ही चळवळ डेंजर आहे

0 297

ही चळवळ डेंजर आहे

 

लेखक नितीन चंदनशिवे
मु.पो.कवठेमहांकाळ
जि.सांगली.
+91 70209 09521

विलास दादा आणि काही कार्यकर्त्यांनी माझं फार आदराने स्वागत केलं.विहाराच्या बाजूला बसलेल्या बायका,म्हातारी माणसं काही तरुण पोरं माझ्याकडे कौतुकाने बघत होती.मला अवघडल्यागत होत होतं.मला विहारात असणाऱ्या ऑफिसमध्ये नेऊन बसवलं.एक फॅन सुरू होता.बाबासाहेबांचा अर्ध पुतळा समोरच्या टेबलावर होता.मी एकटक त्याकडे पाहत होतो.जेव्हा जेव्हा मी या महामानवाकडे पाहत असतो तेव्हा तेव्हा अंगावर असा काटाच येत असतो आणि डोळे आपोआप ओले होतात.कारण याच महापुरुषात मला माणूस म्हणून जन्म देणारी आई दिसते.आणि या आईला सांभाळून ठेवणाऱ्या रमाईमध्ये बाप दिसतो.
आज आयुष्यात मी पहिल्यांदा जयशिंगपूर मधल्या दानोळी गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित झालो होतो.विलास वाघमारे या व्यक्तीने माझा नंबर शोधून माझ्याशी बोलणं करून तीन हजार रुपये मानधन आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती अशी बोलणी केली होती.आणि आज मी आयुष्यात पहिल्यांदा हे सगळं अनुभवत असल्यामुळे पार अवघडून गेलो होतो.
विलास दादाने प्रवास वैगेरे कसा झाला म्हणून चौकशी केली.चहा मागवला आणि बाहेर निघून गेला.त्याची चाललेली धावपळ मी पाहत होतो.गावातील काही तरुण पोरं त्याला मदत करत होती.काही लांबूनच सगळं बघत होती.तिथेही गट तट होते.हे जाणवत होतं.शिकलेली मंडळी येऊन काहीतरी चुका सांगून हे अस नको तस करा म्हणत रुबाब झाडत होती.पण विलास दादा सगळ्यांना मान देत होता.खुर्च्या लावण्यापासून ते स्टेजवर कस काय कुठं असावं हे स्वता पाहत होता.त्याची धावपळ मला फार ऊर्जा देऊन जात होती.
कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी तासभर माईकवरून विलास दादा सर्व गल्लीतल्या लोकांना अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून विहारात या कार्यक्रम सुरू करीत आहोत असं ओरडून ओरडून सांगत होता.समोर तीनशे खुर्च्या टाकलेल्या होत्या आणि त्यातल्या फक्त तीनच खुर्च्यांवर तीन म्हातारी माणसं बसली होती.मला गर्दी होत नसल्याचे पाहून घाम फुटत चालला होता.जीव रडकुंडीला येत होता.पण अखेर याच स्वाभिमानी कार्यकर्त्याने विलास दादाने बाहेर जाऊन प्रत्येकाला हाताला धरून आत आणून बसवलं आणि बघता बघता दोनशे खुर्च्या भरल्या.
कार्यक्रम सुरू झाला.प्रमुख पाहुणे म्हणून दीपप्रज्वलन करताना मी आतून खूप आनंदून गेलो.आणि उदघाटन करून प्रमुख पाहुण्यांच्या खुर्चीत बसलो.माईकवर बोलणारा विलास दादा,त्यानंतर स्टेजवर पाणी आणून ठेवणारा तोच विलास दादा,बेभान होऊन काम करणारा हा कार्यकर्ता. विलास दादा हा रिक्षा चालवत होता हे मला त्यावेळी कळलं.
मी बोलायला उभा राहिलो.प्रमुख पाहुणा म्हणून अगदी तासभर बेंबीच्या देठापासून बोललो.कुणाचीच भीडभाड न ठेवता तिथं जे दिसत होतं त्यावर ही घाव घालून बोललो.अनेकांच्या वर्मी लागलं होतं पण मला स्तुती करून बोलता येत नाही तो माझा स्वभाव नाही.आणि मी विद्रोही आहे मला सहन होत नाही त्यावर मी त्याच आवाजात आणि त्याच त्वेषाने बोलण्यातून हल्ला करू शकतो हे आयुष्यात मला तिथंच कळलं.भाषण संपलं तेव्हा,विलास दादाच्या चेहऱ्यावर असलेल समाधान पाहून मला मनोमन आनंद झाला.जिंकल्यागत वाटू लागलं.
तासभर मिरवणुकीचा कार्यक्रम झाला.रात्रीचे अकरा वाजले.मला भूक लागली होती.विलास दादा आणि दोन पोरं खुर्च्या उचलत होती.सगळेजण आपल्या घरी निघून गेले होते.मी केविलवाणे विलास दादाला बघत होतो.
अखेर बारा वाजता त्याचं आवरून झालं.त्याने मला त्याच्या रिक्षात बसवलं आणि म्हणाला चला आता माझ्या घरी सोबत जेवण करू सकाळी लवकर तुम्हाला स्टँडवर नेऊन सोडतो.मी बसलो आणि “कार्यक्रम लै भारी झाला दादा तुम्ही पार झोडपून काढलं.जी अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त तुम्ही दिलं” असं म्हणणारा विलास दादा मला आयुष्यातला फार मोठा पुरस्कार देणाराच कुणीतरी वाटत होता.
विलास दादाच्या दारात रिक्षा थांबली.मी आणि विलास दादा उतरलो.एक छोटं घर होत विलास दादाचं.त्याने दार वाजवलं.विलास दादाच्या बायकोने दार उघडलं.तिने माझ्याकडे अतिशय रागानेच बघितलं.विलास दादा ही खाली मान घालून म्हणाला दादा या आत या.मी आत आलो.पाठीवरची बॅग विलास दादाकडे दिली.त्याने लोखंडी खाट होता त्याखाली तिला व्यवस्थित सरकवली.आणि उभा राहतच त्याने माझ्या हातात ते मानधनाचे पाकीट त्याच्या पत्नीसमोर दिलं.देताना त्याने हात जोडले.नम्रपणे त्याने जय भिम केला.पण त्याच्या आवाजातील स्वाभिमान मला स्पष्ट जाणवत होता.समोरच्या भिंतीवर बाबासाहेब आणि रमाई शांत पाहत होते.मी एकटक तिथेच नजर लावत खाली टाकलेल्या चटईवर मांडी घालून बसलो.
समोरच्या खाटेवर विलास दादाची तीन लेकरं शांत झोपली होती.त्यांची दप्तरे भिंतीला असणाऱ्या खुंटीला टांगलेली होती.ती अनेक जाग्याला शिवलेली स्पष्टपणे दिसून येत होती.वर पत्र्याला लावलेल्या ट्यूबवर बारीक पाखरं खेळत होती.खोलीच्या मध्ये एक साडी आडवी बांधलेली होती.आणि साडीच्या पलीकडे विलासदादाची बायको स्टोव्ह पेटवून जेवण गरम होती.तिच्या हालचालीवरून,आतल्या आदळणाऱ्या भांड्याच्या आवाजावरून ती किती चिडलेली आहे हे जाणवत होतं.ते लपवण्यासाठी विलास दादा हसून काहीही बोलण्याचा प्रयत्न करत होता पण मला जाणवत ते ही होतं.अखेर दोन ताटं वाढून तिने आमच्यामसोर ठेवली.नंतर पाण्याचे तांबे सुद्धा असे जोरातच ठेवले.व बाजूला भिंतीला टेकून केस सावरत समोरच बसली.मी काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो.ताटात वांग्याचं कालवण एका वाटीत आणि दुपारच्या भाकरी,थोडासा भात होता.विलास दादाने अगदी बारीक आवाजात तिला विचारलं काही गोड केलं नाहीस का आज.?त्यावर तिने खसकन उत्तर दिलं ” हो केलंय ना ठेवलंय दडवून मी.सकाळी काही देऊन गेला असता तर केलं असतं, आता हे एवढं खा,पीठ ही संपलं आहे.सकाळी शिरा करून देईन.”तिच्या या बोलण्यातून मला तिरस्कार दिसून येत होता.मी खात चाललो होतो,विलास दादा खाली मान घालून खाता खाता बोलत होता.”दादा काही लोकं देतात वर्गणी,पण तेवढ्यात होत नाही.म्हणून कुठूनतरी व्याजाने ऐनवेळी घ्यावे लागतात.तिथं काही कमी पडू नये म्हणून राशन ही भरलं नाही.पण या पिढीला बाबासाहेब कळले पाहिजेत.ही चळवळ जिवंत राहिली पाहिजे म्हणून हे सगळं करावं लागतं.”मी त्याचं बोलणं ऐकत होतो मधूनच त्याच्या बायकोकडे नजर जात होती ती एकटक विलास दादा कडे तिरस्काराने बघत होती.मी काही तिच्या माहेरून आलो नव्हतो,पण मी काही जणू तिचं घरच पाडायला आलोय की या भावनेने ती मधूनच माझ्याकडे पाहत होती.त्याच विचारात हात धुतला.शर्टाच्या वरच्या खिशात ते तीन हजार रुपये असलेलं पाकीट मला त्या माऊलीच्या कडून शिव्या घालत असल्याचं भासत होतं.
विलास दादाने अंथरून टाकलं.आणि आम्ही दोघे जवळ जवळ झोपलो.त्याच्या बायकोने लाईट बंद केली.आणि ती साडीच्या पलीकडे जाऊन झोपली.मी अंधारात तसाच उघडे डोळे करून पडून राहिलो.मला डोळ्याला हे सगळं दिसत होतं.ही चळवळ मी जवळून अनुभवत होतो.कोण आहे हा विलास?कशासाठी हे करतो,?उद्या पेपरमध्ये त्याचे कुठे नाव ही येणार नाहीय की त्याचा कुणी जाहीर सत्कार ही घेणार नाहीय.तिथं माझ्यासारख्या पोपटाचं उद्या पेपरमध्ये नाव येणार आहे.माझा फोटो येणार आहे.मी काय केलंय एवढं.मला फक्त बोलता येतं,काहीतरी लिहिता येतं म्हणून मी घेतले आहेत तीन हजार रुपये मानधन.ही कसली चळवळ आहे.काय आहे हे सगळं.तरीही याच चळवळीत असणाऱ्या मानवतेच्या विचारांवर आजही का एवढा विश्वास आहे.हे सगळं मेंदूत सुरू व्हायला लागलं रक्त गरम झाल्याचं जाणवत होतं.विलास दादाच्या बायकोचा त्याच्या झोपलेल्या मुलांचा चेहरा डोळ्यासमोर येत होता.आणि त्याच अंधारात समोरच्या भिंतीवर रमाईसोबत असणाऱ्या बाबासाहेबांना मी पाणावलेल्या डोळ्यांनी शोधण्याचा प्रयत्न करत होतो.
त्याच अंधारात मी विलास दादा झोपल्याची खात्री केली.अंग थरथर कापू लागलं होतं.मी उठून बसलो.रक्त उसळत होतं.मला काय होतंय कळत नव्हतं.मी ते मानधनाचं पाकीट बाहेर काढलं.शंभरच्या तीस नोटा होत्या.त्यातल्या तीन नोटा मी काढल्या.वरच्या खिशात ठेवल्या.आणि पांढरं पाकीट मी हळूच अंथरुणाच्या खाली सारून दिलं.झोप लागतच नव्हती.पण विलास दादा मात्र समाधानाने झोपला होता.मी ठरवलं होतं काहीही करून लवकर उठायचं गडबड करायची आणि चहा न घेता ताडकन निघून जायचं.विलास दादाला अंथरून काढायची संधी द्यायचीच नाही.मी इथून निघून जाईपर्यंत त्याच्या हाताला हे पाकीट लागू द्यायचं नाही.
पाच वाजले जसं नियोजन केलं होतं अगदी तसच वागायला सुरवात केली.विलास दादाला झपाट्याने उठवलं.आणि म्हणलं निघायला हवं दादा मला सोडा जयशिंगपूरला. लवकर जायचंय मला.मी त्याला काहीच बोलू दिलं नाही.तो तिथून उठेपर्यंत मी हललो नाही.मी बाथरूमला जाण्यास ही नकार दिला म्हणलं स्टँडवर गेल्यावर पाहू.तो उठला त्याने लाईट लावली.शर्ट घातला.तेवढ्यात पलीकडून त्याची बायको म्हणाली “चहा ठेवते.”मी झपाट्याने नकार दिला.विलास दादाने शर्ट घातला.मी अंथरुणाच्या वरूनच हाताने चापचून बघितलं ते मानधनाचे पाकीट व्यवस्थित जाऊन त्याच्या हक्काच्या जागी विसावलं होतं.
मी अंथरून काढायची कसलीच संधी दिली नाही.त्याला तसाच घेऊन मी निघालो सुद्धा.यात एक गोष्ट चांगली झाली.चार्जिंगला लावलेला त्याचा मोबाईल तो घरातच विसरला.आम्ही स्टँडवर आलो.कुरुंदवाड ते पुणे गाडी स्टँडरवर लागलेली होती.मी बाथरूमला जाऊन आलो.आणि गाडीत बसलो.विलास दादा खूप प्रेमाने बोलत होता.त्याची तळमळ मला इथेही जाणवत होती.पण का कुणास ठाऊक मी त्याच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हतो.गाडी हलली आणि मी मोकळा श्वास सोडला.जोरजोरात हुंदका दाटून येत होता.विलास दादा त्याची लेकरं आणि त्याची बायको ती माऊली डोळ्यासमोरून जाता जात नव्हती.
मला गाडीत बसून एकच तास झाला होता.गाडी बरीच पुढे निघून आली होती.आणि तेवढ्यात विलास दादाचा फोन यायला सुरुवात झाली.ते पाकीट त्याला सापडलं असणार आणि हा ते दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.मी जिथे असेल तिथे तो आणून देणार हे ओळखून घेतलं.पूर्ण रिंग होऊ दिली.नंतर मी मोबाईल स्विच ऑफ केला.स्क्रिन बंद होताना दिसली आणि आपोआपच तोंडातून जय भिम हे शब्द बाहेर पडले.
त्या सबंध प्रवासात माझ्या डोळ्यासमोर वामनदादांची खांद्याला अडकवलेली ती सुरपेटी दिसत होती.त्या सुरपेटीचा सुद्धा किती मोठा वाटा या चळवळीमध्ये आहे.याच चळवळीत मी आजवर स्वतःला मिरवून घेणारे बघत आलोय.फूट पाडणारे सुद्धा बघत आलोय.याच चळवळीच्या जीवावर घर भरणारे ही आणि दुसऱ्याचे घर जाळणारेसुद्धा पाहत आलोय.आणि याच चळवळीत संघटनेच्या पदावर बसून वर्गणीच्या नावाखाली खंडणी गोळा करून घर भरणारी औलाद ही पाहत आलोय.तर मी अमुक तमुक संघटनेचा अध्यक्ष असून मी या पदावर असून तुला पुरस्कार देतो,असं सांगून बायकांना झोपवणारी ही औलाद याच चळवळीत आजही जिवंत आहे.मला या सगळ्यांना एक दिवस नागडं करून यांची चाबकाने फटके देत मिरवणूक काढावीशी वाटते.
इथे गट आहेत.फुटीरवादी,विकली जाणारी,पदासाठी आणि खुर्चीसाठी लाचार होणारी पैदास ही या चळवळीत आहे.इथं नालायक आणि भिकारचोट सुद्धा आहेत.चळवळीच्या आणि बाबासाहेबांच्या नावावर घरं भरणाऱ्या हरामी औलादी सुद्धा आहेत.इथं जयंतीच्या बॅनरवर बाबासाहेबांच्या बाजूला गळ्यात सोन्याच्या चैनी घालून फोटो लावणारी गुंडाची जमात सुद्धा आहे.
पण एवढं असूनही ही चळवळ आज का जिवंत आहे.?का याच चळवळीमधून ऊर्जा मिळत राहते?याच आंबेडकरी चळवळीची ताकद साऱ्या जगात आहे ती का? याला कारण एकच.रक्तात,मनगटात,मेंदूत आणि काळजात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पेरून घेतलेल्या विलास दादा सारख्या असंख्य कार्यकर्त्यांमुळेच हे विचार आणि ही मानवतेची ज्योत पेटवू पाहणारी आंबेडकरी चळवळ आजही ताठ मानेने जिवंत आहे.आणि म्हणून मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं या चळवळीशी नातं जोडू पाहणाऱ्या प्रत्येकाला सांगावं वाटतं स्वतःला मिरवून घेण्यापेक्षा गिरवून घ्या.नुसती वळवळ काहीच कामाची नाही त्यासाठी तळमळ असू द्या तरच ही चळवळ पुढे जात राहणार आहे.

आणि आज मनापासून त्या असंख्य विलास दादांना त्या तळमळीने स्वतःच्या संसाराची पर्वा न करता या चळवळीला आयुष्य मानून तळमळीने जगणाऱ्या त्या प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्त्यांना मी पवित्र मनाने नम्रपणे स्वाभिमानी जय भिम म्हणतो आहे.
जाता जाता त्या चळवळ बदनाम करणाऱ्या,खुर्चीसाठी लाचार होणाऱ्या,विकल्या जाणाऱ्या प्रत्येक हरामखोराला सांगू इच्छितो,आता तरी सुधारा स्वतःला नाहीतर याद राखा
आंबेडकर फार डेंजर आहे.आणि ही चळवळ सुद्धा डेंजर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.