निवडणुकीला उभे राहणार नाही, अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार : शरद पवार

0 70

निवडणुकीला उभे राहणार नाही, अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार : शरद पवार

 

मुंबई : शरद पवार नावाचं घोंघावणारं वादळ आता संसदीय राजकारणात दिसणार नाही. योग्य वेळी भाकरी फिरवावी लागते, ती नाही फिरवली तर ती करपते, असं सूचकपणे शरद पवार म्हणाले होते. आज त्यांनी भाकरी फिरविण्याची सुरुवात स्वत:पासून केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याचं सांगत पुन्हा निवडणुकीला उभा राहणार नाही, अशी मोठी घोषणा शरद पवार यांनी केली.

लोक माझे सांगाती या आत्मकथेच्या दुसऱ्या भागाचं प्रकाशन आज झालं. याच भाषणात त्यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. कुठेतरी थांबण्याचा विचार मनात आला, असं सांगताना आता नवा अध्यक्ष कोण, याचा विचार पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी करावा, शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे.

माझा अनेक स्वयंसेवी संस्थाच्या कामकाजामध्ये सहभाग आहे. रयत शिक्षण संस्था (सातारा), विद्या प्रतिष्ठान (बारामती), मराठा मंदीर (मुंबई), महात्मा गांधी सर्वोदय संघ (उरळी कांचन, पुणे), शिवनगर विद्या प्रसारक मंडळ (बारामती), अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद (पुणे) ह्या संस्थामधून साडेचार लाखाहून अधिक विद्यार्थी विविध अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेतात. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून गेली २४ वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनीक जीवनातील १ मे १९६० पासून सुरू झालेला हा संपुर्ण प्रवास गेली ६३ वर्षे अविरत चालू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधीक लक्ष घालण्यावर माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.