आशा स्वंयसेविकांच्या मागण्यांचा शासन निर्णय काढा – महासंघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा  – मोर्चात महिला कर्मचारी सहभागी

0 35

आशा स्वंयसेविकांच्या मागण्यांचा शासन निर्णय काढा
– महासंघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा  – मोर्चात महिला कर्मचारी सहभागी

धाराशिव : जिल्ह्यात आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक यांनी शासनाने मान्य केलेल्या मागण्यांचा शासन निर्णय त्वरीत काढावा या मागणीसाठी महासंघाच्या वतीने बुधवारी दि. ३१ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.
शासनाने मान्य केलेल्या मागण्यांचा शासन निर्णय लवकर करण्यात यावा यासाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक महासंघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियानात जिल्हयात आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी दि.१८ आॅक्टोबर ते दि.९ नोव्हेंबर या कालावधीत त्यांच्या न्याय व रास्त मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला होता. या संपाच्या पार्श्वभुमीवर संप काळात आरोग्य मंत्री यांनी दि. १ नोव्हेंबर रोजी आरोग्य भवन, मुंबई येथे संपाच्या वाटाघाटीसाठी कृति समितीसोबत बैठक घेतली होती.
आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी संपकाळात अपूर्ण असलेली सर्व कामे पुर्ण केली असली तरी त्यांचा मोबदला कपात करण्यात आला आहे. कपात केलेला मोबदला आशा स्वंयसेविका व गटप्रतर्वकांना अदा करण्याचे आदेश काढण्यात यावेत. राज्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मनामध्ये शासनाप्रति तिव्र नाराजी निर्माण होत चालली आहे. त्यामुळे दि.२९ डिसेंबर पासून आॅनलाईनच्या सर्व कामकाजावर राज्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक बहिष्कार टाकून दि. १२ जानेवारी पासून राज्यव्यापी संपावर गेल्या आहेत. त्यात जिल्हयातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक सहभागी आहेत. मंजुर केलेल्या मागण्यांचे शासन निर्णय त्वरीत निर्गमित करण्यात यावेत. याकरीता दि.३१ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.
शासन निर्णय काढण्याची विनंती
संप स्थगीत होवून दीड महिना होवून गेला परंतु अद्याप शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नाही. नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढुन शासन निर्णय त्वरीत काढण्याची विनंती केली परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही.
आरोग्य मंत्री आश्वासनाचा विसर
आरोग्य मंत्री यांनी आरोग्य भवन, मुंबई येथे एका बैठकीत आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट रु.२००० दिवाळीपुर्वी देण्यात येणार, आशा स्वंयसेविकांच्या मोबदल्यात रु.७००० ची वाढ, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात रु.६२०० ची वाढ, आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी संप काळातील कामकाज पुर्ण केल्यास त्यांना संपकाळातील मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन आरोग्य मंत्री यांनी दिले होते. मात्र या आश्वासनाचा विसर आरोग्य मंत्री महोदयांना पडला असावा असे मोर्चोकरी महिला म्हणाल्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.