धर्माधिकारींचा धर्म की अधर्म ?

आप्पासाहेब धर्माधिकारी जरी धर्मासाठी माझे सगळे धार्मिक कार्य आहे असा कांगावा करीत असले तरी हा खरा धर्म नसून अधर्म आहे.धर्माचे श्रेष्ठी वातानूकुलीत हवेत बसून लोकांना ४३ डिग्री तापमानात बसवित असतील तर तो अधर्म आहे.

0 49

धर्माधिकारींचा धर्म की अधर्म ?

 

✍🏻 प्रेमकुमार बोके, अंजनगाव सुर्जी

महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार.तो मिळाला आप्पासाहेब धर्माधिकारी यांना.पुरस्कार वितरणासाठी मुंबईत धर्माधिकारींच्या लाखो साधकांना बोलाविण्यात आले आणि प्रचंड उकाड्यात अनेक साधकांना आपले प्राण गमवावे लागले.यासाठी धर्माधिकारी नावाच्या माणसाने धर्माचा आधार घेतला आणि धर्माचे साधक धर्माच्या मुखंडाच्या आवाहनानुसार खारघरला आले.लोकांना गोळा करण्यासाठी धर्म हे फार प्रभावी माध्यम आहे.धर्माच्या नावावर धर्माधिकारी सारख्या, धर्मात श्रेष्ठत्व प्राप्त केलेल्या माणसाने आवाहन करताच कोणताही विचार न करता लाखो माणसे सहज एकत्र येतात.हे या देशात नेहमीच घडत आलेले आहे.त्यामुळे आपल्या साधकांच्या मनाचा आणि मेंदूचा अतिशय व्यवस्थित अभ्यास असलेले धर्माधिकारी सारखे प्रत्येकच धर्मातील धर्ममार्तंड धर्माचा वेळोवेळी गैरवापर करतात आणि त्या माध्यमातून स्वतःचे वर्चस्व आणि श्रेष्ठत्व प्रस्थापित करतात.त्यासाठी बळी मात्र सर्वसामान्य जनतेचा दिला जातो ही अत्यंत खेदाची बाब आहे.

आप्पासाहेब धर्माधिकारी हे दासबोधाचे निरूपण करतात.कोकण परिसरात रामदासी बैठका घेतात आणि त्या माध्यमातून बहुजन समाजातील लोकांना विशेषतः महिलांना रामदासांचे श्रेष्ठत्व सांगता- सांगता अंधश्रद्धा,विषमता आणि धर्मांधता यामध्ये व्यवस्थितपणे अडकवितात.ज्या रामदास स्वामींनी आपल्या दासबोधाच्या माध्यमातून विषमतेचे समर्थन करणाऱ्या आणि वर्णवर्चस्ववादाचे श्रेष्ठत्व सांगणाऱ्या अनेक ओव्या लिहिलेल्या आहेत, त्या रामदासांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी आधी नाना धर्माधिकारी आणि आता त्यांचे पुत्र आप्पासाहेब अहोरात्र प्रयत्न करीत असतात.त्यांच्या या धर्मजाळ्यात लाखो लोक अडकलेले आहेत आणि राजकारणी लोकांना सुद्धा ही आयती गर्दी सहज खुणावत असते.म्हणूनच या गर्दीचा आपल्याला राजकीय फायदा मिळावा यासाठी पिता-पुत्रांना महाराष्ट्राचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो. संपूर्ण आयुष्यात जाती अहंकाराची शेखी मिरविणाऱ्या आणि सार्वजनिक ट्रस्ट मधे केवळ आपल्याचा कुटूंबातील लोकांना स्थान देणाऱ्या स्वार्थी लोकांना जर राज्याचा सर्वोच्च पुरस्कार दिल्या जात असेल तर या देशातील विषमता संपुष्टात येणे कठीण आहे.

धर्म ही अफूची गोळी आहे हे जे म्हटले जाते ते खरे आहे.अफुमुळे जशी माणसाला गुंगी चढते,तसेच धर्म नावाच्या धार्मिक व्यवस्थेने जगातील सर्वच धर्माच्या लोकांना डोळ्याला झापड बांधून अनेक अवैज्ञानिक, असंवैधानिक आणि अविवेकी गोष्टींवर विश्वास ठेवण्यास बाध्य केले आहे. त्यामुळे प्रत्येक धर्माला मानणारे जे साधेभोळे साधक असतात ते धर्माच्या नावाने काम करणाऱ्या प्रत्येक धर्मातील तथाकचित बुवा,बापू,मुल्ला, मौलवी,पादरी या लोकांवर डोळे बंद करून विश्वास ठेवतात आणि त्यांच्या याच असहायतेचा व अंधश्रध्देचा गैरफायदा धर्माचे ठेकेदार वेळोवेळी घेत असतात.त्यातूनच मग प्रत्येक धर्माच्या धार्मिक कार्यक्रमात अनेकदा अशा दुर्घटना घडत असतात.त्यात मृत्युमुखी पडलेल्या माणसांना धर्मासाठी बलिदान केले म्हणून पुन्हा त्यांच्या मृत्यूचे सुद्धा धार्मिक भांडवल केले जाते आणि त्यांच्या मृत्यूचे खरे कारण लपविले जाते. ही परिस्थिती जगातील कोणत्याही सभ्य समाजाच्या कल्याणासाठी चांगली नाही. त्यामुळे आप्पासाहेब धर्माधिकारींसारखे प्रत्येक धर्मातील जे धर्ममार्तंड असतील त्यांच्या नादी लागणे व त्यांचे श्रेष्ठत्व डोळे बंद करून स्विकारणे लोकांनी थांबविले पाहिजे.धर्म हा वाहत्या पाण्यासारखा निर्मळ असायला हवा.समाजाचे डाग धुवायला तो समर्थ असला पाहिजे. परंतु धर्माचा वापर करून अधार्मिक कृत्य केले जात असतील आणि धर्माच्या नावावर माणसे गोळा करून त्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असेल तर ही गोष्ट धर्माचा अवमान करणारी आहे.

आप्पासाहेब धर्माधिकारी जरी धर्मासाठी माझे सगळे धार्मिक कार्य आहे असा कांगावा करीत असले तरी हा खरा धर्म नसून अधर्म आहे.धर्माचे श्रेष्ठी वातानूकुलीत हवेत बसून लोकांना ४३ डिग्री तापमानात बसवित असतील तर तो अधर्म आहे.लोक चेंगराचेंगरीत तडफडून मरत असतांना धर्माचे ठेकेदार पंचपक्वान्नाच्या जेवणावर ताव मारत असतील तर ही मानवतावादी धर्मतत्वांसोबत केलेली प्रतारणा आहे.अशा कार्यक्रमासाठी जनतेच्या कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करणे आणि धर्माचा उपयोग राजकारणासाठी करणे हा मोठा धर्मद्रोह आहे.त्यामुळे धर्माधिकारी हे दांभिक आणि अधार्मिक ठरतात.आपल्याच धर्माच्या लोकांना मारण्याचे पाप करणारे लोक हे धर्माचे खरे शत्रू असून अशा लोकांमुळेच प्रत्येक धर्माच्या मानवतावादी तत्वांना पायदळी तुडविले जात आहे.आप्पासाहेब धर्माधिकारींसारखे प्रत्येक धर्मातील धर्माचे ठेकेदार हेच धर्माला अधर्म बनविण्याचे दुष्कृत्य करीत आहे.त्यांना वठणीवर आणून प्रत्येक धर्मातील अशा धर्मद्रोही लोकांची घाण साफ करणे हे धर्माला मानणाऱ्या प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे व तोच खरा धर्म आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.