महिलांनी बुवाबाजी पासून दूर राहावे : जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्ष सीमाताई बोके यांचे आवाहन

0 349

महिलांनी बुवाबाजी पासून दूर राहावे : जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्ष सीमाताई बोके यांचे आवाहन

 

वाशिम : समाजात दैववादाचे वाढते प्रमाण लक्षात घेता महिला कर्मकांडात मोठ्या प्रमाणात गुरफटलेल्या आहेत. त्यामुळे या अंधश्रद्धेमुळे अनेकदा महिलांचे मानसिक, आर्थिक, वैचारिक शोषण होत असून महिलांनी चिकित्सक होऊन बुवाबाजी पासून दूर राहण्याचे व संघटन वाढीवर भर देण्याचे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा विदर्भ विभाग प्रमुख शिवमती सीमाताई बोके यांनी केले आहे.

त्या जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात येथील वाटाणे लॉन्स मध्ये शनिवारी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरीताई भदाणे तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ उद्योजिका सत्यभामाताई पाटील या होत्या. प्रमुख मार्गदर्शक तथा उपस्थितीमध्ये वाशिमच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशालीताई देवकर, उपशिक्षणाधिकारी शिवमती सविताताई मोरे, वाशिम पंचायत समितीच्या सभापती सौ सावित्रीबाई गोविंदराव वानखेडे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा शिवमती कीर्तीमालाताई चौधरी, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कोषाध्यक्षा शिवमती इंदुताई देशमुख, प्रदेश उपाध्यक्षा ज्योतीताई कोथळकर, प्रदेश सदस्य शीलाताई पाटील, सुरेखाताई राऊत, जिजाऊ ब्रिगेडच्या अकोला विभागीय अध्यक्ष संजीवनीताई बाजड, अमरावती विभागीय अध्यक्ष अश्विनीताई देवके आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्षा माधुरीताई भदाणे यांनी जिजाऊ ब्रिगेडमध्ये काम करताना पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे. त्यासाठी स्वतःला अपडेट करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. आम्ही जुन्या काळात काय काम केले, यापेक्षा आम्ही आज काय काम करतो या बाबींना महत्त्व देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी केले. आपल्या उद्घाटकीय भाषणात सत्यभामाताई पाटील यांनी बोलतांना जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी स्वकर्तुत्वावर आसमंत गाजवण्याचे प्रतिपादन केले. स्वतःची ओळख निर्माण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करताना कार्य कुशलता आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी महिलांना दाही दिशांवर राज्य गाजवण्याचे केलेले आवाहन सर्वच महिलांनी कृतीत आणण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी वैशालीताई देवकर यांनी जिजाऊ ब्रिगेडचे संघटन महिलांना स्वावलंबी बनवणारे असल्याचे प्रतिपादन केले. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी जिजाऊ ब्रिगेड करीत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा त्यांनी केली. उपशिक्षणाधिकारी सविताताई मोरे यांनी महिलांचा व्यक्तिमत्व विकास लक्षात घेता त्यांच्याशी मुक्त संवाद आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित महिला कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांशी प्रदेशाध्यक्षांनी मुक्त संवाद साधण्याचा प्रयत्न केला. याच कार्यक्रमा दरम्यान पंचायत समिती सभापती सौ सावित्रीबाई वानखेडे तसेच मालेगाव पंचायत समिती सभापती प्रतिनिधी मधुकरराव काळे यांचा व जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हा कार्यकारिणी तसेच सर्व सहा तालुका कार्यकारिणी व वाशिम शहर कार्यकारिणीचा सन्मान माधुरीताई भदाणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या मेळाव्याचे संचालन जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय सचिव सविताताई बोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा सचिव सुनिताताई कढणे यांनी पार पाडले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष अशोकराव महाले, माजी जिल्हाध्यक्ष वसंतराव अवचार, भरतराव आव्हाळे, विभागीय सचिव अनंतराव गायकवाड तसेच संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजाननराव भोयर यांनी भूमिका पार पाडली असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काळबांडे, जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव उगले, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय कार्याध्यक्ष सुरेखाताई आरु, जिल्हाध्यक्ष अनिताताई कोरडे, जिल्हा कार्याध्यक्ष वैशालीताई बुंधे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे, डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे राज्य उपाध्यक्ष कैलासराव सोळंके,जिल्हाध्यक्षा ज्योत्स्नाताई बल्लाळ,जिल्हा सचिव संजीव कोरडे यांच्या नेतृत्वात वाशिम तालुकाध्यक्ष ज्योतीताई इढोळे, सचिव प्रतिभाताई इंगळे ( जाधव ), कार्याध्यक्ष वैशालीताई आरु, स्वातीताई गोरे ( बोडखे ), दिपालीताई मापारी, मीनाताई मापारी, उषाताई मगर, विमल लहाने, किरण महाले, शहराध्यक्ष ॲड.अश्विनी ठाकरे,ज्योतीताई भोयर व त्यांच्या सहकारी तसेच संभाजी ब्रिगेडचे भागवतराव बुंधे, शिवाजी महाले, शेख इसाक, विष्णू भोयर, मुन्नाभाई भवानीवाले, राहुल सोमटकर आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.