ईव्हीएम… गिरीश कुबेर यांच्याकडून बालीश प्रश्‍नांची नौटंकी…आणि उद्धव ठाकरे…!

ईव्हीएममुळे घोटाळा होतो, हे गिरीश कुबेर यांना माहित नाही का ? त्यांना माहित आहे, मात्र आपली व्यवस्था कायम टिकून रहावी यासाठी त्यांचा खटाटोप असतो. म्हणून उलट ईव्हीएम कसा चांगला आहे याचाच अंडरकरंट त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता.

0 47

ईव्हीएम… गिरीश कुबेर यांच्याकडून बालीश प्रश्‍नांची नौटंकी…आणि उद्धव ठाकरे…!

 

दिलीप बाईत

 

‘लोकसत्ता जनसंवाद’अशा टॅगलाईनखाली लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर व त्यांच्या टीमने राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. त्या मुलाखतीत गिरीश कुबेर यांनी ईव्हीएमच्या मुद्यावर काही बालीश प्रश्‍नांची नौटंकी केली, त्यावरून ईव्हीएमविरोधी मुद्दा कसा ब्राम्हण-बनिया मीडियाला छळत आहे याचे जीवंत उदाहरण समोर आले. ईव्हीएममुळे घोटाळा होतो, हे गिरीश कुबेर यांना माहित नाही का ? त्यांना माहित आहे, मात्र आपली व्यवस्था कायम टिकून रहावी यासाठी त्यांचा खटाटोप असतो. म्हणून उलट ईव्हीएम कसा चांगला आहे याचाच अंडरकरंट त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता.
एका प्रश्‍नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्याला बांगलादेशातील घुसखोर असलेले मतदार चालतात, मात्र बांगलादेशाने जसा ईव्हीएम हटवला तसा आपणही तो हटवला पाहिजे. बांगलादेशातील केवळ मतदार कशाला हवेत. मग त्यांची पद्धतदेखील स्विकारायला हवी. घ्या…पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका. देशापेक्षा आपल्याला काही महत्वाचे वाटते का? नाही ना. देशातील लोकशाहीचे रक्षण करायचे असेल तर मी जे काही बोलतोय ते चुकीचे नाही. एवढेच कशाला युएसएमध्ये काही राज्यात ईव्हीएम आणि काही राज्यात ईव्हीएम नाही. जोपर्यंत त्यांची तयारी पूर्ण होत नाही तोपर्यंत ते ईव्हीएम आणणार नाहीत. मग भारतात ईव्हीएमवर संशय असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. बॅलेट पेपरवर मी मत कुणाला दिले ते शेवटपर्यंत समजून येते. ईव्हीएममध्ये बटण दाबले जाते. लाईट लागते, आतमध्ये कुणावर मत रजिस्टर झाले ते समजून येत नाही. मशीन हॅक होऊ शकते, काहीही होऊ शकते.
ते जास्त वाटत नाही का? तसे असेल तर हिमाचल गेले नसते का? दिल्लीमध्ये…! गिरीश कुबेर यांच्या बालीश प्रश्‍नांच्या नौटंकीवर उद्धव ठाकरे उत्तर देताना म्हणाले, काही मिळवायचे असेल तर काही गोष्टी तुम्हाला सोडायला तयारी असावी लागते ना. मोठे कमवायचे असेल तर छोटे गमवायला काय हरकत आहे? म्हणजे तुम्ही प्रश्‍न विचारू शकत नाही.
ईव्हीएम फ्रॉड आहे, सिद्ध करून दाखवा असे निवडणूक आयोग सांगते तर कुणीच करू शकले नाही ना….असा आणखी एक बालीश प्रश्‍न विचारण्याची नौटंकी कुबेर यांनी केली. यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे जे करायला गेले होते त्यांना अटक करण्यात आली. हैद्राबादची लोकं होती ती. अमेरिकतेही बॅलेट पेपर वापरतात, ब्रिटनमध्येही आहे बॅलेट पेपर. आपण तर त्यांनाच फॉलो करतो. बाकी सार्‍या बाबी त्यांना फॉलो करत आहोत तर ही बाब का नाही? असा सवाल केला. कुबेर यांनी विचारलेला प्रश्‍न किती बालीश होता याची पोलखोल व्हायला हवी. ईव्हीएम फ्रॉड आहे, सिद्ध करून दाखवा असे निवडणूक आयोग सांगते तर कुणीच करू शकले नाही ना असे कुबेर यांनी विचारले. मात्र कुबेर यांना निश्‍चित माहित आहे ८ ऑक्टोेबर २०१३ चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. त्या निकालात ईव्हीएममुळे मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका होऊ शकत नाहीत असे स्पष्ट म्हटले आहे. याचा दुसरा अर्थ ईव्हीएममध्ये घोटाळा होता. ज्या सर्वोच्च न्यायालयानेच सांगितले आहे की ईव्हीएममध्ये घोटाळा होतो, सर्व पुरावे पाहिल्यानंतरच तसा निकाल दिला गेला आहे ना. जेथे सर्वोच्च न्यायालयच सांगते तेथे लोकांनी सांगण्याची गरज काय? कारण सर्वोच्च न्यायालय सुप्रीम आहे एवढेच नाही तर संविधानिक अथॉरिटी असलेली संस्था आहे. म्हणजे ईव्हीएममध्ये घोटाळा होत नाही हे सर्वोच्च न्यायालयात सिद्ध करण्यास निवडणूक आयोग कमी पडला आणि बाहेर येऊन ब्राम्हण-बनिया मीडियाला मुलाखती देऊन सांगतात की ईव्हीएम हॅक करून दाखवा याला काय अर्थ आहे? हे गिरीश कुबेर यांना माहित नाही का? त्यांना माहित आहे. मात्र ईव्हीएम कसे चांगले आहे हे सांगण्याचा त्यांचा बळेबळे प्रयत्न आहे.
आणखी एक कुबेर यांनी ईव्हीएवरच प्रश्‍न विचारला. ईव्हीएमवर तक्रार थोडासा रडीचा डाव वाटत नाही का? यावर प्रश्‍नावर उद्धव ठाकरे म्हणाले, असे नाही…रडीचा डाव असेल तर होऊन जाऊ द्या ना बॅलेट पेपरवर निवडणुका. मग लोकांना कळू दे की तुमच्या म्हणण्यात अर्थ नाही. बघा…बॅलेट पेपर असतानाही आम्हीच जिंकलो. त्यासाठी एवढी काय घाई आहे, तुम्हांला तत्काळ निकाल पाहिजे. पाच वर्षे फार मोलाची असतात. घाई-घाईत निकाल लावून पाच वर्षे जातात, त्यापेक्षा एकदा काय ते व्यवस्थित होऊ द्या. मुळात या प्रश्‍नावर आणखी विश्‍लेषण करता येईल. कारण मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका घ्याव्यात यासाठी निवडणूक आयोगावर संविधान निर्मात्यांनी जबाबदारी लावलेली आहे. लवकरात लवकर निकाल लावण्याची जबाबदारी लावण्यात आलेली नाही. परंतु लवकरात लवकर निकाल लावण्याच्या बहाण्याने मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका होतच नाहीत तर खुलेआमपणे घोटाळा केला जातो. त्यामुळे निवडणूक आयोग संविधानाने लावलेल्या जबाबदारीविरोधात काम करताना दिसत आहे. निवडणुकीत खुलेआमपणे घोटाळा करण्यास भाग पाडून १४० कोटी जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करायला हवा.
गंमत कशी होते हरलेले असतात ते ईव्हीएमवर बोलतात, जिंकणारे बोलत नाहीत. समजा तुम्ही बीएमसीच्या निवडणुकीत जिंकलात तर हा मुद्दा घ्याल का? गिरीश कुबेर यांच्या प्रश्‍नावर ठाकरे म्हणाले, हो…का नाही घेणार. कारण आम्हांला विधानसभा पण जिंकायची आहे. लोकसभा पण जिंकायची आहे. हरल्यानंतर घ्याल का? या प्रश्‍नावरही ठाकरे यांनी हो…घेऊ ना. कारण आम्हांला लोकसभा पण जिंकायची आहे. परंतु मला २०२४ ची जी भीती वाटतेय ती खरी ठरली तर ईव्हीएम सोडाच बॅलेट पेपरचीही गरज नाही. ईव्हीएम आणि बॅलेट पेपर लागणारच नाहीत, कारण त्यानंतर निवडणुकाच होणार नाहीत.
या मुलाखतीत ईव्हीएमचा मुद्दा छेडला गेला असला तरी केवळ लोकसत्ताच नव्हे तर ब्राम्हण-बनिया मीडियाची भूमिका ही देशद्रोहाचीच राहिली असे अनेकदा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी म्हटले आहे. कारण ८ ऑक्टोबर, २०१३ चा सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमविरोधी दिलेला निकाल स्वत:ला मेन स्ट्रीम मीडिया म्हणवणार्‍या ब्राम्हण-बनिया मीडियाने छापला अथवा प्रसारित केलाच नाही. खरं म्हणजे मीडियाची भूमिका ही जागल्याची आहे. त्यांनी दुसर्‍यांना जागवले पाहिजे. ज्यावेळी विरोधी पक्ष आपली विरोधाची भूमिका नीट बजावत नाही तेव्हा मीडियाने विरोधाची भूमिका बजवायची असते. समाजहिताचे व समाजविघातक निर्णय सरकारकडून घेतले जातात त्याची माहिती मीडियाने दिली पाहिजे. मात्र येथे समाजविघातक सोडाच समाजहिताच्या निर्णयाची माहितीदेखील छापली अथवा प्रसारित केली जात नाही. त्यामुळे आज देशात अराजक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.