्ये काँग्रेसच सरकार ( हिंदू विरोधी सरकार ) असल्याने तिथं अशी घटना घडली, म्हणून आता भारतात हिंदू राष्ट्राशिवाय पर्याय नाही.

त्याने ते सोशल मीडियावर मांडले , त्याचा तो संविधानिक अधिकार त्याने बजावला.

माझा वर्गमित्र आहे म्हणून मला वाटलं की त्याला काही प्रश्न विचारावेत दुसरं कोणी असतं तर जाऊ द्या म्हणून विषय सोडून दिला असता ,

मागेही दोन-तीन वर्षांपूर्वी माझा एक कॉलेजमित्र जो संघाचा स्वयंसेवक होता. मी त्याला संघ हे भारतात आतंकवादी कारवाया करतो याचे काही टेक्स्ट पाठवले, तो म्हणला की तुला माहितेय का मी कोण आहे , आणि त्याने त्याचे शाखेतील हाफ चड्डीमधील फोटो पाठवले,

मी म्हणलो मला माहितेय तू  लिंगायत धर्मीय असून सुद्धा हिंदूधर्म रक्षणासाठी (असे संघवाले म्हणतात) असणाऱ्या RSS मध्ये काम करतो म्हणून तुला मुद्दामच पाठवले.

तो अवाकच झाला आणि म्हणाला , अरे तुझं नशीब की तू हे मला वैयक्तिक पाठवलास माझ्या वरील सिनियर लोकांना जर हे कळलं तर तुझं अवघड होईल.

मी त्याला म्हणालो, ठीक आहे त्यांनाच पाठव आणि मला फोन कर आणि कधी कुठे चर्चेला येऊ सांग म्हणल .

बरेच दिवस त्याचा काही रिप्लायच नाही आला मीच शेवटी थोडया दिवसाने आवर्जून फोन केला आणि विचारलं अरे भावा काय झालं, काय म्हणाले तुझे सिनियर लोक.

तो म्हणाला की त्या बामसेफवाल्या लोकांसोबत चर्चा नकोच, त्यांना तोंड देत बसू नका, त्यांच्या नादी लागू नका, तेंव्हापासून तो मित्र मला टाळतोय, असो, पण माझा हा मित्र रोहित चवळे पळून जाणाऱ्या पैकी नाही, खंबीर आहे एकदम, शिवाय गनिमी कावा, लातूर या संघटनेत उत्तम प्रकारे नेतृत्व करतोय, म्हणून चला म्हणल आपलाच भाऊ आहे, चर्चा करायला काहीच हरकत नाही.

मला त्याला काही प्रश्न करावेसे वाटतात ते असे 

मित्रा, तू म्हणतोस हिंदू राष्ट्राशिवाय पर्याय नाही, पण मला अगोदर सांग त्या हिंदू राष्ट्रात तुझं माझं स्थान नेमकं काय असणार आहे ? हा प्रश्न उपस्थित करण्यापाठीमागे माझा काही विचार आहे तो पुढीलप्रमाणे

१. पहिला प्रश्न वाल्मिकी लिखित मूळ रामायणात शंभूक नावाच एक प्रकरण सापडत, ते असं,

रामाचा दरबार सुरु असताना एक ब्राह्मण त्याच्या मयत मुलाचं प्रेत हातावर घेऊन येतो आणि म्हणतो की, हे प्रभू श्रीराम, तुझ्या राज्यात पाप घडत आहे, एक शूद्र शिक्षण घेत आहे , चातुर्वर्ण्य धर्माच्या विरोधात, वैदिक धर्माच्या विरोधात , सनातनी धर्माच्या विरोधात , हिंदू धर्माच्या विरोधात, ब्राह्मणी धर्माच्या विरोधात वर्तन करत आहे , त्यामुळे माझा मुलगा मरण पावला .

प्रभू श्रीराम आणि त्यांची सेना त्वरीत त्याचा शोध घेत निघतात आणि एक जंगलात त्यांना शंभूक ज्ञानार्जन करताना सापडतो. आता वर्णाश्रम धर्मानुसार , सनातनी धर्मानुसार , वैदिक धर्मानुसार ,ब्राह्मणी धर्मानुसार, (त्या काळात हिंदू हे नाव नव्हतं, तर आजच्या हिंदू धर्माला त्या काळात असलेले ही नांवे आहेत,) शिक्षणाचा अधिकार फक्त ब्राह्मणांना होता,

आता शंभूक होता शूद्र, चौथ्या वर्णाचा, त्याला शिक्षणाचा नव्हता अधिकार, आता रामराज्यात असलेल्या प्रचलित धर्मानुसार तो गुन्हा होता, त्यामुळे एका ब्राह्मणाचा जीव जातो, थोडक्यात शूद्राने शिक्षण घेतल्यास ब्राह्मणी धर्म, सनातनी धर्म, वैदिक धर्म, चातुर्वर्ण्य धर्म, हिंदू धर्म खतरमे येतो ,

आजच्या काळात त्या शंभुकाचे वारसदार म्हणजेच आजचा मराठा कुणबी सहित बारा बलुतेदार, ओबीसी, म्हणजेच भारतातील ३७४३ जातीत वाटला गेलेला समाज .

मग माझा प्रश्न असा आहे की, प्रभू श्रीरामाला आदर्श मानून स्थापित होणाऱ्या हिंदूराष्ट्रामध्ये, आजच्या मराठा-कुणबी-ओबीसी सहित ३७४३ जातींना शिक्षणाचा अधिकार असणार आहे का नाही ?

२. दुसरा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल, असा की,

हाताची शीर तळहातावर घेऊन, जीवावर अत्यंत उदार होऊन , छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन केले, पण त्या काळात प्रचलित पद्धतीनुसार राज्यभिषेक झाल्याशिवाय, राजा म्हणून मान्यता नव्हती .

आता राज्यभिषेक करण्याचा काम कुणाचं तर ब्राह्मणांच. मग शिवाजी महाराज ब्राह्मणांना म्हणाले की माझा राज्यभिषेक करा, तेंव्हा स्वराज्यातील सरसकट चांगल्या-वाईट ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकास विरोध केला.

आणि म्हणाले ब्राह्मणी धर्मानुसार, वैदिक धर्मानुसार, सनानती धर्मानुसार, हिंदु धर्मानुसार राजा होण्याचा अधिकार क्षत्रियाचा आहे, आणि तूम्ही तर शूद्र आहात आणि शूद्राला राजा होण्याचा अधिकार नाही.

छत्रपती शिवाजी महाराज जर हिंदू धर्म रक्षणाचे काम केले असतील तर हिंदू ब्राह्मणांनी त्यांचा राज्यभिषेक का नाकारला ? शिवाजी महाराजांचा धर्म आणि शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकांस विरोध करणा-यांचा धर्म एक असू शकेल काय ?

मग तुमच्या प्रस्थापित हिंदू राष्ट्रात शिवाजी महाराजांना मानणाऱ्या लोकांचं स्थान काय असेल ? का जे स्थान शिवाजी महाराजांचे होत (शूद्र म्हणून) तेच असणार आहे ?

३. मित्रा माझा तिसरा प्रश्न संत तुकाराम महाराजांच्या बद्दल आहे .

मित्रा तुकाराम महाराजांनी त्या काळात रयतेला जागृत करण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी, स्वराज्य स्थापणेकरिता मावळे तयार करण्यासाठी, एक पुस्तक लिहिलं, त्याला आपण तुकारामाची गाथा म्हणून ओळखतो, आता ही गाथा मंबाजी भट आणि रामेश्वर भट या हिंदू ब्राह्मण लोकांनी नदीत बुडवली आणि नष्ट केली.

आता गाथा कोण नष्ट करायला पाहिजे होती ? त्या काळातील रयतेचे दुष्मन असेलेल्या इस्लाम धर्मीय मोघलांनी परंतु कोण नष्ट केली हिंदू ब्राह्मणांनी.

आता या ब्राह्मणांनी गाथा नष्ट का केली ? तर त्याच ही उत्तर नेहमीप्रमाणे तेच, तुकाराम महाराज हे ब्राह्मणी धर्मानुसार, वैदिक धर्मानुसार, सनातनी धर्मानुसार, हिंदू धर्मानुसार शूद्र , त्यांना गाथा लिहिण्याचा, शिक्षणाचा अधिकार नाही,

मग हिंदू असलेल्या तुकाराम महाराजांची गाथा हिंदू ब्राह्मणांनी का बुडवली ?

काय तुकाराम महाराजांचा धर्म आणि तुकाराम महाराजांची गाथा बुडावणाऱ्या लोकांचा धर्म एक असू शकतो ?

मग माझा प्रश्न असा आहे मित्रा, तुकाराम महाराजांना मानणाऱ्या वारकऱ्यांचे तुमच्या हिंदू राष्ट्रात काय स्थान असणार आहे ? का तेच जे तुकाराम महाराजांचे होते ?

४. माझा चौथा प्रश्न आहे राष्ट्रपिता जोतिबा फुले यांच्या बद्दल.

या क्रांतीसूर्याने छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील हरवलेली समाधी शोधून काढली आणि जगातील पहिली शिवजयंती १८६९ ला साजरी केली, (भटमान्य टिळकांनी नाही) त्याची आजही नोंद पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध आहे.

आता हा शिवरायांचा कट्टर मावळा त्यांच्या परांजपे नावाच्या चांगल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले, वरात चालू होती, महात्मा फुले वरातीत चालू लागले. तेथील ब्राह्मणांच्या लक्षात आले की हा माणूस ब्राह्मण नसून माळी आहे, आणि तरीही आपल्या खांद्याला खांदा लावून चालतो,

त्या वरातीमधून ब्राह्मणांनी फुलेंना हाकलून दिले, कारण काय तर फुले कोण ? ब्राह्मणी धर्मानुसार, वैदीक धर्मानुसार, सनानती धर्मानुसार, हिंदू धर्मानुसार शूद्र,

मग मला प्रश्न पडला की, फुलेंचा धर्म आणि फुलेंना वरातीतुन अपमानीत करून हाकलून देणाऱ्याचा धर्म एक कसा काय असू शकेल ?

मग माझा प्रश्न असा आहे की , फुलेंना मानणाऱ्या लोकांचे तुमच्या हिंदू राष्ट्रात काय स्थान असेल ? का जे फुलेंचे होते तेच ?

आता ही यादी वाढवायची असेल तर अजून वाढू शकते,

संत नामदेव महाराजांचा अपमान झाला, त्यांना ब्राह्मणांनी मंदिरात कीर्तन नाही करू दिल, त्यांना मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन करावं लागलं,

राजर्षी शाहू महाराजांचा अपमान टिळक आणि समकालीन ब्राह्मणांनी केला, त्यांना शूद्र घोषित केले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, अण्णाभाऊ साठे यांचा अपमान केला,

स्वातंत्र्येत्तर काळात यशवंतराव चव्हाण यांचा अपमान झाला, इंदिरा गांधीचा स्टेनोग्राफर धवन नावाच्या ब्राह्मणाने शरद पवार यांचा भर सभेत अपमान केला, अगदी अलीकडे ही यादी यादवबाई (खोलेबाई प्रकरण) पर्यंत येते.

मग मित्रा, मला सांग, आपल्याला आपल्या हक्क अधिकारापासून हिरावून घेणाऱ्या हिंदू राष्ट्रातील रामराज्य निर्माण करण्यासाठी का प्रयत्न करावेत ?

याउलट

ज्या बळीराजाच्या काळात भारतात सोन्याचा धूर निघत होता, त्या संविभागी बळीच्या बळीराज्याची पुनर्स्थापना करण्यासाठी कार्यरत राहावे.

ज्या स्वराज्यात, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाची सुद्धा रक्षणाची जबाबदारी राजाची होती, ज्या राज्यात शत्रूचीसुद्धा स्त्री सुरक्षित होती, त्या शिवरायांचे स्वराज्याची, शिवराज्याची पुनर्स्थापना करण्यासाठी आपण का संघर्ष करू नये ?

फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊ यांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य-समता-बंधुता-न्यायावर आधारित आधुनिक भारत आपल्याला कधीही प्राणापेक्षा प्रिय असायला हवा आणि आहे. तो आदर्श भारत निर्माण करण्यासाठी आपण का संघर्ष करू नये ?

Leave A Reply

Your email address will not be published.