कोरोनानंतर हृदयाशी संबंधित आजार गंभीर झाल्याचे तज्ज्ञांचे मत – स्त्री आणि पुरुषांमध्ये हार्ट ॲटॅकची लक्षणे असतात भिन्न

0 762
कोरोनानंतर हृदयाशी संबंधित आजार गंभीर झाल्याचे तज्ज्ञांचे मत
– स्त्री आणि पुरुषांमध्ये हार्ट ॲटॅकची लक्षणे असतात भिन्न
 
न्यूयॉर्क : हृदयविकाराच्या झटक्याची (हार्ट अॅटॅक) लक्षणे महिला आणि पुरुषांमध्ये भिन्न असतात. ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून धोका टाळता येतो, असा दावा अमेरिकेच्या स्मिड्ट इन्स्टिट्युटच्या संशोधकांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासाच्या आधारे केला आहे. तसेच कोरोनानंतर हृदयाशी संबंधित आजार गंभीर झाल्याचे तज्ज्ञांना आढळून आले आहे.
‘लॅन्सेट’ या आरोग्यविषयक प्रतिष्ठित नियतकालिकामध्ये या संशोधनासंबंधीचा शोधनिबंध नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार ५० टक्के रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याच्या २४ तास आधी लक्षणे दिसतात. मात्र स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये ही लक्षणे भिन्न असतात. संशोधनात असे आढळले की हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी महिलांना श्वास घेण्यास त्रास होतो, तर पुरुषांना छातीत दुखतेदोघांनाही धडधडणे आणि फ्लूसारखी लक्षणे जाणवतात.
पुरुषांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही तास आधी छातीत कळा येणे, अस्वस्थ वाटणे, श्वास घेण्यास त्रास होणे, डावा हात आणि जबडा दुखणे तसेच क्वचित प्रसंगी मळमळल्यासारखे वाटणे अशी लक्षणे साधारणतः दिसून येतात. तर स्त्रियांमध्ये मान, पाठीचा कणा, जबडा दुखणे, छातीत जळजळ होणे, चक्कर येणे, धाप लागणे अशी लक्षणे दिसून येतात, असे या अध्ययनातून दिसून आले आहे.
हृदयविकाराचा झटका आलेल्या ९० टक्के लोकांचा हॉस्पिटलबाहेर मृत्यू होतो. कोरोनानंतर हृदयाशी संबंधित आजार गंभीर झाल्याचे तज्ज्ञांना आढळून आले आहे. शारीरिक हालचालींचा अभाव, बदललेल्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि ताणतणाव वाढल्याने हृदयाशी संबंधित आजारांमध्येही बरीच वाढ झाली आहे. संशोधनानुसार, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका अधिक धोकादायक ठरू शकतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास धोका अनेक पटीने वाढतो.
Leave A Reply

Your email address will not be published.