तुमच्या पापांचा घडा भरलाय छगनराव ! – डॉ. रंगनाथ श्रीरामराव काळे यांचे छगन भुजबळांना पत्र

0 528

तुमच्या पापांचा घडा भरलाय छगनराव!

– डॉ. रंगनाथ श्रीरामराव काळे यांचे छगन भुजबळांना पत्र

 

 

बीड : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाली यासाठी मनोज जरांगे आंदोलन करीत आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षणावर छगन भुजबळ विरोध करत असल्याने त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याची जाणिव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना झाल्याने त्यांनी छगन भुजबळ यांना लोकसभेचे तिकीट देण्याऐवजी नारळ दिल्याने छगन भुजबळ यांना या लोकसभा निवडणुकीतून काढता पाय घ्यावा लागला आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर डॉ. रंगनाथ श्रीरामराव काळे यांनी छगन भुजबळांना यांना एका पत्राच्या माध्यमातून त्यांचा गेम करणारे मास्टरमाईंड नेमके कोण? याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे. हे  पत्र सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने मोठी चर्चा सुरू आहे.

डॉ. रंगनाथ श्रीरामराव काळे यांनी छगन भुजबळांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात ते नेमकं काय म्हणालेत ते पाहु

 

प्रति,

छगनराव

हल्ली मुक्काम येवला

 

तुमच्या पापाचे ओझे एकट्या मनोज जरांगे-पाटील यांच्या खांद्यावर ठेवु नका, तुमचा खरा गेम एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी केला आहे.. !

तुम्ही मनोज जरांगे-पाटील यांना थेट अंगावर घेण्याचा प्रयत्न केला कारण तुम्हाला दाखवायचे होते की तुम्ही एकटेच ओबीसी चे तारणहार आहात, पण मग “आमच्या पक्षाचा DNA ओबीसी आहे” हे उघडपणे सांगुन ओबीसी चा एकमेव नेता बनण्याचा प्रयत्न करणा-या फडणवीस यांना ते थोडी आवडणार होतं?

मोठ्या पवारांसोबत राहुन तुम्ही त्यांच्या वर कुरघोड्या केल्यात, आणि मंत्रालयातील मिटींग मध्ये खुद्द अजितदादा सोबत खडाजंगी केलीत, मग अजित दादा सारखा माणूस तुम्हाला असाच मोकाट सोडणार का? वेसन तर घालणारच ना.. ! हा माणुस आपल्या सोबत राहील की भाजपमध्ये जाईल असे प्रश्न अजितदादा च्या मनात आले असतील.. ! त्यांनी बरोबर विकेट घेतली तुमची.. !!

स्वतः गृहमंत्री असताना ज्यांचे बोट धरून मोठं झालात त्या वडिलांप्रमाणे असलेल्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याची तुमची घोडचुक तुम्ही विसरला असाल, बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे कसे विसरतील? तुम्हाला धडा शिकवण्याची संधी एकनाथ शिंदे साहेब सोडतील का?

एकंदरीत काय तर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांनी मिळून तुमच्या असुरी महत्वाकांक्षेला वेसन घातली आहे ! तुमच्या पापांचा घडा भरलाय छगनराव !

उरला प्रश्न श्री मनोज जरांगे-पाटील यांचा तर तुम्ही थेट त्यांना अंगावर घेऊन तुमचे शंभर अपराध पुर्ण केलेच होते ! त्यासाठी तुम्ही मैदानात उतरायलाच हवे होते मग मनोज जरांगे-पाटील या नावाची ताकत तुम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळाली असती ! पण त्याआधीच तुमचा गेम झाला, तिकीट वाटतानाच तुम्हाला नारळ मिळाला.. !!!

जयोस्तु अखंड मराठा!!!”

डॉ. रंगनाथ श्रीरामराव काळे पाटील

माजलगाव

हल्ली मुक्काम छ. संभाजीनगर

Leave A Reply

Your email address will not be published.