जयंती

0 67

जयंती

 

– छाया काविरे

 

“ता. १४ एप्रिल…डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. जयंतीच्या निमित्तानं शहरात ठिकठिकाणी रॅलीज् निघाल्या होत्या. अशातच एक दाम्पत्य आपल्या दोन लहान मुलांसोबत बाईकनं निघालं होतं. रॅलीमुळे ट्रॅफिक जाम झालेलं होतं. त्यातून पुढं जाण्यासाठी कुठून तरी वाट मिळेल म्हणून बाईक चालवणारी व्यक्ती इकडं तिकडं बघत होती. तितक्यात एक वयस्कर व्यक्ती नशेच्या अवस्थेत बेधुंद होऊन गाडीजवळ आली. दुचाकीस्वार दाम्पत्याला काही कळण्याच्या आतच त्या बेधुंद व्यक्तीनं बाईकची किल्ली काढली आणि दूर गर्दीत फेकून दिली. आणि पुढं…

‘उई माँ उई माँ उई माँ
उई उई उई उई छुई मुई छुई मुई
ओ मोरे साजन तोहे भूख लगे तो…’

या गाण्यावर डुलत ती व्यक्ती गर्दीत गायब झाली. गाडीवरची ती व्यक्ती, त्या व्यक्तीची पत्नी व मुलं भयभीत झाली… पुढं काय झालं मला माहीत नाही. कारण, त्या गर्दीतून मीही मार्ग काढत पुढं निघत होतो…” ऑफिसमधील एक सहकारी मागील वर्षीचा त्याचा अनुभव सांगत होता. “आज घरी जाताना खूप ट्रॅफिक लागेल म्हणून थोडं लवकर निघू या,” असं मी म्हणाले. आणि, चर्चा सुरू झाली ‘जयंती’ची.

एक सहकारी म्हणाली : “रात्री डीजेच्या आवाजानं घरातील वस्तूही व्हायब्रेट होत होत्या.” “डीजेच्या आवाजानं रात्री उशिरापर्यंत झोपू शकलो नाही. पार डोकं उठलं…वैताग आला!” असं दुसरा सहकारी म्हणाला.

मला प्रश्न पडला, “ज्या बाबासाहेबांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्याच बाबासाहेबांच्या जयंतीला आपण कधी कधी असे पशुवत् का वागतो? खरं तर पशूही असं कधी वागत नाहीत. मग आपल्यात असला कसला संचार होत असतो ह्या दिवशी?”

आपल्या समाजबांधवांना, वंचितांना सदैव स्वाभिमानानं जगता यावं…कधीही लाचार म्हणून जगण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये…समाजबांधवांनी साक्षर व्हावं…सुशिक्षित व्हावं म्हणून वंदनीय बाबासाहेबांनी आपलं सारं आयुष्य समर्पित केलं. समाजाच्या उन्नतीसाठी वाहून घेतलं. विदेशातील नोकरी नाकारली…न्यायालयात न्यायाधीश होणं नाकारलं…घरात ऐशोआरामात जगणं नाकारलं…त्याच बाबासाहेबांच्या जयंतीला आज आपण हे सगळं काय करतोय?

‘अश्विनी ये ना…दिलाची राणी गं…ये ना प्रिये’, ‘अगं बाय अगं बाय… अगं बाय’, ‘काळी मैना लागली बोलायला’, अशा गाण्यांवर आपले बांधव मद्यधुंद होऊन बाबासाहेबांच्या नावानं स्वतःची इज्जत चव्हाट्यावर का मांडत आहेत?

एक सहकारी बोलता बोलता आज बोलून गेला : “डेंजर असतात हे लोक, यांच्या नादाला लागून उपयोग नाय…”

‘हे लोक??’

‘हे लोक’ म्हणजे काय? बाबासाहेबांनी तर आपल्याला प्रेमाचा संदेशही दिलाय ना? मग आपल्याबद्दल काही लोकांच्या मनात ‘डेंजर असतात हे लोक’ असा विचार का येऊन गेला? ‘ह्या लोकां’च्या नादी लागून उपयोग नाही, असं काही लोकांना का वाटून गेलं? आपल्या वागण्यामुळं कुणाला असा धाक का वाटावा? अशी दहशत का वाटावी? या सगळ्या प्रश्नांचा विचार व्हायलाच हवा.

बाबासाहेबांची जयंती असो की शिवजयंती असो, दरवर्षी कान आणि डोकं सुन्न करणारे डीजे, ट्रॅफिकमुळे ब्लॉक झालेले रस्ते, आवाजानं डोकं उठणार म्हणून त्या दिवसापुरते दुसऱ्या गावी गेलेले परिसरातील काही आजारी लोक…हे सगळं काय आहे? यावर आपण कधी विचार करणार आहोत की नाही?

याविषयी एका मित्राला समजावण्याचा प्रयत्न केला तर त्याचं उत्तर आलं : ‘आम्ही बाबासाहेबांची जयंती वर्षभर वाचून आणि एक दिवस नाचूनच साजरी करणार!’ अरे, पण तुम्ही खरंच बाबासाहेब वाचले असते तर निदान त्यांच्या जयंतीच्या दिवशी तरी असे मद्यधुंद होऊन नाचला नसतात…बेहोष होऊन फुटपाथवर असे लोळत पडला नसतात. बाबासाहेब हे महामानव समजून घेण्यासाठी आहेत. त्यांच्या जयंतीला लोकांना त्रास व्हावा, असे बाबासाहेब कधीच नव्हते आणि नसतील. विचार करा, आज जर बाबासाहेब हयात असते तर…? आपल्या लेकरांना अशा अवस्थेत बघून त्यांना किती त्रास झाला असता, याची काही कल्पना?

महामानवांच्या शिकवणुकीला हरताळ फासत आहोत आपण! बाबासाहेबांनी आपल्याला डोक्यावर घेतलं आणि आपण त्यांच्याच नावानं लावलेल्या डीजेनं लोकांचं डोकं उठवतोय. कदाचित्, माझ हे लिखाण वाचल्यावर मला ‘बाटलेली आंबेडकरवादी’ ही म्हणायला काहीजण कचरणार नाहीत. ‘इतर जयंतींच्या कार्यक्रमातदेखील डीजे असतात. ट्रॅफिक ब्लॉक होतं…त्यापेक्षा तर हे कमीच आहे ना?’, असाही प्रश्न कुणी उपस्थित करील…पण हे म्हणजे ‘काहीजण मोठा गुन्हा/चूक करत असतील तर त्यांच्या तुलनेत आम्ही हा छोटा गुन्हा/चुका करत आहोत,’ असं म्हणण्यासारखंच आहे हे, असं मला नेहमीच वाटत आलंय.

हाच मुद्दा आणखी एका उदाहरणासह सांगते…एखादा सत्ताधारी स्वतःच्या चुकांविषयी स्पष्टीकरण देताना विरोधी पक्षाच्या किंवा पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या चुकांचा पाढा वाचून दाखवतो…अगदी तसंच झालं ना हे? मोठा गुन्हा…छोटा गुन्हा या युक्तिवादात काहीच अर्थ नाहीय.

मी हे सगळं जे मांडलं आहे त्यावर विचार व्हावा, त्यामागची माझी पोटतिडीक समजून घेतली जावी इतकीच अपेक्षा…

Leave A Reply

Your email address will not be published.