परिवर्तनाची मशाल पेटवणारे महात्मा फुले

0 46

परिवर्तनाची मशाल पेटवणारे महात्मा फुले

 

विनोद पंजाबराव सदावर्ते
समाज एकता अभियान
रा. आरेगांव ता. मेहकर
मोबा: ९१३०९७९३००

 

भारताला परिवर्तन कारी व लोक कल्याणकारी अनेक संत महापुरुष मिळालेले आहे परंतु भारतीय लोकांनी परिवर्तन व लोक कल्याण समजून न घेता आजही मानसिक गुलामच आहेत. हजारो वर्षापासून शिक्षणापासून व विकासापासून दूर ठेवण्यात आलेल्या समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून लोक कल्याण करण्याची संधी मिळालेली आहे. परंतु स्वतःला सुशिक्षित समजणारा समाज परिवर्तन व लोककल्याण समजून घ्यायला तयार नाही. आणि शिक्षणाचा फायदा फक्त नोकरी किंवा स्वार्थासाठी घेऊन आजही तो मानसिक गुलामच आहे. परंतु शिक्षणाच्या माध्यमातून हा तर्क करून मेंदू जागृत केला तर हजारो वर्षापासून शिक्षण व लोक कल्याण पासून कोणी दूर ठेवले? माणसा माणसात भेद करून जाती निर्माण करून त्याचा फायदा कोणी करून घेतला? जाती-जातीत विघटन झाल्याने, जातीच्या व धर्माच्या नावाने अंधश्रद्धेला खत पाणी घातल्याने, पाखंड व भोंदूगिरीला वाव दिल्याने समाजाचे कसे वाटोळे झाले आणि आजही समाजाला त्यापासून कसे वाचवायचे याचा सर्व लेखाजोखा महापुरुषांच्या लेखणीने आम्हाला मिळालेला आहे. परंतु आम्ही वाचण्यास तयार नाही.आम्हाला अजूनही महापुरुष कळालेले नाहीत. कोणताही महापुरुष समजून घ्यायचा असेल तर त्या अगोदर आम्हाला समाजाची पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक असते. परंतु हजारो वर्षापासून अज्ञान मानसिक गुलाम व थोतांडा मध्ये फससल्याने आजही महापुरुष व परिवर्तन कळाले नाही. महात्मा फुले यांना आजही दुर्लक्षित करण्यात येते. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्रियांना शिक्षण देण्याचे काम केले एवढेच सांगितले जाते. महात्मा फुलेंनी स्त्रियांना शिक्षण देऊन महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याने आज महिला मोठ्या पदावर विराजमान होत आहे. परंतु अनेक महिलांना महिलांसाठी शिक्षण सुरू करणाऱ्या महात्मा फुले बद्दल आपुलकी आहे ना जाणीव. परंतु महात्मा फुले समजून घेताना फक्त शिक्षण सुरू केले एवढ्या वरच थांबून जमणार नाही. महात्मा फुले यांचे कार्य हे विषमता म्हणून समता प्रस्थापित करणे, समाजातील भेदभाव नष्ट करणे, अंधश्रद्धा पाखंड भोंदूगिरीला मुळासकट उपटून टाकने, सामाजिक मक्तेदारी दूर करून सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, शेतकरी कामगार व विद्यार्थ्यांचे हित जोपासणे, तसेच उद्योगभिमुख शिक्षण निर्माण करणे असे बहुआयामी काम महात्मा फुले यांनी केले. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या कनिष्ठ रुढी जुगारून विधवा पुनर्विवाह, आंतरजातीय विवाह, घडवून समाजामध्ये क्रांती निर्माण केली. व समाजामध्ये वारंवार प्रबोधन करून आपल्या कृतीमधून परिवर्तनाची मशाल पेटत ठेवली. याची अनेक उदाहरणे आपल्याला मिळतात.

माळी कुणबी शेती खपून करीती पट्टीची भरती।
मिळेना लंगोटी पुरती।

माळी कुणबी अर्थात शेती करणारा शेतकरी राब राब राबून मेहनतीने पिकवतो. जगाला जगवतो. परंतु त्याच्या अंगावर आहे सारी लंगोटी मिळत नाही. महात्मा फुलेंनी दीडशे वर्षा अगोदर मांडलेले मत आजही तेवढेच खरे आहे. परंतु आपण महात्मा फुले वाचले नसल्याने आपल्याला त्याची जाणीव नाही. त्याही वेळेस शेतकऱ्यांवर कोण अन्याय करत होते आणि आज कोण करतय? हे जाणून घ्यायचे असेल महात्मा फुलेंना वाचणे आवश्यक आहे. निडर प्रखर, वक्तव्य, लिखाण या माध्यमातून महात्मा फुलेंनी समाजामध्ये परिवर्तनाची ऊर्जा भरण्याचे काम केले आहे.

लहान चिटूकले पोरं करीती ढोराच्या वळती।
जोडे नाही पाय पोळती।
मुले भलत्याचीच शिकती।

गोरगरीब बहुजन समाजातील मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे बालवयातच काम करावे लागते. पोट भरण्यासाठी वाटेल ते काम करून पोटाची आग क्षमवावी लागते. आज जास्त प्रमाणात ढोरे नसले तरी वेगवेगळ्या पद्धतीची कामे बहुजन समाजाची लहान मुलांना करून उदरनिर्वाह करावा लागतो. आणि लहान वयात काम करून सुद्धा त्यांना पायात घालायला चप्पल किंवा अंगात घालायला नीटसे कपडे भेटत नाहीत. दुसरीकडे उच्चवर्णीय यांची मुले परदेशात शिक्षणासाठी जातात आणि ज्यांना शिक्षणाची गरज आहे ते मात्र आजही वेगवेगळ्या परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. असे का घडते याचे सुद्धा स्पष्टीकरण महात्मा फुले यांनी दिलेले आहे…

इतर धर्मास निंदीती हो
नित्य बोधाची रिती हो
शुद्र पोरा खोटा धर्म हळूच शिकवीती।
मुले भलत्याचीच शिकती।

धर्माधर्मांमध्ये वाद निर्माण करून बहुजन समाजातील मुलांना धार्मिक व भावनिक बनवले जाते. ही परिस्थिती पूर्वी होती आणि आजही आहे धर्म धर्म मध्ये द्वेष निर्माण करून बहुजन समाजातील मुलांना खोटा धर्म सांगून धर्माविषयी सांगुन मुख्य मुद्यावरुन दुर्लक्ष केले जाते. हीच ची प्रक्रिया आजही सुरूच आहे. आणि म्हणून बहुजन समाज हा जागृत झालेला नाही. धर्मामुळे कोणाचा आणि कसा फायदा होतो हेही महात्मा फुलेच सांगतात.

माळ्या कुणब्या बोध करुन रात्री पोथ्या वाचती
आपले महत्व शिकवीती।
भलतीच थाप देती शिद्यावर दक्षीणा घेती।
मुले भलत्याचीच शिकती।

माळ्याच्या व कुणब्याच्या मुलांना रात्री त्यांच्या मस्तकामध्ये पोथ्या पुराण टाकून एका धर्माचे व एका वर्गाचे वर्चस्व, श्रेष्ठत्व डोक्यात टाकले जाते. त्यांच्या मनावर वारंवार एकच एकच बिंबवले जाते. आणि एवढेच नाही तर कसे धर्माची एकच वर्णाचे वर्चस्व कायम राहूनही एकाच वर्णनाला दानदक्षिणा देण्यासाठी मानसिक तयारी करून घेतली जाते. धर्म अंधश्रद्धा च्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारचे दान दक्षिणा घेतली जाते. सांगण्याचा उद्देश हाच बहुजनांच्या मुलांना वेगवेगळ्या खोट्या नाट्या बाबींमध्ये गुंतवून ठेवून शिक्षणाची जाणीव होऊ दिली जात नाही. खोट्या नाट्या गोष्टी मधून पोथी पुराणाच्या बंधनातून मुक्त होण्याचा संदेशही महात्मा फुले देतात. तो अशा प्रकारे….

सोड गर्वास। लाग मार्गास।
जाळ ह्या खोट्या धर्मास।

धर्माचा गर्व केले पेक्षा कर्म करण्यावरती तरुणांनी लक्ष द्यायला पाहिजे. महात्मा फुले म्हणतात गर्व सोडून द्या चांगल्या मार्गास लागा. आणि जो काही धर्म चुकीच्या पद्धतीने सांगितल्या जातो तो सोडून द्या कारण धर्मामध्ये गुरफटून राहिल्याने कोणाचेही भले होत नाही. आणि धर्माच्या नावाने ज्यांचे भले होते ते कधीच धर्माचा गर्व वा धर्माच्या साठी शिक्षण सोडत नाहीत वा अंधश्रद्धा पाळुन पोथी पुरानात पडून राहत नाही. मात्र बहुजनांचे मुले धर्माच्या नावाखाली मानसिक गुलाम होतात. शिक्षण, रोजगार याकडे दुर्लक्ष करून धार्मिक व भावनिक होतात. याची जाणीव लोकांना व्हायला पाहिजे म्हणून महात्मा फुले लोकांना सांगतात

जिकडे तिकडे ब्राम्हणशाही।डोळे उघडून पाही।
खेडेगावी कुळकर्णी। आहे लेखणीचा धनी।
रेन्युवची दप्तरदारी। ब्राम्हण कितीअधिकारी।
चहुकडे भटभाई। कुणब्याची दाद नाही।

वरील बाबी सादर विचार केला तर आजही परिस्थिती फारशी वेगळे नाही आरक्षणाच्या माध्यमातून ज्या काही मोजक्या जागा बहुजन समाजातील तरुणांना दिल्या जातात परंतु बाकीच्या जागेवर कोण आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही आणि म्हणून उच्चवर्णांची पोरे नोकरीमध्ये आणि बहुजन समाजातील मुले दंगलीमध्ये सापडतात. त्यांच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखल होतात आणि जेव्हा गुन्हे दाखल होतात तेव्हा बहुजन समाजाने ज्या ठिकाणी दान दिले, ज्या ठिकाणी पैसा खर्च केला, त्या ठिकाणचा पैसा गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर, किंवा अडचणीत तरुण असल्याच्या नंतर यांना उपयोगी पडत नाही. म्हणून खोट्या धर्माच्या मोहाचं न पडता कर्माच्या मोहात पडून आपले कल्याण करण्यासाठी महात्मा फुलेंचे परिवर्तनकारी कार्य, विचार आजही समाजाला दिशादर्शक ठरतात. महात्मा फुले यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या आयुष्य खर्ची घातले महिलांना सुशिक्षित करण्यासाठी अनेक संकटावर मात केली. महिलांना देऊ नको म्हणून ज्यांनी मारेकरी पाठवले त्या व्यवस्थेला आजही महिला मानतात व त्याच विषमतावादी व्यवस्थेनुसार वागतात. परंतु महिलांना शिक्षण देणाऱ्या महात्मा फुलेंच्या विचाराने अपवाद वगळता अनेक महिला जागृत झाल्या नाहीत. आणि शिक्षण म्हणजे फक्त लिहिता वाचता येणे नव्हे तर शिक्षण म्हणजे समाजातील भेदाभेद अंधश्रद्धा, पाखंड, भोंदूगिरी या सर्व गोष्टींना झुगारून समतावादी विज्ञानवादी, तर्कवादी व्यवस्थेचा स्वीकार करणे होय. शिक्षणाला केवळ नोकरी मिळवण्याचे पैसा कमावण्याचे साधन समजले तर, महात्मा फुलेंनी शिक्षणासाठी जी काही मेहनत घेतली जो काही उच्च वर्णीयांचा त्रास सहन केला त्याला काहीच अर्थ उरणार नाही. म्हणून महात्मा फुले यांची जयंती साजरी करताना महात्मा फुले यांच्या स्त्री शिक्षणाविषयी असलेला उद्देश स्त्रिया पर्यंत पोहोचवण्याचे काम करणे आवश्यक आहे. ज्या स्त्रियांना लिहिता वाचता येते, नोकरी करता येते, यांच्यावरती फक्त महात्मा फुलेंचे उपकार आहेत. आणि उपकार विसरून चालणार नाही. म्हणून महात्मा फुले वाचून समजून घेणे आवश्यक आहे. जेव्हा महात्मा फुले कळतील व समाजातील अंधश्रद्धा, पाखंड, भोंदूगिरी, अज्ञान, विषमता नष्ट होईल, तेव्हाच महात्मा फुले स्त्रियांसाठी केले केलेल्या मेहनतीचे सार्थक होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.