तुमसर मधील शिवभोजन केंद्रावर थाळी एक बोगस लाभार्थी अनेक 

0 180

तुमसर मधील शिवभोजन केंद्रावर थाळी एक बोगस लाभार्थी अनेक 

राज्य सरकारच्या डोळ्यात धुळ फेकण्याचा प्रकार

 

भंडारा : राज्यसरकाने गरीबांसाठी अल्प दरात शिवभोजन या नावाने जेवण देण्याची योजना सुरू केली. मात्र या योजनेत बोगस लाभार्थी दाखवून पैसे लाटण्याचा जोरदार धंदा सध्या होताना दिसत असल्याचे उघड झाले आहे.

भंडारा जिल्ह्यात एकूण ६२ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. यात साकोली आठ, तुमसर ११, भंडारा १७, लाखांदूर सहा, लाखनी सहा, मोहाडी आठ व पवनीतील सहांचा समावेश आहे. तुमसर तहसील कार्यालय परिसराती शिवभोजन केंद्रात दिल्या जाणाऱ्या दहा रुपये किंमतीच्या एका थाळीसाठी राज्य सरकार ४० रुपयांचे अनुदान देते. हे अुनदान लाटण्यासाठी एकच थाळी शंभर बोगस लाभार्थ्यांपुढे ठेवून पोर्टलवर फोटो अपलोड केले जात असल्याचा प्रकार जिल्ह्यातील तुमसर तहसील कार्यालय परिसरातील शिवभोजन केंद्रावर होत असल्याचे उघड झाले आहे.

गोरगरीब सामान्यांसाठी साकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शिवभोजण उपलब्ध रहावे, असा नियम असताना बोगस लाभार्थ्यांच्या मदतीने केवळ एका थाळीचे फोटो काढून त्यात केवळ वेगळे लाभार्थी दाखवून अवघ्या तासाभरात शिवभोजन थाळ्यांचा  कोटा पूर्ण केला जात असल्याचा प्रकार तुमसर तहसील कार्यालय परिसरात असलेल्या शिवभोजन केंद्रावर होताना दिसत आहे.

महाविकास आघाडी सरकारने राज्यातील गरीबांसाठी अल्प दरात जेवणाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा रुपयांत जेवण देण्यासाठी शिवभोजन योजना सुरू केली. या थाळीत शंभर ग्रॅम पोळी, वरण, भात आणि भाजीचा यांचा समावेश आहे. ही योजना सुरू केल्यानंतर सुरूवातीला गोरगरिबांना या योजनेचा लाभ मिळाला. कोरोनाच्या वेळी अनेकांनी या शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला होता. शिवभोजन देणा-या केंद्रचालकांना एका थाळीसाठी सरकारने ४० रुपये अनुदान देण्याचे ठरवले होते.

एका शिवभोजन केंद्राला दरदिवशी शंभर लाभार्थ्यांचा कोटा पूर्ण करावा लागतो. या जेवणाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची नोंद सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ४ वाजतापर्यंत पोर्टलवर नोंद घेण्यात येत असते. परंतु शंभर थाळ्यांचा कोटा अवघ्या काही तास-दोन तासांतच पूर्ण करून बोगस लाभार्थ्यांच्या मदतीने हा केवळ शासकीय अनुदान लाटण्याचा प्रयत्न सध्या घडताना दिसत आहे.

तुमसर तालुक्यात तहसील कार्यालय परिसरात असलेल्या एका शिवभोजन केंद्रावर लहान लहान मुलांना कॅमेरासमोर बसवून एकच थाळी समोर ठेवून त्यांचे वेगवेगळे फोटो काढून ते अपलोड केले जात असून त्या लहान मुलांना फोटो काढल्यानंतर पाच रुपये देण्याचा प्रकार या केंद्रावर सर्रासपणे होत असल्याचे समोर आले आहे. असे बोगस लाभार्थी दाखवून ते फोटो पोर्टलवर अपलोड करून काही वेळातच कोटा पूर्ण जेवण बंद केले जाते. केंद्र चालकांच्या या चुकीच्या वागण्याने खरे लाभार्थी जेवणापासून वंचित राहत आहेत. तुमसर मध्ये जर शिवभोजन थाळीचा घोटाळा करून अनुदान लाटले जाते असेल तर संपूर्ण राज्यातील शिवभोजन केंद्राचे काय असेल असा प्रश्न उपस्थित राहत असल्याने राज्य शासन आणि पुरवठा विभागाने याचा गांभीर्याने विचार करून चौकशी केल्यास यात अनेकांचे हात काळे झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.