शिवसेना नव्हे ही तर सावरकरसेना!

0 23

शिवसेना नव्हे ही तर सावरकरसेना!

 

नवनाथ दत्तात्रय रेपे

भट बोकड मोठा या पुस्तकातील लेख

काकतालिके न्यायाने स्वातंत्र्यवीर झालेले माफीवीर सावरकर त्यांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकात पान नं. ३७८ वर लिहतात की, ‘शहाजीराजांच्या झालेल्या लहान मुलाच्या दैवी, मात्र पुढे, त्याच्याच ‘नेतृत्वाने’….. आश्चर्यकारक योगायोग देवाने म्हणा, देवाची इच्छा म्हणून म्हणा, काकतालीय न्यायाने म्हणा, किंवा पेरलेल्या प्रयत्नांने ऐक समयावच्छेदे वरून बहरून वर आलेले पीक म्हणून म्हणा’ असं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला कावळ्याप्रमाणे उपमा देणारा माफीवीर सावरकर आमचा आदर्श कसा? जर तो माफीवीर सावरकर शिवसेनेच्या नेत्यांना आदर्श असेल तर ही शिवसेना नसून सावरकर सेना आहे हे स्पष्ट होते.

‘सहा सोनेरी पाने-पुस्तकातून संभाजी महाराजांची बदनामी करणार्‍याचा पुळका कदापिही येऊन देऊ नका, जिजाऊंच्या बदनामीवेळी हे शिवसेनेचे नेते शांत होते…’ बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की, नुसते शिवराय हे नाव जरी उच्चारले तरी हिंदूंच्या तेहतीस कोटी देवांची फलटण बाद होते. पण याच शिवरायांचा अवमान करणार्‍या विनायक सावरकरांना प्रबोधनकारांचे नातू व राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दैवत मानतात तेव्हा प्रश्‍न पडतो की, आजोबा कसे अन् नातू असा. बाळासाहेब ठाकरेसह शिवसेनेची उभी हयात आणि तिसरी पिढी शिवरायांचे नाव घेऊन पैसा आणि खुर्ची मिळवण्याच्या नादात खर्ची होताना दिसतेय पण काही विकृती शिवरायांचा अवमान करत असताना पण हीच शिवसेनेतील काही लोक उघड्या डोळ्यांनी नुसते पाहतात तेव्हा ही शिवसेना प्रबोधनकारांच्या नातवाचीच आहे का? असे वाटते. कारण शिवरायांचा अवमान करणार्‍या बाबा पुरंदरे, जेम्स लेन यांच्यासह पुण्यातील सदाशिव पेठेतील विकृत बांडगुळांना कडेवर घेऊन फिरताना दिसत आहे.
‘आज सावरकरांसाठी पेटून उठणारे लोक
काल शिवरायांच्यावेळी मुर्दाड झालेले होते,
त्यामुळे सामान्य शिवभक्ता तू शहाणा हो,
कोणाच्याही नादाला लागून सावरकरांचा जयघोष करू नको’

विनायक सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कावळ्याप्रमाणे केली त्या सावरकरांचा जर कोणी अपमान केला तर काय वाईट आहे? पण त्या सावरकरांचा अवमान केला तर त्याला भर चौकात फोडून काढू, असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अनेकदा म्हणाले आहेत. तर मग प्रश्‍न पडतो की, उद्धव ठाकरेंचा जो शिवरायांच्या नावावर पक्ष आहे. तो शिवरायांच्या नावाने करोडो रूपयांची माया जमा करून बहुजन समाजाकडे मतांचीही भिक मागतो. शिवसेनेला सावरकर द्वेष्ट्या व्यक्तींचा राग येऊन त्याला फोडावे वाटत असेल तर उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या पक्षाचे नामांतर करून ‘सावरकरसेना किंवा विनासेना’ असे ठेवायला काय अडचण आहे ? शिवसेनेची भुमिका म्हणजे जनतेची मते मागताना शिवाजी महाराज तर खुर्चीवर बसल्यास सावरकर अशी का? बुद्ध, तुकोबाराय, शिव, शंभूराजे, फुले, शाहू, आंबेडकर, आण्णाभाऊ यांच्या बदनामी वेळी मूग गिळून बसणारे शिवसेना नेते सावरकरांवेळी लगेच तोंड उघडतात तेव्हा ही शिवसेना नाहीतर सावरकरसेना अथवा विनासेना म्हणावे का? असे वाटते. शिवसेनेने स्वत:च्या पक्षाचे नाव आणि मतांची भिकही सावरकरांच्या नावानेच मागून सावरकरांचा अवमान करणाराला खुशाल फोडावे पण शिवरायांचे नाव वापरून शिवरायांचाच अवमान करणाराचे उदात्तीकरण करण्यासाठी तोडण्या फोडण्याची भाषा करणे असे महाराष्ट्रातील शिवभक्त सहन करणार आहे का?

देशातील बलात्काराच्या घटनांवर बोलताना राहुल गांधी यांनी ‘रेप इन इंडिया’ असा उल्लेख केला होता. या वक्तव्यावरून राहुल गांधींनी माफी मागावी, पण मी माफी मागणार नाही. मी राहुल सावरकर नसून राहुल गांधी आहे. असे राहुल यांनी वक्तव्य केले. यावर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचे हे ट्विट करून सावरकरप्रेम व्यक्त केले तेव्हा महाराष्ट्रात सत्तारूढ महाविकास आघाडीत सामील कॉंग्रेस काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडामोडीमुळे कॉंग्रेस आणि शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी पडली आहे. म्हणजेच सावरकर हयात असतानाही महापुरुषांच्या अवमानाच्या ठिणग्या उडवतच होते तर आज हयात नसतानाही त्यांनी उद्धव यांच्या खुर्चीला ठिगणी लावली असे म्हणावे का ? प्रत्येक वेळी सावरकरांवरील टीकेवर विषयावर शिवसेना कायमच आक्रमक राहिली आहे.आजही खा. संजय राऊत यांनी ट्विट करताना म्हटले की, वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. तर मग राऊत यांना प्रश्न विचारावा वाटतो की, तुम्ही प्रबोधनकार ठाकरेंना नाकारता का ? कारण त्यांनीच तर सांगितले की, शिवरायांच्या पुढे तेहतीस कोटी देवांची फलटण बाद होते तर मग राऊत तुम्ही जो आज विनायकरूपी नवीनच देव अन् दैवत घेऊन मिरवता ते कशाला ? याचाच अर्थ तुम्ही प्रबोधनकारांना नाकारता हे स्पष्ट होते.

सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाही’ तसेच त्यांनी दुसरे ट्विट करताना म्हटले की, ‘आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे. मग राऊतांना विचारावे वाटते की, बाबा पुरंदरे यांनी शिवरायांचा अवमान केला मग अशा विकृतींशी तरी तुम्ही तडजोड करताच कशाला म्हणजे तुम्हाला शिवरायांपेक्षा सावरकर प्रिय आहेत हे उघड उघड दिसतच आहे.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन विनायक सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनीही तीव्र शब्दात प्रतिक्रिया देताना. ‘उद्धव ठाकरेंनी जाहीररित्या राहुल गांधी यांना जोडे मारावेत’ असं म्हटलं आहे. सावरकर यांचे नातू तसेच पुढे म्हणाले की,  ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नाहीत तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे, जीव गेला तरीही माफी मागणार नाही असं राहुल गांधी म्हणाले. ही चांगलीच गोष्ट आहे की राहुल गांधी यांचे आडनाव सावरकर नाही. त्यांचे आडनाव सावरकर असते तर आम्हाला तोंड काळे करावे लागले असते’. तसेच भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला म्हटले की, एक-दोन नाही १०० जन्म घेतले तरीही राहुल गांधी यांना वीर सावरकर होता येणार नाही. ‘सावरकर हे वीर होते, देशभक्त होते, देशासाठी त्यांनी आयुष्य वेचलं. तर मग सांबित पात्रा यांना प्रश्न करावा वाटतो की, सावरकारांनी देशासाठी आयुष्य वेचलं पण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जगाला महान वाटणारे कार्य ठेचलं त्याचे काय? असे सावरकर आमच्या बहुजन समाजाला प्रिय का म्हणून वाटावेत. सांबित पात्रा तुमचे आदर्श तुम्ही खुशाल मिरवा पण आमच्या महापुरुषांचा अवमान करणार्‍या सावरकरांना आमच्या खरा शिवभक्त कधीही स्वातंत्र्यवीर म्हणणार नाही तर तो माफीवीर सावरकरच म्हणेल हे मात्र नक्की.

राहुल गांधींनी वीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल त्यांना भर चौकात फोडून काढावे, असं आवाहन वीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी उद्धव ठाकरे यांना केलं आहे. ‘सत्य बोललो म्हणून मला माफी मागायला सांगितली जातेय. मी काहीही चुकीचं बोललेलो नाही. त्यामुळं मी घाबरणार नाही. माफी मागायला मी कुणी राहुल सावरकर नाही.  तर दुसरीकडे राहूल गांधींना माफीचे डोस पाजणारे मोदी स्वत: एका महिला शिक्षिकेच्या आरोपातील डॉ. शशिभूषण मेहता यांच्या प्रचारात झारखंड येथे पाहायला मिळाले. शशिभूषण यांच्यावर महिला शिक्षिकेच्या खुनाचा आरोप असून ते जामिनावर आहेत. सकाळ इ न्यूज १६ नोव्हेंबर २०१८ रोजीची म्हत्वाची बातमी म्हणजे औरंगाबाद शहरातील  सिडको चौकातील उड्डाणपुलाचे  नामकरण करण्यात आले होते. या पुलास वसंतराव नाईक उड्डाणपुल असे नाव द्यावे, अशी बंजारा समाजाने मागणी केलेली होती. मात्र या पुलास विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात आले. ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणूनच या उड्डाणपुलावर काळ्या रंगाने माफीवीर सावरकर असा हॅशटॅग लिहण्यात आल्याची घटना घडली होती.

तेव्हा आता आमच्या बहुजन समाजातील तरुणांनी शिवसेनेचा वामनी पडदा आणि पडद्याआड चालणारी सावरकरनिती समजून घेतली पाहिजे तसेच विनायक सावरकर यांना जो भारतरत्न पुरस्कार देण्याचा जो घाट बांधला जातोय तो हाणून पाडून महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी केली पाहीजे. अन्यथा माफी मागणारेच भारतरत्न होतील. तेव्हा ‘काक तालिके न्यायाने सावरकर भारतरत्न झाले’ असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मला उद्धव ठाकरे यांच्यात यदियुरडप्पा दिसतात कारण सध्या सावरकर त्यांचा चार दिवसांचा गणपती करणार असं आजतरी वाटतय …!’

Leave A Reply

Your email address will not be published.