मूकनायक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

0 521

गावातील घाण साफ करत करत लोकांच्या मस्तकातील घाण साफ करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज हे लोकांना म्हणत की, आजपर्यंत देव कोणचं पाहायला नाही, देव पहायची वस्तू नाही, पण जर देवचं माणायचं असेल तर भिमराव रामजी आंबेडकरांना देव माना कारण त्यांनी या देशाला राज्यघटना दिली. त्या बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेमधील इंदूर जिल्ह्यातील महू या गावी झाला होता. लोक त्यांना भिमराव, भिवा, बोधीसत्व, भीम या नावानेही ओळखतात. त्यांचे वडील रामजी, आई भिमाबाई तर पत्नी रमाई आंबेडकर होत्या.
बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा जोतिबा फुले, थाॅमस स्पेन, अंब्राहम लिंकन, नेपोलियन बोनापार्ट यांच्या विचारांचा प्रभाव होता. तसेच त्यांनी शिवजयंतीचे जनक महात्मा जोतिबा फुलेंना गुरू मानले होते. बाबासाहेबांना शिक्षणासाठीची मदत ही कोल्हापूर संस्थानचे राजे छत्रपती शाहू महाराजांनी करून ते दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर हत्तीवरून साखर वाटली होती. तसेच कॉलेजच्या शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रु.२५/- दरमहा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती.’ब्रिटिश भारतातील प्रांतिक अर्थव्यवस्थेची उत्क्रांती’ हा बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ लंडनच्या प्रकाशकाने प्रसिद्ध केला. तेव्हा आपल्याला उच्च शिक्षणासाठी मदत केल्याबद्दल बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांना बाबासाहेबांनी हा ग्रंथ अर्पण केलेला आहे.
आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या. त्यांना मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, पाली, संस्कृत, बंगाली, जर्मन, फ्रेंच, कन्नड व पारशीया भाषांचे ज्ञान अवगत होते. तसेच आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. नंतरच्या जीवनात त्यांनी राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले होते. तसेच त्यांनी वृत्तपत्रेही प्रकाशित केली त्यात इ.स. १९२० साली त्यांनी मुंबईत मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले त्यावेळी शाहू महाराजांनी त्यांना २००० रुपयाची आर्थीक मदत दिली होती. तसेच बहिस्कृत भारत १९२७, समता १९२८, प्रबुध्दभारत १९५६ तसेच जनता १९३० रोजी स्थापण करून इ.स. १९४४ मध्ये बाबासाहेबांनी “आम्ही शासनकर्ती जमात बनणार” या शीर्षकाखाली जनता वृत्तपत्रात लेख लिहिला होता. तसेच मुकनायक व बहिस्कृत भारत मधील जास्तीत जास्त संपादकीय लेख त्यांचेच असून ते एक महान पत्रकार होते.
बाबासाहेबांनी २० मार्च १९२७ रोजी आपला मोर्चा चवदार तळ्याकडे वळवून सर्वप्रथम तळ्यातील पाणी ओंजळीने प्यायले, त्यानंतर त्यांच्या अनुयायांनी त्यांचे अनुसरण केले. ही घटना काही विकृतींना रुचली नाही. त्यामुळे ‘अस्पृश्यांनी तळे बाटवले’ असे म्हणून त्यात गायीचे शेण व गोमूत्र घालून तळ्याचे ब्राह्मणांकडून शुद्धीकरण केले. पण तलावातील पाणी जनावरांनी प्याले असता ते अशुद्ध होत नाही. अस्पृश्यांनी स्पर्श केला असता अशुद्ध होते. तसेच आज काही मंदीरंही महीलांच्या प्रवेशाने अपवित्र होतात म्हणून काही मंदीरे धर्ममार्तंडाकडून गोमुत्राने किंवा दुधाने धुऊन शुध्द करण्यात येत आहेत. म्हणजेच अशुद्धता मानवी विष्ठा भक्षणकरणा-या गाईच्या मुत्राने व दुधाने दूर होते का ? असा सवाल बाबासाहेबांनी निर्माण केला होता.
मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे. म्हणून मनुस्मृतीचे २५ डिसेंबर इ.स. १९२७ रोजी समारंभपूर्वक जाहीरपणे दहन करताना बाबासाहेबांनी एक ६ इंच खोलखड्डा आणि एक अर्धा फुट चौरस खड्यात चंदनाच्या लाकडांची तुकडे टाकून भरण्यात आली होती. सभेतील मंडपाच्या चारही कोपऱ्यांवरतील खांबांवर फलक बसविले होते. ज्यावर ‘मनुस्मृतीची दहन भूमी’, ‘अस्पृश्यता नष्ट करा आणि ब्राह्मणवाद गाडा’ असा मजकूर होता. त्यानंतर सरणावर मनुस्मृती ठेऊन तिचे दहन करण्यात आले होते.
बाबासाहेबांनी इ.स. १९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस अविरत कष्ट करून हिंदू कोड बिल तयार करून ०५ फेब्रुवारी इ.स. १९५१ रोजी संसदेत मांडले. परंतु अनेक हिंदू सदस्यांनी या बिलाला विरोध केला तेव्हा बाबासाहेबांनी भारताचे कायदेमंत्री पदाचा राजीनामा देताना म्हटले होते की, ‘समाजातल्या वर्गावर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातली असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगावर राजमहाल बांधण्यासारखे होय.’
बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक संघटना स्थापन केल्या त्यात समता सैनिक दल, स्वतंत्र मजूर पक्ष, डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी, शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट, भारतीय बौद्ध महासभा व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. तसेच बाबासाहेबांनी २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ ची स्थापना करून सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी जागा आरक्षित ठेवण्यासंबंधी तसेच भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती तसेच सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्याची मागणी केली होती.
बाबासाहेब एक उत्तम वकीलही होते. ऑक्टोबर इ.स.१९२६ मध्ये आंबेडकरांनी काही महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता ब्राह्मण तीन गैर-ब्राह्मण नेते के.बी. बागडे, केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर यांच्यावर ब्राह्मणांनी देश उद्ध्वस्त केला अशा आशयाची पत्रके लिहिली होती म्हणून त्या तिघावर खटला भरण्यात आला होता. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल.बी.भोपटकर होते. आंबेडकरांनी आपला खटला अतिशय विश्वासाने लढला, व प्रशंसनीय बचाव केला आणि खटला जिंकला होता.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेजस्वी तत्वज्ञानामुळे अनेक लोक प्रभावित झाली त्यामध्ये संत गाडगे महाराज, रावसाहेब कसबे, अमर्त्यसेन, मायावती, कांशीराम, पंजाबराव देशमुख, वामनजी मेश्राम, पुरूषोत्तम खेडेकर, गंगाधर पानतावणे, राजा ढाले, नामदेव ढसाळ यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. तसेच कोल्हापुरमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जगातील पहीले स्मारक भाई माधवराव बागल या एका मराठा समाजातील व्यक्तीने उभे केले होते. तसेच गंगाधर पानतावणे यांनी १९८७ साली भारतात पहिल्यांदा बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर पी.एच.डी. साठी शोधप्रबंध लिहिला. त्यांनी त्यांच्या ग्रंथात म्हटले आहे की, ‘या मुकनायकाने बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले.’


‘कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते.
ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते.’
दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार बाबासाहेबांनी केला.१९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला, व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.१९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना बोधिसत्व ही बौद्ध धर्मातील उपाधी प्रदान केली.
बाबासाहेब आंबेडकर यांना देव माना म्हणा-या गाडगेबाबा आणि आंबेडकरांचे नाते हे विचारांचे होते, ते रक्ताच्या नात्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ होते हेच आजच्या बहुजन समाजाने समजून घेणे आवश्यक आहे.
इ.स. १९९० साली बाबासाहेबांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला गेला. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतित उभी राहिली आहेत.
गाडगेबाबांनी बाबासाहेबांबरोबर जे विचारांचे नाते जोपासले ते नाते आपण सर्वांनी महापुरुषांच्या विचारांशी जोपासले तर ख-या अर्थाने मुकानायकाच्या जयंतीदिनानिमित्त हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल …!


‘असलो जरी ‘मराठा’ जयभिम बोलतो मी,
शिवबासमान बाबासाहेबांना जानतो अन् मानतो मी,
दोघांस लावू नका कोणती प्रजाती,
सुर्यास नसते जात हे सत्य सांगतो मी …!’

 

रेपे नवनाथ दत्तात्रय
मो. ९७६२६३६६६२

Leave A Reply

Your email address will not be published.