गाईचे पोषण बाईचे शोषण

0 511

गाईचे पोषण बाईचे शोषण

 

 

विनोद पंजाबराव सदावर्ते
समाज एकता अभियान
रा. आरेगांव ता.मेहकर
मोबा : ९१३०९७९३००

भारतात सध्या अशी परिस्थिती झाली आहे की खोट, काल्पनिक व मनाला चांगले वाटणारे बोलले तर ते संस्कार आणि सत्य बोलले तर तो देशद्रोही वा विरोधी अशी प्रतिमा निर्माण केली जाते. मनीपुर ची घटना ही माणुसकीला काळीमा फासून मन हेलावून टाकणारी आहे. भारतात स्त्रिला देवी पुजले जाते, स्त्रीला संस्कृती, संस्कार, संसार, ज्ञान, संगित, भरभराटीचे प्रतिक माणले जाते. परंतु केवळ हे कागदोपत्री व बोलण्यासाठीच मर्यादित झालेले आहे. धर्माच्या नावाखाली स्त्रिला देवी माणायचे आणि त्याच देवीवर बलात्कार करायचा आणि नग्न धिंड काढायची हि संस्कृती आहे तरी कोणती? डोक्यात विषमतेची घाण, स्त्रिला फक्त उपभोगाच साधन समजणारे नराधम नेमक्या कोणत्या धर्माचे असतात? महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. एकीकडे विश्वगुरुचे खोट व काल्पनिक बोलुन स्वप्न बघणारे आणि धर्माचे राष्ट्रव्हावे असे बोलणारे लोक महीला अत्याचारा विरोधात गप्प बसतात याचाच अर्थ त्यांचे मुख समर्थन त्या घटनेला असते. धर्माच्या नावाखाली माणुसकी, प्रामाणिक पणा व संस्कार नष्ट करून केवळ विकृती पेरण्याचे काम देशात सुरू आहे. भगव्या रंगाची बिकणी घातली आणि बेशरम रंग गाणे जे मनोरंजनासाठी गायले गेले. त्या रंगाचा संबध धर्माशी जोडून, धर्म धोक्यात आहे, धर्माचा अवमान झाला म्हणून थयथयाट करणारे लोक महिला अत्याचाराच्या विरोधात एकही शब्द बोलत नाहीत. अशा वेळी धर्म धोक्यात येत नाही का? धर्माच्या नावाखाली गाईचे पोषण करून गाईला माय माणणारे जेव्हा खऱ्या मायवर अन्याय अत्याचार होतो तेव्हा गप्प बसतात आणि गाईवर थोड जरी बोलले तरी भडकून उठतात हे संस्कार कोणी दिले असतील? प्राणी मात्रावर प्रेम करून आपुलकी प्रत्येकाने दाखवावी यामध्ये कुठेही दुमत नाही पण गाईचा संबंध धर्माशी जोडून गाईच्या पोषण व संरक्षण व्हावे म्हणून रस्त्यावर येणारे लोक बाईच्या शोषणाच्या वेळी गप्प बसतात हि खरी शोकांतिका आहे.

हजारो वर्षापासून बाईला गुलाम व उपभोगाच साधन समजून बंदिस्त केले होते भारतीय संविधानाने स्त्रिला माणुस म्हणून मुक्त व संरक्षित जिवन जगण्याचा अधिकार दिला. परंतु अशा नराक्षम लोकांमुळे महिला पुन्हा असुरक्षित झालेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये धर्म आणि धर्माचे राजकारण केले जात असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. सर्व देवाची लेकरे आहे म्हणायचे आणि धर्माच्या नावाखाली येथे लेकरा लेकरात भांडणे लावायची, लेकरालेकरात द्वेष निर्माण करण्याची शिकवण नेमक्या कोणत्या देवाची व धर्माची आहे. जर द्वेष करणे, भेद करणे हे देवाची व धर्माची शिकवण नाही तर आज राजकारण आणि समाजकारण याच मुद्यावर चालले आहे मग हे राजकारणी धर्म विरोधी आहेत असे मात्र एकही धर्मगुरू बोलत याचा अर्थ काय काढायचा? महिलेवर बलात्कार करून नग्न करून धिंड काढली जाते, महिलेची हत्या करून, बारीक तुकडे करून, कुकर मध्ये शिजवून मिक्सर मध्ये बारीक केले जाते अशा वेळी गायीचा धर्माशी, रंगाचा धर्माशी, प्रेमाचा धर्माशी संबध जोडून जोरजोरात ओरडणारे लोक महिलेला धर्माची माणतच नसतील तर तो धर्म कोणाच्या फायद्याचा? धर्माच्या नावाखाली लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नाही म्हणून गाईला माय म्हणायचे. जर गाईला माय म्हणले नाही किंवा बैलांना बाप बोलले तर धार्मिक भावना दुखावल्या जातात. परंतु जेव्हा महिलांवर अत्याचार होऊन अमानवीय व कृत्य केले जाते तेव्हा मात्र ना कँडलमार्च, ना आरोपींना शिक्षा ना कायद्यात बदल साठी आंदोलन होत ना मागणी होत. परंतु महिला उच्च वर्णातील असेल तर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, वेळप्रसंगी कायद्यात बदल करावा यासाठी देशभर गोंधळ केला जातो. परंतु जेव्हा बाई खालच्या जातीतील असेल तेव्हा मात्र कोणी आवाज उठवत नाही आणि कोणी आरोपींच्या विरोधात बोलत नाही असे चित्र असताना सर्व जन एकाच देवाची लेकरे आहेत हे कसे म्हणतात येईल. जेथे देवा धर्माचा व भावनेचा व श्रद्धेचा उपयोग स्त्रियांच्या संरक्षणासाठी, स्त्रियांच्या न्यायासाठी होत नाही तो धर्म आणि देव असला काय नसला काय महिला तर संकटात आहे. नराधम तर लचके तोडत आहेत. आणि धर्माचे ठेकेदार त्यांना पाठीशी घातल आहेत. मनीपुर चे मुख्यमंत्री स्वतः म्हणतात हि पहिली घटना नाही. अशा शंभरच्या वर घटना घडल्या आहेत. याचा अर्थ आरोपीची एवढी हिंमत का वाढत आहे? त्यांना पाठीशी कोण घालत आहे? बाईवर अत्याचार करण्याची शिकवण कोणत्याही धर्माची नसेल तर अत्याचार करणारा आणि अत्याचार करण्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन देणारे धर्म विरोधी असायला पाहिजे परंतु आज पर्यंत महिला हि खालच्या जातीतील असेल आणि आरोपी वरच्या जातीतील असेल तर कोणीच असे बोलले नाही हा आरोपी धर्म विरोधी आहे, असे कृत्य धर्माला मान्य नसताना याने केले म्हणून हा धर्मद्रोही आहे असे कोणीच बोलण्याची हिंमत करत नाहीत. परंतु गाईचे मांस आहे अशा संशयावरून येथे हत्या होतात. बाईचे हत्या करणारे आरोपी, बलात्कारी, नराधम यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संरक्षण दिले जाते. बिलकिसबाणो प्रकरणातील आरोपींचे स्वागत करणारी संस्कृती नेमकी कोणत्या धर्माची आहे? जर ती धर्माची संस्कृती नसेल तर धार्मिक लोकांनी विरोध का नाही केला? सत्कार करणाऱ्या लोकांना धर्मद्रोही का नाही घोषित केले. याचा अर्थ धर्माचे केवळ राजकारण करायचे आणि धर्मातील आरोपींना संरक्षण द्यायचे यालाच जर कोणी धर्म म्हणत असेल तर तो धर्म आणि संस्कृती लयास जात आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. इकीकडे संस्कृती व संस्कार लयास जाताना धर्माच्या नावावर राजकारण करून धर्मातील आरोपींना वाचवण्याचे कटकारस्थान करणारे लोकांना धर्म केवळ पद प्रसिध्दी सत्ता व पैसा मिळवण्याचे माध्यम वाटत आहे. म्हणून धर्माच्या नावावर राजकारण केले जाते, धर्माच्या व गाईच्या नावावर वाद निर्माण केले जातात. परंतु आपले वर्तन व विचार धर्मानुसार असायला पाहिजे याची शिकवण कोणी देत नाही. धर्माचे व माणुसकीचे विचार पेरून समता, एकी व आपुलकी कशी साधावी यावर कोणी बोलत नाही. धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवणारे मोठमोठे हब निर्माण केले जातात त्याचा संदर्भ धर्माशी जोडला जातो. परंतु संस्कार आणि संस्कृती याचा संबंध धर्माशी जोडला जात नाही, गाईचा संबंध धर्माशी जोडला जातो म्हणून तिला माय, देव म्हणून पुजा करा, रक्षण करा, पोषण करण्याचे सल्ले दिले जातात, गाईचे महत्त्व पटवून दिले जाते परंतु हे करणारे लोक बाई अर्थात स्त्रि ही विश्वाची जननी आहे, तिच खऱ्या अर्थाने संसार व संस्कृती ची जननी आहे, स्त्रिचा सन्मान व्हायला पाहिजे, स्त्रिवर अन्याय अत्याचार करणारे, त्यांचे समर्थन करणारे लोक धर्माचे नसुन ते अधर्मी आहेत असे बोलण्याची धर्मगुरू हिंमत करतील का? आज पर्यंत कोणी केली नाही, परंतु मुळ मुद्दा हा आहे सरकार अशा वेळी करते तरी काय? मनीपुर हे फक्त उदाहरण म्हणून आहे कारण महिलांच्या अत्याचाराच्या घटना दररोज घडत आहेत. परंतु खुप कमी घटना मध्ये धर्माचा दाखला देऊन आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली जाते. जसे निर्भया दिल्ली, हल्लीचे प्रकरण म्हणजे श्रद्धा हत्याकांड याला धार्मिक वळण देऊन आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी अनेक जन रस्त्यावर उतरले परंतू त्या नंतरही अनेक भयंकर घटना घडल्या परंतु विरोधाची ती तिव्रता दिसली नाही. शंभराहून अधिक प्रकरणे जर मनीपुर मध्ये घडले असतील तर नेमके हे प्रकरण कोणी आणि कशासाठी दाबली असतील? आरोपींना पाठीशी घालणे हा कोणाचा धर्म आहे किंवा कोणत्या धर्मात हे मान्य केले आहे कि आपल्या धर्मातील आरोपीं विरोधात बोलु नका. विषय खुप चिंताजनक व मन हेलावून टाकणारा आहे. धर्माच्या नावाखाली लोक लोक संस्कृती संस्कार विसरून धर्मालाच अधोगती कडे नेत आहेत. आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी सरकार असे प्रकरणे दाबत आहे. महिलेला जो पर्यंत महिला म्हणून सन्मान मिळणार नाही, जातीमध्ये महिलांची ओळख करणे बंद होणार नाही तोपर्यंत महिलांवरील अन्याय अत्याचार बंद होणार नाहीत. जसे गाईला माता म्हणले जाते. परंतु देशी गाईलाच माता म्हणायचे का इतरही प्रजातीतील गाईंना माता म्हणायचे या मध्ये गोरक्षण धर्मरक्षक भेद करत नाहीत कोणत्याही गाईला ते माता माणतात. तसेच प्रत्येक महिलेमध्ये देवी, लक्ष्मी म्हणून आदर निर्माण का होत नाही? गाईला काही झाले तर भारतभर वादंग निर्माण करणारी यंत्रणा बाईला काही झाले तर थंड होऊन बसते हीच तर धार्मिक व नैतिक गुलामी आहे. म्हणून गाईला महत्त्व देणारे बाईचा सन्मान करू शकत नाहीत ही शोकांतिका आहे. विषय खुप गहन असला तरी मतीतार्थ लक्षात घेणे आवश्यक आहे. धर्म, इतर धार्मिक बाबी ह्या केवळ राजकारण व पोटभरण्यासाठी आहेत. स्त्रियांचा उद्धार, व संरक्षण केवळ संविधानच करू शकते. म्हणून स्त्रियांनी स्त्रियांसाठी का होईना संविधानाची जनजागृती करणे आवश्यक आहे. नाहीतर येथे गाईला माता म्हणून बाईचे लचके तोडणारे कमी होणार नाहीत कारण त्यांच्या मागे बेगडी धर्माच्या राजकीय शक्तीचा हात असतो. म्हणून ते गाईला माता म्हणु शकतात परंतु स्त्रीला माय बहीण समजू शकत नाहीत कारण धर्माच्या अतिरेकांमुळे संस्कार नष्ट होताना दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.