माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे, तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे जितेंद्र आव्हाड

0 71

माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे, तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे जितेंद्र आव्हाड

 

मनसेचे अमेय खोपकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात सध्या जोरदार कलगीतुरा रंगला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी दादरमध्ये लावलेल्या एका बॅनरवरून जितेंद्र आव्हाडांनी नुकतीच राज ठाकरेंना टोला लगावला होता. त्यामुळे अमेय खोपकरांनी जितेंद्र आव्हाडांवर केलेल्या टीकेनंतर त्याला आता आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मनसे विरुद्ध जितेंद्र आव्हाड असा ऑनलाईन सामना सध्या पाहायला मिळत आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी दादरमध्ये राज ठाकरेंचे ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असणारे बॅनर्स लावले होते. यावर बोलताना जितेंद्र आव्हाडांनी “सध्या त्यांच्या पक्षाचा एकच आमदार आहे. हा आकडा ५० पर्यंत न्यावा लागेल. फक्त कुणाचीतरी नक्कल करून मुख्यमंत्री होता येत नाही”, असा चिमटा काढला होता. त्यावरून मनसेच्या नेत्यांनी  “जितेंद्र आव्हाड यांना लवकरच मनसेची ब्लू प्रिंट पाठवू. चार खासदार असणारे पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहातात आणि आमच्यावर टीका करतात. जितेंद्र आव्हाड पदवीधर निवडणुकीसाठी नाक घासत शिवतीर्थावर पाठिंबा मागण्यासाठी आले होते”, असा आक्रमक टोला मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी लगावला होता. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही खोचक ट्वीट केलं.

“जितुद्दीन आव्हाड यांचा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे. हे कोण बोललं होतं ते सगळ्यांनाच आठवत असेल. आता नागच तो, फणा काढतच फिरणार. पण कितीही फुत्कार निघाले, तरी आम्ही मनसैनिक बिनकामाच्या नागाला अजिबातच महत्त्व देत नाही”, असं ट्वीट करत अमेय खोपकरांनी जितेंद्र आव्हाडांना डिवचलं. या ट्वीटवर जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा खोचक ट्वीट करत थेट राज ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. “माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे हे कोण बोललं होतं ते सगळ्यांना आठवत असेलच. पण त्याला मी दिलेलं उत्तरही लोकांना आठवतं आणि लोक गदगदून हसतात. माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे, मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे सांगू का? बघा आरश्यात. जशास तसे उत्तर कुणालाही देता येतं. अमेय खोपकर, लवकर बरा हो”, असं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाडांनी दिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.