गॅस टँकर धडकल्याने गॅस गळती -एक लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याची माहिती

0 59
गॅस टँकर धडकल्याने गॅस गळती
-एक लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याची माहिती
छत्रपती संभाजीनगर : शहरात मुंबईहून चिकलठाणा एमआयडीसीकडे गॅस घेऊन जाणारा टँकर सेव्हन हिल उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकल्याने गॅस गळतीला सुरुवात झाली. ही गळती सलग १३ तासानंतर थांबल्यानंतर धोका टळला. या काळात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिसरातील सुमारे एक लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते.
टँकर क्रमांक एमएच ४३ बीटी ५९०२) हा मुबंईवरून गुरुवार रोजी पहाटे ५.१५ वाजण्याच्या सुमारास शहरात आल्यानंतर तो सेव्हन हिल उड्डाणपुलावरून चिकलठाणा एमआयडीसीकडे जात असताना कठड्यावर आदळल्याने एका व्हॉल्व्हमधून गॅसची गळती सुरू झाली. पोलिसांच्या गुड मॉर्निंग पथकाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर यांनी नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. काही नागरिकांनीही अग्निशमन विभागाला गळतीविषयी कळवले. त्यानंतर १५ मिनिटांत अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. या घटनेची माहिती महापालिका आयुक्तांसह जिल्हाधिकारी तसेच पोलिस आयुक्तांनाही देण्यात आली.
हिंदुस्थान पेट्रोलियमच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, एक किलोमिटरच्या परिसरातून नागरिकांना हटविण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त मनोज लोहिया, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांच्यासह पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांच्यासह अधिकारी घटनास्थळी पोहोचले. टँकरमधुन होत असलेल्या गॅस गळतीमुळे या भागातील वातावरणात एलपीजी गॅसची दुर्गंधी पसरली होती. अग्निशामक दलाने या टँकरवर पाण्याचा मारा सुरूच ठेवला. हिंदुस्थान पेट्रोलियमचे अधिकारी घटनास्थळी आले.
अधिकाºयांकडून झीरो रिस्कचे लक्ष्य
१३ तासांच्या अथक प्रयत्नानंतर अपघातग्रस्त वाहन रिकामे करून त्याला सुरक्षितस्थळी नेण्यात आले. यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान रस्ता खुला करण्यात आला. टँकरमधुन होत असलेल्या गळतीमुळे परिस्थिती तणावात होती. संबंधित अधिकाºयांनी झिरो रिस्क हे लक्ष्य ठेवले. जळगावहून हिंदुस्थान पेट्रोलियमची आरएसव्ही आणण्यात आली. या वाहनाच्या माध्यमातून अपघातग्रस्त वाहनामधून हा गॅस दुसºया टँकरमध्ये टाकण्यात आला. त्यानंतर रस्त्यावर पाणी मारून एका क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन सुरक्षितस्थळी सोडण्यात आले.
Leave A Reply

Your email address will not be published.