डाॅ. बाबासाहेब आंबेडकर धर्माचे नव्हे कर्माचे महानायक

0 127

डॉ बाबासाहेब आंबेडकर धर्माचे नव्हे कर्माचे महानायक

 

✍🏻 विनोद पंजाबराव सदावर्ते
समाज एकता अभियान
रा. आरेगांव ता. मेहकर
मोबा: ९१३०९७९३००

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशातीलच नव्हे जगातील एक विद्वान व्यक्तिमत्व व अष्टपैलू गुणवत्ता असलेले महान व्यक्ती होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण, कायदा, अर्थशास्त्र, कृषी, ऊर्जा, जल अशा विविध क्षेत्रात काम करत असलेले एकमेव जागतिक विद्वान होत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अखिल मानव जातीला एकत्र करून, एक समान मानून, समान संधी निर्माण करून देऊ शांतता प्रस्थापित करून देशाचे ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वात मोलाचे आहे. परंतु दोन वर्षापासून विषमता व जातीवाद लोकांच्या मनामध्ये भिनलेला आहे. म्हणून आंबेडकरांचे कर्म न पाहता, फक्त महार जातीत जन्माला आलेले म्हणून त्यांच्या कार्यावर बोलू न शकणारे, त्यांनी केलेले जनकल्याण विसरणारे, अनेक जातीवादी, धर्मद्वेषी लोक समाजामध्ये आहेत. म्हणून त्यांनी कधी बाबासाहेब वाचले नाही व समजून घेतले नाही. आजची परिस्थिती बघितली तर शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी महिला सर्वजण अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. या समस्या वरती उपाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळेस सांगितलेले आहेत. परंतु सरकार जनकल्याणकारी नसल्याने त्याची अंमलबजावणी होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांचे, महिलांचे, कामगारांचे, शेतमजुरांचे नेते होते याची जाणीव लोकांना नाही. शेतकऱ्यांची खोती पद्धत बंद करून शेतकऱ्यांचे शोषण थांबवण्याचे महत्त्व पुर्ण काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. कामगारांचे कामाचे तास सोळा तासावरून बारा तासावर आणि बारा तासावरून आठ तासावर आणण्याचे सर्वात मोठे काम बाबासाहेब आंबेडकरांचे आहे. महिलांचा मानसन्मान हक्क अधिकार व अस्तित्व बहाल करणारे, समान वेतन समान, समान नोकरी अशा प्रत्येक ठिकाणी सन्मान बहाल करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच. परंतु जातीच्या विचारांनी बरबटलेल्या लोकांनी अजूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेतले नाही. जातीमध्ये बंदिस्त केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण कार्य मग शेतकरी आंदोलन असेल, महिलांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन असेल, सामाजिक न्यायासाठी आंदोलन असेल, शेतमजूर, कामगार, कामगारांसाठी आंदोलन असेल, भारतीय संविधानाचे कार्य असेल हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मात असतानाच केले. परंतु खालच्या जातीतील लोकांनी वरच्या जातीतील लोकांना शिकवू नये, किंवा खालच्या जातीतील लोकांनी वरच्या जातीतील लोकांना शिकवले, त्यांचे ऐकले तर पाप लागते या पाखंडी विचारामुळे बाबासाहेबांचे विचार डोक्यात गेले नाहीत. म्हणून आजही लोकांच्या डोक्यातुन अंधश्रद्धा, अज्ञान, पाखंड हे टिकुन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्वाभिमान सन्मान, विद्वत्ता, तर्कवाद आणि ज्ञानाचे भांडार होय.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन देशाला सर्वोत्तम जल पर्यटन मिळण्यासाठी नद्या जोड प्रकल्पाची संकल्पना समोर मांडली. परंतु तत्कालीन सरकारने त्यावरती लक्ष दिले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नद्या जोड प्रकल्पाच्या मागचा उद्देश हा फक्त शेतीला पाणीपुरवठा करणेच नव्हे, तर शेतीला जोडधंदा निर्माण करून शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंच करण्याचा प्रयत्न होता. नद्या जोड प्रकल्पाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जल विद्युत निर्मिती केंद्र उभारणे, आणि वेगवेगळ्या ठिकाणी जल पर्यटन केंद्रे निर्माण करणे, हा उद्देश होता. नद्या वरती अनेक ठिकाणी सरकारच्या मालकीची विद्युत निर्मिती केंद्र असल्याने देशाला स्वस्तच नव्हे तर जगातील सर्वात स्वस्त वीज मिळणार होती. पर्यटनाच्या माध्यमातून विदेशी चलन भारतामध्ये मोठ्या प्रमाणात येऊन देशाची आर्थिक उन्नती होणार होती. तसेच काही ठिकाणी पूरग्रस्त व काही ठिकाणी कोरडा दुष्काळाची समस्या कायमची संपुष्टात येणार होती. असा दृष्टिकोन या नद्या जोड प्रकल्पाच्या मागे होता. महिलांचे न्याय, हक्क अधिकार सन्मान असेल ,संपत्तीमध्ये वाटा असेल, महिलांना निवडणुकीमध्ये मताधिकार असेल, या गोष्टी बाबासाहेबांनी मोफत देऊन महिलांचा सन्मान वाढविला. एवढेच नव्हे घरामध्ये महिलांना अगोदर जेवणाची मुभा नसताना सुद्धा पुरुषांप्रमाणे नोकरी, व पुरुषां इतकाच पगार मिळण्याची संधी बाबासाहेबांनी निर्माण करून दिली. असे सर्व घटकांचा विचार करून त्या घटकांचा कायमस्वरूपी विकास व्हावा व पुन्हा तो घटक समस्याग्रस्त होऊ नये, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही जाती धर्माला महत्त्व दिले नाही. परंतु धर्माच्या नावाखाली माणसाचे शोषण होत असेल, अनिष्ट रूढी, परंपरेच्या नावाखाली शारीरिक व मानसिक हानी होऊन अज्ञान, अंधश्रद्धा व पाखंड पेरले जात असेल, तर या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी मान्य केला नाही. धर्माच्या नावाखाली माणसा माणसात भेद करून माणसाला विकासापासून व संधी पासून दूर ठेवण्याचे काम केले जात असेल, तर हे सुद्धा बाबासाहेबांनी मान्य केले नाही. बाबासाहेबांनी समता विज्ञानवाद सामाजिक हक्क, अधिकार आणि न्याय दिला तर कोणत्याही धर्माचे नुकसान झाले नाही. आणि ह्या गोष्टी बहाल करताना ज्या लोकांना बाबासाहेबांनी आमच्या धर्माला विरोध केला असे वाटत असेल तर तो धर्म विषमता, अज्ञान, पाखंड यावरती असून जातीची उतरंड कायम ठेवुन, खालच्या जातीतील लोकांना हक्क अधिकार व संधी नाकारतो हीच सिद्ध होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक वेळेस ठणकावून सांगितले मी प्रथम भारतीय व अंतिमही भारतीयच आहे. आणि तसे काम सुद्धा त्यांनी केलेत. परंतु बाबासाहेबांना लोकांनी अजूनही समजून घेतले नाही आणि स्वतःचे अज्ञान दाखवून बाबासाहेबांना एका जातीमध्ये आणि धर्मामध्ये बंदिस्त करण्याचे काम आजही होत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांच्यासाठी काम केले त्याच लोकांना त्याच समूहाला जाणीव नाही. आज महिला हक्क, अधिकार,प्रसुती रजा, समता, मानसन्मानाच्या गोष्टी करतात तेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेचपण किती महिला व लोकांना याची जाणीव आहे. एकीकडे पायातील काटा काढल्याची जाणीव ठेवायला शिकवणारी भारतीय संस्कृती, आणि दुसरीकडे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांचे जीवन सोन्याने मढवून देशात राजा होण्यास हक्क अधिकार बहाल केला. त्याच महापुरुषांबद्दल जाणीव नसेल ही संस्कृती आहे तरी कोणाची? आम्ही जात धर्म मानत नाही असे म्हणणाऱ्या लोकांनी अजूनही बाबासाहेबांचे विचार व कार्य समजून घेतले नाहीत, व बाबासाहेबांचे पुस्तके व फोटो ही घरात लावले नाहीत तर त्याला काय म्हणावं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आजही देश चालला तर प्रत्येकाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य व विचार समजून घेणे गरजेचे आहे. आणि हे समजून घेताना माणसाच्या अधोगतीला कारणीभूत असलेले अज्ञान, अंधविश्वास, पाखंड याला कुठेही धारा नाही. आणि म्हणून अनेक लोकांना बाबासाहेबांच्या विचारांमध्ये व कार्यामध्ये अंधविश्वास अज्ञान पाखंडी आणि विषमता दिसून येत नाही. म्हणून ते विचार पटतही नाहीत. परंतु आज देशाला पुन्हा एकदा सावरायचे असेल तर बाबासाहेबांच्या कार्याची व विचारांची पेरणी समाजामध्ये करणे आवश्यक आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण देशाला सुख, समाधान, समृद्धी शिक्षण सामाजिक न्याय हे सर्व फक्त दिलेले आहे. आणि आज या समोरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. हे प्रश्नचिन्ह सोडवायचे असेल तर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच यावरती उत्तर आहे. आणि म्हणून जाती-धर्माची घान डोक्यातून काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य लक्षात घेऊन प्रत्येक भारतीयांनी वागणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृती जगात चांगली आहे याचा डोंबारा पिटणारी, आणि लोक आम्ही जाती धर्माला मानत नाही तर त्याच्या कलागुणांना व विद्वत्तेला मानतो असे म्हणणारे लोक मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कला, गुणविद्वत्ता अखिल जगाने मान्य केलेले असताना ही बाबासाहेब आंबेडकर भारत देशातच दुर्लक्षित आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य समाजामध्ये जाणार नाहीत यांची पूर्ण व्यवस्था निर्माण केली आहे. म्हणून आपण व्यवस्थेला फटकारून बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य आत्मसात करून घेणे आवश्यक आहे. तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे धर्माचे नव्हे तर कर्माचे आहेत याची जाणीव देशाला होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.