जिल्हाधिकारी यांचे आदेशाला उपअधीक्षक भूमि अभिलेख अधिकारी यांनी दाखवली केराची टोपली – गुंठेवारी नियमीतीकरणाकडे अधिका-यांचा कानाडोळा – अधिका-यांच्या अरेरावी व मनमानी कारभारामुळे सामान्यांचे हाल

0 78

जिल्हाधिकारी यांचे आदेशाला उपअधीक्षक भूमि अभिलेख अधिकारी यांनी दाखवली केराची टोपली
– गुंठेवारी नियमीतीकरणाकडे अधिका-यांचा कानाडोळा
– अधिका-यांच्या अरेरावी व मनमानी कारभारामुळे सामान्यांचे हाल

लातूर : प्रशासकीय अधिकारी आपल्या कामाकाजात मनामानी करत असल्याने त्याचा त्रास हा सामान्यांना सहन करावा लागतो. शासन स्तरावरून विविध योजना व आदेश निर्गमित होतात पण त्याची अमंलबजावणी होत नसल्याने त्याचा फटका अनेकांना सहन करावा लागतो. अशातच गुंठेवारी संदर्भात लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आदेश काढला मात्र या आदेशाला उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाने केराची टोपली दाखवल्याने अनेकांचे प्लॅट खरेदी व विक्रीचे व्यवहार ठप्प झाल्याने नागरिक त्रस्त आहेत.
लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी १४ फेब्रुवारी २०२४ रोजी आदेश काढून त्यात म्हटले की, जिल्ह्यातील संपुर्णत: ग्रामीण क्षेत्रातील खाजगी मालकीचे भुखंडाचे/प्लॅटचे नियमाधिन करण्यासाठी प्राधिकारी अधिकारी म्हणून अधिनियम कलम २ (१) (ग) (दोन) मध्ये नमुद क्षेत्रासाठी अधिनियाच्या प्रयोजनार्थ, नियोजन प्राधिकरणाचे प्राधिकृत अधिकारी करीत आहे. मुळ जमिन मालक यांचेकडील अनाधिकृत भुखंड/ प्लॉट असतील त्याबाबत नगर रचनाकार, तहसीलदार व भूमि अभिलेख यांचे अभिप्राय नुसार अनाधिकृत भुखंड/ प्लॉट च्याबाबतीत व तसेच ज्या दस्ताची नोंदणी ३१ डिसेंबर २०२० पुर्वी अनाधिकृत भुखंड/ प्लॉट म्हणून दस्त नोंदणी झाली असल्यास अशाच भुखंड/ प्लॉटचे गुंठेवारी नियमीतीकरणाचे नियोजन प्राधिकरणाचे प्राधिकृत अधिकारी हे संबंधीत उपविभागीय हे असतील असे आदेशात म्हटले.
या आदेशान्वये गुंठेवारी नियमीतीकरणाचे अधिकार ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत प्राप्त होणा-या अर्जावर गुंठेवारी नियमतीकरण करण्याची कार्यवाही करण्यासाठी अधिकार देण्यात आले. मात्र प्रशासनातील अधिका-यांकडून या आदेशाकडे कानाडोळा होत असल्याचे दिसत आहे. उपअधीक्षक भूमि अभिलेख अधिकारी कार्यालयात नागरिक दररोज हेलपाटे मारून गुंठेवारी संदर्भात चौकशी करीत आहेत. मात्र या अधिका-यांकडून त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला जात नाही. यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला या उपअधीक्षक भूमि अभिलेख अधिका-यांनी केराची टोपली दाखवली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. अनेकजण आल्याकडे असलेल्या तुटपुंजीवर तडजोडी करून आपल्या मुला मुलीचे विवाह करण्याचा प्रयत्न करताना दिसतात तर अनेक जण आपल्याकडे असलेला भूखंड/प्लॉट विकून त्यातून आलेल्या पैशाने आपल्या मुला मुलीचे लग्न करण्याचे स्वप्न उराशी जपताना दिसत आहेत. मात्र उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय हे जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करून जनसामान्याचा मुळावर उठल्याचे दिसत आहे. यामुळे लोकांमध्ये प्रचंड उद्रेक पहायला मिळत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करून उपविभागीय अधिकारी, नगर रचनाकार, यांनी गुंठेवारीचा प्रश्न मार्गी लावून लोकांना हेलपाट्यांच्या फे-यातून मोकळे करावे अशी मागणी लोकांकडून होत आहे. यात उपविभागीय अधिकारी यांनी संमती दिल्यानंतर ही उपअधीक्षक भूमि अभिलेख अधिकारी हे जाणीवपूर्वक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून त्याला कवडीमोल ठरवताना दिसत आहेत. यामुळे जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणेवरचा ताबा सुटल्याचे दिसत आहे. यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने तात्काळ लक्ष घालून उपअधीक्षक भूमि अभिलेख यांचा मनमानी कारभार थांबून लोकांच्या मार्गातील अडथळे दुर करावेत अशी मागणी होत आहे. या मागणीकडे प्रशासन कोणत्या भावनेने बघते आणि त्यावर काय निर्णय घेते हे पाहणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.