पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या निम्म्यावर ‘ह्युमन रिप्राॅडक्शन अपडेट’ जर्नलमध्ये धक्कादायक खुलासा

0 640

पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या निम्म्यावर ‘ह्युमन रिप्राॅडक्शन अपडेट’ जर्नलमध्ये धक्कादायक खुलासा

 

 Human Reproduction Update (Journal) : भारतासह जगभरातील पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी होत आहे. ही बाब एका नव्या अभ्यासात समोर आली आहे. ‘ह्युमन रिप्रॉडक्शन अपडेट’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात हा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे. पुरुषांच्या वीर्यातील प्रति मिलीलीटर शुक्राणूंची संख्या कमी होत चालली आहे. गेल्या ४६ वर्षांत पुरुषांच्या शुक्राणूंच्या संख्येत ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. अभ्यासानुसार, गेल्या २२ वर्षांत शुक्राणूंची संख्या कमी होण्याचे प्रमाण आणखी वाढले आहे.

जगभरातील अनेक देशांमधील माहितीच्या आधारे केलेल्या अभ्यासानुसार, १९७३ मध्ये शुक्रणूंची संख्या १०१ दशलक्ष प्रति मिली नोंदवली गेली होती. मात्र २०१८ मध्ये, शुक्रणूंची संख्या ४९ दशलक्ष प्रति मिली पर्यंत कमी झाली आहे. सदर रिसर्च शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने केला आहे. यापूर्वी २०१७ मध्ये असा अभ्यास उत्तर अमेरिका, युरोप आणि आॅस्ट्रेलियावर करण्यात आला होता. त्यातही अशीच आकडेवारी आढळून आली होती. आत्ता केलेल्या अभ्यासासाठी दक्षिण अमेरिका, आशिया आणि आफ्रिकेतील देशांचा समावेश करण्यात आला आहे. ह्यूमन रिप्रोडक्शन अपडेट या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. यामध्ये ५३ देशांतील ५७ हजारांहून अधिक पुरुषांच्या वीर्य नमुन्याच्या आधारे २२३ पेपर्स अभ्यासण्यात आले. त्यानंतर निष्कर्ष काढण्यात आला.

अभ्यासातील निष्कर्षानुसार, २००० नंतर जगभरातील पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंच्या एकाग्रतेत घट झाली आहे. १९७३ ते २०१८ पर्यंतच्या आकडेवारीनुसार २००० पर्यंत दरवर्षी शुक्राणूंची संख्या सरासरी १.२ टक्यांनी घटली. त्यावेळी, २००० नंतर, ही घट दरवर्षी २.६ टक्यावरून अधिक वाढलेली दिसून येते.

पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या का कमी होत आहे ?

या अभ्यासात शुक्राणूंची संख्या कमी होण्याचे कारण शोधण्यात आलेले नाही. तथापि, या अभ्यास गटाचे नेतृत्व करणारे जेरूसलेमच्या हिब्रू विद्यापीठाचे प्राध्यापक हेगाई लेविन यांच्या मते, हा जीवनशैली आणि वातावरणातील रसायनांचा प्रभाव असू शकतो. शुक्राणूंची संख्या कमी होण्याचे खरे कारण काय आहे हे या अभ्यासात स्पष्ट झालेले नसले तरी, निरोगी जीवनशैलीचे पालन करणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शुक्राणूंची संख्या कमी झाल्याचा काय परिणाम ?

शुक्राणूंची संख्या कमी झाल्यामुळे गर्भधारणा लांब शकते. जोडप्यांना गर्भधारणा करण्यात अडचण येऊ शकते. जेव्हा वीर्यामध्ये प्रति मिलीलीटर १५ दशलक्षपेक्षा कमी शुक्राणू असतात, तेव्हा त्याला कमी शुक्राणूंची संख्या म्हणतात. यामुळे गर्भधारणा होण्यात अडचण येऊ शकते. मात्र, या स्थितीतही गर्भधारणा शक्य आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.