नाशिकमध्ये सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेची मागणी

0 1,012

नाशिकमध्ये सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेची मागणी

नाशिक : त्रंबकेश्वर देवस्थान, त्रंबकेश्वर, नाशिक येथे सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेच्या वतीने लेखी निवेदन सादर करून मागणी करण्यात आली आहे. कारण दोन दिवसांपूर्वी त्रंबकेश्वर देवस्थान परिसरात संदल उरूस निमित्त अनेक वर्षाची परंपरा असल्याने मुस्लिम बांधवांनी पहिल्या पायरीवर धूप दाखविण्याच्या प्रकाराला धार्मिक रंग देऊन त्रंबकेश्वर परिसरात सामाजिक सलोखा, शांतता बिघडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचे निदर्शनास आल्याचे या संघटनेचे मत आहे.

पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिक शांतता समिती यांनी बैठक घेऊन सदर प्रकरण शांततेने मिटवले असतांना पुण्यातील हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे व त्यांचे सहकारी यांनी त्रंबकेश्वर शहरात येऊन त्रंबकेश्वर मंदिर प्रवेशद्वारावर आंदोलन करून, चुकीचे विधान करून त्रंबकेश्वर परिसर, तालुका, नाशिक जिल्हा व समस्त महाराष्ट्र राज्यात शांतता भंग करून, सामाजिक तेढ निर्माण करून, भावनिक श्रद्धेच्या नावाखाली सामाजिक सलोखा बिघडविण्याचे कृत्य केले होते. मात्र त्रंबकेश्वर नाशिक हे ठिकाण भारतीय संविधानाच्या ५ अनुसूचित येत असून अनुच्छेद २४४ खाली येथील भाग व त्रंबकेश्वर देवस्थान हे आदिवासींच् आद्यदैवत, त्रंबकराज महादेव यांचे आहे. हे देवस्थान आदिवासींच्या सामाजिक, सांस्कृतिक, प्रथा, परंपरा, अस्तित्वाशी निगडित आहे. शेकडो वर्षांपासून आदिवासी महादेव कोळी व आदिवासी ठाकर समाज या मंदिरात पूजा-अर्चा करून मंदिर व परिसराचे, निसर्गाचे संवर्धन करत आला आहे. त्याचे सर्वच अधिकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या दोन्ही आदिवासी समाजाकडेच राहिलेले आहे, असं आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेने दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे.

भारतीय संविधानाच्या ५ व्या अनुसूचीतील आदिवासींच्या क्षेत्रात बेकायदा घुसखोरी करून अनुसूचित क्षेत्रातील सामाजिक सलोख्याचे वातावरण खराब करून आदिवासी समाजाची सामाजिक शांतता भंग केली आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे व त्याचे सहकारी, कार्यकर्ते, आचार्य तुषार भोसले यांचे व्हिडीओ तपासून ओळख पटवुन त्यांच्यावर आदिवासी समाजाची सामाजिक शांतता भंग केल्या प्रकरणी व अट्रोसिटी कायद्या अंतर्गत व जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करत असल्याबद्दल त्यांच्यावर भारतीय दंड संहिता १५३ नूसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी या संघटनेने केली आहे.

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३४२ व माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार देखील आदिवासी समाज हा हिंदू नाही. मग हिंदुशिवाय मंदिरात जाण्यास सक्त मनाई हा फलक येथील मूळ भूमिपुत्र समस्त आदिवासी समाजाला त्याच्या मूळदैवत महादेवाचे पूजा अर्चा दर्शन करण्यासाठी नाकारण्यात आला आहे का हि शंका उपस्थित होत आहे. सदर त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट वर जिल्हा न्यायालयाचे पदसिद्ध न्यायाधीश मुख्य संचालक म्हणून आहे तरीही मग असा फलक लावला जात असेल तर हे भारतीय राज्यघटनेचा व न्यायालयाचा अवमान नाही का ? हा फलक कोणाच्या आदेशाने लावला त्याचा तपास करून त्यांच्यावर देखील कडक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे तसेच प्रवेश द्वारावरील हिंदुशिवाय कोणाला प्रवेश नाही हा सूचना फलक देखील तात्काळ काढून टाकण्यात यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करत शांतता, सामाजिक सलोखा, सामाजिक सौदहार्य टिकवण्यासाठी आमची संघटना त्रंबकेश्वर येथील पदाधिकारी पोलीस प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करेल अस जिल्हाध्यक्ष दिलीप गांगुर्डे यांनी केले. त्यावेळी त्यांच्यासोबत नाशिकचे उपजिल्हा प्रमुख बाळू झोले, शहराध्यक्ष शशिकांत मोरे, प्रवक्ते देवा वाटाने, त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख अशोक लहांगे व त्यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सामाजिक सलोखा बिघडवणारे ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे व भाजपचे तुषार भोसले यांचेवर कार्यवाही करावी अशी मागणी आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेच्या वतीने करण्यात आली असून या निवेदनाची प्रत राष्ट्रपती मा. द्रोपदी मुर्मू, मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य. मुंबई, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. अध्यक्ष अनुसूचित जाती-जमाती आयोग, महाराष्ट्र राज्य, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित व त्रंबकेश्वर-इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांना पाठवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.