संघोट्यांच्या बोकांडी बसलेले गांधी नावाचं भुत !

0 114

संघोट्यांच्या बोकांडी बसलेले गांधी नावाचं भुत !

 

– बाळासाहेब कदम 

 

काय तर म्हणे गांधींचा पिता हा मुसलमान…!
अकलेचे दिवाळे निघालेला माणुस जेव्हा म्हणतो की माझ्या बागेतल्या झाडाचे आंबे खाल्ले तर हमखास मुलेच जन्माला येतात. तेव्हा त्याने आपला मेंदु कोठेतरी एखाद्या भोंदूबाबाकडे गहाण टाकला आहे याची खात्रीच पटते. ज्याचा जन्मच मुळी आंब्यामुळे झाला आहे तो माणुस वैचारीकदृष्ट्या किती गलिच्छ घाणीत बरबटलेला असेल याचा विचार न केलेलाच बरा. आपल्याकडे असं मानलं जातं की पावसाळा सुरु झाला की आंबे खाऊ नयेत कारण आंब्यात अळ्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे या वर्षीचा पावसाळा चालू झाल्यापासून पावसाचं प्रमाण कमी परंतू या आंबापुत्राच्या मुखातले किडे मोठ्या प्रमाणात वळवळत बाहेर पडत आहेत. हे वळवळणारे किडे अत्यंत घाणेरड्या शब्दांत घाण पसरवत आहेत.

कधी हे किडे राष्ट्रगीताचा अपमान करतात, कधी राष्ट्रध्वज अशुभ आहे असं सांगुन तो बदलण्याची भाषा करतात, देशातील स्वातंत्र्य, सामाजिक चळवळीतील महापुरूषांचा अपमान करुन त्यांचे योगदान नाकारून त्यांचा धिक्कार करतात, राज्यघटनेचा तिरस्कार करुन चातुर्वर्ण्याधारीत समाजव्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या ब्राह्मणेतर बहुजन समाजाला आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक गुलामगिरीत ढकलणाऱ्या विषमतावादी मनुस्मृतीचा पुरस्कार करतात, हुकुमशाहीचे गोडवे गातात.

संपूर्ण समाजाचं शारिरीक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, सांस्कृतिक स्वास्थ्य बिघडवून टाकणाऱ्या या विनाशकारी किड्यांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर संपुर्ण समाज, तरुण पिढी व येणारी भावी पिढी नासल्याशिवाय राहणार नाही.

अगदी पद्धतशीरपणे तरुण पिढीच्या हातातुन लेखणी काढुन घेऊन त्यांच्या हातात विनाशकारी शस्त्रे, डोक्यात विध्वंसक धर्मांध विचार व डोळ्यात वेगवेगळ्या जातीधर्माच्या बाबतीत एकमेकांविरुद्ध प्रचंड द्वेष, तिरस्कार व घृणा या गोष्टींची पेरणी करणारी व्यवस्था या सर्वांगसुंदर, समृद्ध राष्ट्राला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही.

गांधीहत्येनंतर पंच्याहत्तर वर्षे झाल्यानंतरही गांधींचा विचार संपत नाही तर तो दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊन त्याचा प्रचार, प्रसार वाढतोच आहे. हा विचार नथुरामवादी प्रवृत्तींना स्वस्थ बसू देत नाही. इतक्या वर्षांनीसुद्धा म्हणजे साम, दाम, दंड, भेद असे सगळे उपाय संपल्यानंतरही जगाने मान्य केलेला आदर्शवादी सत्य, प्रेम, अहिंसेचा मानवतावादी विचार देणारा गांधीविचार संपवता न आल्याच्या पराभूत मानसिकतेतून गांधींना बदनाम करण्याची मनुवादी संघी कुप्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. जितकी गांधींची बदनामी होईल तितकी त्यांच्याबद्दलची उत्सुकता वाढत जाऊन त्यांच्या आयुष्यातील एकेक पैलू उलगडत जाणार आहे. गांधींनी सांगितल्याप्रमाणे “माझं जीवन हाच माझा संदेश आहे.” या तत्त्वानुसार गांधींच्या चरित्राचा अभ्यास केल्यास या किड्यांच्या पाठिराख्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता व फसवले गेल्याची भावना निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही इतकी अध्यात्मिक, धार्मिक, मानवतावादी नैतिकता गांधीचरीत्रात आहे.

“या पृथ्वीवर असा कोणी हाडामांसाचा माणूस होऊन गेला वावर येणाऱ्या पिढ्यांचा विश्वास बसणे कठीण जाईल.” महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे हे उद्गार महात्मा गांधीचे मोठेपण सांगण्यास पुरेसे आहेत. भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन म्हणाले, “इतिहासात महात्मा गांधी यांची तुलना बुद्ध आणि जिझस यांच्याबरोबर केली जाईल” मेडिसिनमध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले अल्बर्ट झेंट-गोग आपल्या ‘दी क्रेझी एप’ या पुस्तकात म्हणतात, “दोन महायुद्धांच्या मधल्या काळात साम्राज्यशाही बहरली आणि सैन्याची ताकद हीच सर्वोच्च गोष्ट बनली. अशा काळात कमजोर हा बलवानापुढे शरणागती पत्करणार हे नैसर्गिक होते. तेवढ्यात गांधी आले, ज्यांनी जगातील सर्वांत ताकदवान लष्करी सत्ता आपल्या देशातून अक्षरश: हुसकावून लावली. त्यांनी जगाला शिकवले की सैन्याच्या ताकदीपेक्षाच नाही तर जीवनापेक्षा मोठ्या ताकदी असतात, आणि त्यांनी हे सिद्ध केले की लष्करी ताकदीचे दिवस संपले आहेत. ”

‘शिकागो ट्रिब्युन’ या अमेरिकेतील त्याकाळच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा दैनिकाचे जागतिक कीर्तीचे पत्रकार विल्यम शिरर; १९३० मध्ये त्यांच्या ऐन तारुण्यात भारतातील स्वातंत्र्य चळवळ जवळून पाहण्यासाठी आले, दीर्घ काळ महात्मा गांधींच्या सहवासात राहिले. त्यांनी पुढे ‘गांधी-आठवणी’ या नावाने गांधींच्या वैचारिक प्रवासाचे जे आगळे चरित्र लिहिले त्याच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, “गांधींनी भारताला परकीय सत्तेच्या पाशातून मुक्त केले, पण त्याहीपेक्षा जगाला चुकीच्या समजुती आणि जगण्याची मूर्ख पद्धत यापासून मुक्त केले. ते हाडाचे शिक्षक होते, इतकेच नाही तर इतिहासातील ते सगळ्यात मोठ्या गुरूंपैकी एक होते, स्वतःचे आयुष्य त्यांनी जगापुढे उदाहरण म्हणून ठेवले म्हणून नाही, तर त्यांनी जो उपदेश केला तो ते स्वतः जगले म्हणून… या कठोर, निराशाजनक, हिंसक आणि उपभोगवादी जगात त्यांनी दाखवून दिले की प्रेम, सत्य आणि अहिंसा, कल्पना आणि आदर्श, या गोष्टी न्याय, सभ्यता, शांतता आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, बॉम्ब आणि बंदुका यांच्यापेक्षा मोठी ताकद बनू शकतात… ‘माणूस’ म्हणून गांधी आदर्श असण्याच्यापासून खूप दूर होते आणि सर्वप्रथम जाहीरपणे हे मान्य करणारे ते स्वतः होते. इतिहासातील सर्व कर्तृत्ववान माणसांप्रमाणे त्यांचे आयुष्य विरोध आणि विरोधाभासाने भरलेले होते… माणूस म्हणून असणाऱ्या या सर्व दुर्बलता लक्षात घेऊनही इथे एक असा अमर्यादित चांगुलपणाने भरलेला, आयुष्यभर सत्याचा शोध घेणारा, ज्या सत्याची तो परमेश्वराशी करे, प्रेम ही माणसाला मिळालेली सर्वांत मोठी देणगी मानणारा एक मानवतेचा यात्री; प्रेम, समजूतदारपणा आणि सहनशीलता, करुणा आणि अहिंसा ही मूल्ये आचरणात आणली तर ती मानवजातीला पापाच्या ओझ्यातून, अत्याचारातून, आणि वाइटातून मुक्त करतील असे मानणारा एक माणूस होता.”

अशा या वरवर साध्या दिसणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी नावाच्या माणसाने जगाला सत्याग्रह, सविनय कायदेभंग, निष्क्रिय प्रतिकार, असहकार, अहिंसा अशा एकसे एक शस्त्रांच्या देणग्या दिल्या. शतकानुशतके माणूस अत्याचार, हिंसा, युद्धे यांच्याविरुद्ध लढण्याची नैतिक आणि मानवतावादी शस्त्रे शोधत होता. गांधी आले आणि हा शोध संपला. आपल्या या शोधाबद्दल स्वतः गांधी ‘हरिजन’ मधील २७ मे १९३९ रोजी लिहिलेल्या लेखात म्हणतात, “माझ्याकडे आधारासाठी कोणतीही तयार अशी सैद्धांतिक तत्त्वप्रणाली नाही. सत्याग्रह शास्त्राची सर्व दृष्टींनी परिपूर्ण अशी मांडणी मी केलेली नाही. मी करीत असलेल्या (सत्याच्या) या शोधाने तुमचे मन वेधून घेतले आणि तुम्हाला त्याची ओढ वाटली तर या माझ्या शोधात तुम्ही सहभागी होऊ शकता.” फक्त २७ वर्षांमध्ये गांधींनी भारताचे राजकीय आणि सामाजिक जीवन व्यापून टाकले होते.

१९१२ साली गांधींच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी ना. गोखले दक्षिण आफ्रिकेला गेले. आल्यावर त्यांनी लिहिले, “जी माणसे गांधींच्या प्रत्यक्ष सहवासात येतात त्यांनाच त्यांच्या व्यक्तिमत्वाची थोरवी कळून येते. गांधींची घडण ही ज्यामधून वीर किंवा हुतात्मे घडतात अशा द्रव्यातून झालेली आहे. इतकेच नव्हे आपल्या सहवासातील सामान्य माणसांनाही वीर व हुतात्मे बनविण्याची आत्मिक शक्ती त्यांच्यामध्ये आहे…” अहिंसेचे आणि सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान मांडून लढणाऱ्या गांधींची तुलना गोखल्यांनी वीर आणि हुतात्म्यांशी केली आहे. पण ते एवढ्यावरच थांबले नाही तर सामान्य माणसालाही वीर आणि हतात्मे बनविण्याची त्यांच्याकडे आत्मिक शक्ती आहे हे त्यांचे म्हणणे अधिक महत्त्वाचे आहे.

त्यावेळी एकीकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्वातंत्र्यासाठी लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली लढत होती. मर्यादित स्वायत्तता या मागणी पासून टिळकांनी काँग्रेसला ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ इथपर्यंत आणून ठेवले होते. दुसरीकडे अनेक क्रांतिकारकांचे गट हिंसक क्रांतीचे स्वप्न घेउन लढत होते. अनेक जातीपाती. धर्मपंथ, भाषा, वेष, संस्थाने यांमध्ये विखुरलेल्या, शेकडो वर्षांच्या गुलामगिरीने पिचलेल्या, परकीय सत्तांनी शोषण केल्याने दारिद्र्यात खितपत असलेल्या आणि वर्णव्यवस्थेने शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या या खंडप्राय देशात बलाढ्य इंग्रज सत्तेला रक्तरंजित क्रांती करून उलथवून लावता येणे कदापि शक्य नव्हते. याची जाणीव भगतसिंगासारख्या क्रांतिकारकांना होती. देश स्वातंत्र्याच्या प्रतीक्षेत होता पण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढण्याची वेगळी हत्यारे निर्माण होण्याची गरज होती. अशी हत्यारे, की जी या देशातील कोट्यवधी सामान्य माणसे, लहान-थोर, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, साक्षर निरक्षर हातात घेऊन लढतील. अशी हत्यारे, की जी समोरच्या शत्रूला आणि ही लढाई पाहणाऱ्या जगालाही अचंबित करतील. अशी हत्यारे, की जी शत्रूला खिळखिळे करतील आणि तरीही भयानक रक्तपातापासून परावृत्त करतील. गांधींनी ही पोकळी भरून काढली. ही हत्यारे हा गांधींचा केवळ राजकीय प्रयोग नव्हता तर एक अध्यात्मिक आणि नैतिक प्रयोगही होता.

बुद्ध आणि येशूचा पिंड असणाऱ्या गांधींनी आयुष्यभर संघर्षाचे राजकारण केले आणि तरीही ते या दोन महापुरुषांच्या रांगेत स्थानापन्न झाले. कारण राजकारण हे त्यांनी धर्मकारण मानले. राजकारणातून ते सत्याचा शोध घेत राहिले. सत्याचा शोध हाच त्यांचा ईश्वराचा शोध होता आणि हाच त्यांच्या धर्माचा अर्थ होता. आपल्या आत्मकथेच्या प्रस्तावनेत ते लिहितात, “माझ्या प्रयोगांमध्ये तरी आध्यात्मिक म्हणजे नैतिक, धर्म म्हणजे नीती, आत्म्याच्या दृष्टीने पाळावयाची नीती तो धर्म.” ‘गांधी’ या पुस्तकात नलिनी पंडित म्हणतात, “विश्वातील घडामोडींचे नियंत्रण करणारे एकमेव सर्वंकष शक्तीतत्व जर नैतिक असेल, तर जगातील भल्याबुऱ्या प्रवृत्तींच्या संघर्षात शेवटी सत्याचा जय होणार हे उघड आहे. गांधींच्या परिभाषेत ही शक्ती म्हणजेच सत्य किंवा परमेश्वर होय. विश्वशासनाच्या नैतिकतेचे तत्त्व, मनुष्यमात्राच्या सदभावनेवर व अंतःशक्तीवर अढळ विश्वास, जीवनातील सर्व तऱ्हेच्या अ-शिवाशी व अन्यायाशी झगडण्याची प्रेरणा आणि साधन शुचितेचा आग्रह हे गांधीजींच्या मानवतावादी तत्त्व विचारांचे चार मुख्य पैलू होत.”

१९४७ मध्ये माउंटॅबटन हे वेव्हेल यांच्या जागी व्हॉईसरॉय म्हणून आले. त्यांनी स्वातंत्र्याची योजना जाहीर केली पण फाळणी सहीत. नेहरू, पटेल आणि जिनांनी या योजनेला आधीच मान्यता देऊन टाकली. फाळणीला प्रखर विरोध करूनही शेवटी गांधींना फाळणी स्वीकारावी लागली. भयानक दंगे पेटले. या ज्वालामुखीत गांधींनी आयुष्यभर जोपासलेला मानवतावादी विवेक जळताना त्यांना बघावे लागले. द्विराष्ट्राच्या सिद्धांताचे मुळचे जनक सावरकर आणि जीना. ज्या हिंदुत्ववाद्यानी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणे तर सोडाच, त्याला विरोध केला, त्या हिंदुत्ववाद्यांनीही फाळणी थांबण्यासाठी आपले प्राण पणाला लावले नाहीत. उलट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने त्याचे खापर गांधींच्या माथ्यावर फोडले. नथुराम गोडसे या पुण्यातील मनुवादी माथेफिरूने गांधींचा खून केला. प्रार्थनास्थळी जाणाऱ्या नि:शस्त्र, कोणतेही संरक्षण नाकारणाऱ्या या अहिंसेच्या पुजाऱ्याच्या उघड्या कृश छातीवर त्याने एका नाही तर तीन गोळ्या झाडल्या. ‘हे राम’, ‘ एवढेच उद्वार काढून गांधी कोसळले. हा खून त्याने, ‘भारताची फाळणी गांधींमुळे झाली आणि त्यांच्या हट्टामुळे भारताला ५५ कोटी रुपये पाकिस्तानला द्यावे लागले म्हणून केला’ असे सांगितले गेले आणि आजही हिंदुत्ववादी हाच प्रचार करीत आहेत.

फाळणी तर सोडाच स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात नसतानाही याच नथूरामाने गांधींचा खून करण्याचे दोन प्रयत्न केले होते. नथूरामाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असणारे नाते आणि त्याने सावरकरांच्या घेतलेल्या भेटी या गोष्टी बोलक्या आहेत. गांधी खूनानंतर सारा देश आणि जग आक्रोश करीत असताना संघवाले पेढे वाटत होते आणि या खूनाची तुलना पुराणातील दैत्यांच्या वधाशी करीत होते. ‘गांधी-वध’ हा शब्द याचेच निदर्शक आहे. आजही संघवाले गांधी खूनाचे अत्यंत उघड समर्थन करतात, ‘मी नथुराम ‘बोलतोय’ सारखे कोणतीही कलात्मक मुल्ये नसणारे नाटक पोंक्षे सारखे भंगार अभिनेते घेऊन चालवतात. या सर्वांनी गांधींचा खून पचवला. पण गांधी मेले नाहीत. गांधी त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या रूपाने जगाला व्यापून राहिले. हिंदुत्ववादी निरनिराळ्या मार्गांनी गांधींचा खून करीत राहिले, आजही करीत आहेत, आणि गांधी मोठे होत राहिले, आणि आजही मोठे होत आहेत. ‘शरीर संपवले तरी आत्मा मरत नाही’ असे गांधींची ज्या गीतेवर श्रद्धा होती ती गीता सांगते. आत्मा या शब्दाचा तत्त्वज्ञान असाही अर्थ श्री कृष्णाला अभिप्रेत असावा. वेद आणि गीता घेऊन नाचणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना ना वेद कळले ना गीता कळली, त्यांना फक्त मनुस्मृती कळली कारण ती त्यांच्या स्वार्थाची जपणूक करणारी मांडणी होती. गांधी त्यांच्या स्वार्थाच्या आड आले होते. गांधींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सर्व जाती, लिंग आणि धर्माच्या लोकांना आणले.

सुरुवातीला जन्माधिष्टीत वर्णव्यवस्थेला विरोध करून कर्माधीष्ठीत वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करणारे गांधी पुढे अस्पृश्यता निवारण आणि जातीअंताच्या भूमिकेवर येऊन पोहोचले. एक वैश्य देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा निर्विवाद नेता बनतो, या लढ्यातील ब्राम्हणांची मक्तेदारी संपवतो, रक्तपाताविना हा लढा यशस्वी करतो, देशाची राष्ट्रपती एखादी अस्पृश्य मुलगी व्हावी असे स्वप्न पाहतो, स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर या अस्पृश्याचा समावेश व्हावा आणि राज्यघटना त्यांनी लिहावी असा आग्रह धरतो, आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जन्माला आलेली, लोकशाही, समता, न्याय, विज्ञाननिष्ठा आणि धर्मनिरपेक्षता या मुल्यांवर आधारलेली घटना देश स्वीकारतो. मनुवादावर आधारित हिंदू राष्ट्राचे स्वप्न धुळीला मिळते. हे सारे गांधी नावाच्या एका माणसामुळे घडले होते. देशातील मनुवादी ब्राम्हणांच्या शतकानुशतकांच्या स्वप्नांचा चुराडा गांधी करून गेले. आपल्या तत्त्वज्ञानाच्या विरोधी तत्त्वज्ञान मांडणाऱ्यांशी तत्त्वाने न लढता कपटाने आणि हिंसेने लढण्याची परंपरा मनुवाद्यांनी पुन्हा एकदा पाळली आहे…

मजबुती का नाम महात्मा गांधी
गांधी कभी मरते नही

Leave A Reply

Your email address will not be published.