अंतिम मतदार यादी निवडणूक विभागाकडून जाहीर – किनवट विधानसभा मतदारसंघात ९ हजार ४४२ नवीन मतदारांची भर

0 6

अंतिम मतदार यादी निवडणूक विभागाकडून जाहीर
– किनवट विधानसभा मतदारसंघात ९ हजार ४४२ नवीन मतदारांची भर
किनवट : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी निवडणूक विभागाने ता. २३ जानेवारी रोजी प्रसिध्द केली आहे. त्यानुसार विधानसभा निवडणुकीतील मतदारांच्या तुलनेत यंदा किनवट विधानसभा मतदारसंघात ९ हजार ४४२ नवीन मतदारांची भर पडली असून, यात महिला व पुरुष मतदारांच्या टक्केवारीत फारसा फरक नसल्याची माहिती तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या निर्देशानुसार सार्वत्रिक निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार एन.एम.त्रिभूवन यांनी दिली.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण आणि सर्वेक्षण मोहीम तसेच नव मतदार अभियान नुकतेच राबविण्यात आले होते. आॅक्टोबर २०१९ मधील १८ वर्षे पूर्ण झालेल्या पात्र मतदारांच्या नव्या नोंदणी झाल्यानंतर ता.२३ जानेवारी रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झालेली आहे. त्यानुसार सध्या किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघात एकूण मतदात्यांची संख्या २ लाख ६५ हजार ७२३ झालेली आहे. त्यात पुरुष मतदार १ लाख ३६ हजार ९७२, महिला मतदारांची संख्या १ लाख २८ हजार ७४० असून, इतर मतदाते ११ आहेत. येत्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी ९ हजार ४४२ मतदार वाढलेले आहेत.
मतदार संख्या २ लाख ५९ हजार ४५६ वर
किनवट विधानसभा निवडणुकीच्यावेळी एप्रिल २०१९ मध्ये झालेल्या लोकसभानिवडणुकीपेक्षा १ हजार ९१२ मतदाते वाढून मतदारांची एकूण संख्या २ लाख ५९ हजार ४५६ झाली होती. यात पुरुष १ लाख ३३ हजार ६०५, स्त्रिया १ लाख २५ हजार ८४४ तर इतर ७ मतदार होते. पूर्वीच्या मतदारयादीतून १ हजार ७५९ मयत झालेल्या व्यक्ती, २१० व्यक्तींची नावे दुबार पडलीत म्हणून तर, १ हजार २०६ व्यक्ती स्थलांतरित झाल्यामुळे एकूण ३ हजार १७५ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.