आगामी लोकसभा निवडणूकीत एक ते दीड हजार उमेदवार उभे राहणार – सोलापूर मधील मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

0 58

आगामी लोकसभा निवडणूकीत एक ते दीड हजार उमेदवार उभे राहणार
– सोलापूर मधील मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

सोलापूर : ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाकडून आंदोलने, सभा घेतल्या जात आहेत. बैठकाचे आयोजन करून आगामी लोकसभा निवडणुकीबाबतही रणनीती ठरवली जात आहे. त्यानुसार एका मतदारसंघात एक ते दीड हजार उमेदवार उभे करण्याचा निर्णय सोलापूरमध्ये झालेल्या बैठकीत मराठा समाजाने घेतला. त्यामुळे आगामी निवडणुकीत यंत्रणा हाताळणे प्रशासनाला कटकटीचे आणि त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.
शहारात सकल मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाºयांची बैठक झाली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण रणनीती ठरविण्यात आली आहे. त्यामध्ये प्रत्येक गावातून तीन ते चार उमेदवार उभे करावेत. तसेच एका एका मतदारसंघात एक ते दीड हजार उमेदवार उभे करण्यात यावेत यासाठी नियोजन करण्यात आले आहे. येणारी निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यासाठी सरकारला भाग पाडण्यासाठी जास्तीचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
लोकसभा निवडणूकीत जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांना निवडणूक लढविण्यासाठी येणारा खर्च लोकवर्गणीतून करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. प्रत्येक वाहनावर आणि घरावर मी मतदार-मी उमेदवारचा फलक लावण्यात येणार आहे. जे मतदारसंघ राखीव आहेत, त्या ठिकाणी समाजाच्या पाठिंब्यावर उमेदवार उभा करण्यात येईल. पहिल्या दिवसांपासून अर्ज भरायला सुरुवात करायची, असेही या बैठकीत ठरविण्यात आले. माढा, सोलापूर आणि धाराशिव मतदारसंघांतून उमेदवार उभे करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे
मराठा समाजाला देण्यात आलेले दहा टक्के आरक्षण हे केंद्र सरकारच्या नोकºयांमध्ये लागू होत नाही. तसेच, शैक्षणिक प्रवेश परीक्षांसाठीही त्याचा फायदा मराठा समाजाला होत नाही. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून पन्नास टक्कयांमधूनच आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी या बैठकीत पुन्हा करण्यात आली.
भाजपचा कोणता नेता सोलापुरात येतो तेच पाहू
एकीकडे आरक्षण द्यायचे आणि सदावर्ते यांच्या माध्यमातून काढून घ्यायचे, असा खेळ भाजप करत आहे. आगामी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना भाजपकडून तिकीट देण्याची चर्चा सुरू आहे. अ‍ॅड. सदावर्ते यांना भाजपचाच पाठिंबा आहे, असा आरोप मराठा समाजाकडून पूर्वीपासून करण्यात येत आहे. सदावर्ते यांना तिकीट दिले तर मराठा समाजाचा कोणता नेता प्रचारासाठी सोलापुरात येतो तेच पाहू, असे चॅलेंज मराठा समन्वयक माऊली पवार यांनी दिले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.