थोडं मनातलं !

0 81

थोडं मनातलं !

 

प्रा.पंजाबराव येडे
लिट्ल फ्लॉवर कनिष्ठ महाविद्यालय परळी (वैजनाथ)

 

मागच्या महिन्यात प्रत्येक गावात हरिनाम सप्ताह पार पडले.आपण सर्वांनी वर्गणी गोळा करून गावकऱ्यांची भक्ती अन् संस्कृती याची वैचारिक भूक भागवली.सर्व गावकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन!
आता सर्वजण मिळून जेवढी वर्गणी आपण हरिनाम सप्ताह साजरा करण्यासाठी जमा केली होती त्याच्या फक्त 25 टक्के वर्गणी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विकासासाठी जमा करा. शाळेत पिण्याच्या पाण्याचा हौद नसेल तर तो बांधा,वर्गखोल्या गळक्या असतील तर दुरुस्त करून घ्या.शाळेचा परिसर स्वच्छ करून घ्या.वर्गात चांगले फळे बसवून घ्या.
काही रकमेतून पुस्तके अन् वह्या खरेदी करा.काही शाळेचे गणवेश खरेदी करा.जून महिन्यात गावातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके व गणवेश मोफत वाटप करा. शाळा सुरू झाल्यानंतर गावातील शैक्षणिक समिती ने शिक्षक व पालक यांची संयुक्त बैठक बोलावून पालकांची शिक्षकांकडून व शिक्षकांची पालकांकडून काय अपेक्षा आहेत यावर चर्चा करा.वर्ष भराचे नियोजन करून त्याची जबाबदारी वाटून देवून अंमलबजावणी होते आहे की नाही पाहण्यासाठी शाळा समिती ने दक्ष रहावे!
नवोदय विद्यालय व स्कॉलरशिप सारख्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी नियोजन करा.
हात जोडून विनंती आहे,गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत राजकारण करू नका.शिक्षकांना प्रोत्साहन द्या.ते वेळेवर शाळेवर येतात का?विद्यार्थ्यांना शिकवतात का याची माहिती घ्या.
चांगल्या शिक्षकांचे कौतुक करा,त्यांच्या पाठीशी गावकऱ्यांनी ठाम उभे राहिले पाहिजे. हरिनाम सप्ताह साजरे करून आपण सर्वांनी पुण्य पदरात पाडून घेतलेले आहे आणखी जास्त पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी आपण सर्वांनी जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी वर्गणी जमा करायला कसलीच हरकत नसावी!
नक्कीच परमात्मा पांडुरंग आपल्या सर्वांच्या गावावर प्रसन्न होईल अन् सर्व गावकऱ्यांना भरभरून आशीर्वाद देईल!

सर्वांना रामकृष्ण हरी !

Leave A Reply

Your email address will not be published.