ब्राह्मण हे इब्राहिमचे वंशज आहेत’ गायक लकी अली

0 50

ब्राह्मण हे इब्राहिमचे वंशज आहेत’ गायक लकी अली

 

मुंबई- प्रसिद्ध गायक लकी अली यांनी ‘ब्राह्मण’ हा शब्द ‘अब्राहम’ किंवा ‘इब्राहिम’ वरून आला आहे अशी पोस्ट लिहिली. अल्पावधीतच ही पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आली ज्यावरून आता नवा वाद निर्माण होताना दिसत आहे. लकी अली यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. हे प्रकरण अजून वाढू नये म्हणून गायकाने लगेच माफीही मागितली.

जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो, असे लकी अलींनी यावेळी म्हटले. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असं म्हणत लकी अलींने पुढे लिहिले की, त्यांना इतरांच्या विश्वासाला तडा देण्याचा कोणताही हेतू नव्हता. तसेच वाद निर्माण करण्याचाही त्यांचा इरादा नव्हता.

गायकाने माफी मागत लिहिले की, ‘मी याआधी लिहिलेल्या पोस्टवरून निर्माण झालेला विवाद जाणवला. कोणातही वाद किंवा कोणाविरुद्ध द्वेष निर्माण करण्याचा माझा हेतू नव्हता. याबद्दल मला खेद वाटते. मी सगळ्यांना एकत्र आणण्याच्या विचारानेच पोस्ट लिहिली होती. मात्र यापुढे मी जे काही पोस्ट करेन त्यामागील माझ्या शब्दांबद्दल मी अधिक जागरूक राहीन. माझ्या पोस्टमुळे अनेक हिंदू बंधू- भगिनींच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी त्यांची मनापासून माफी मागतो. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो.’

रविवारी, गायकाने लिहिले की, ‘ब्राह्मण’ हा शब्द ‘ब्रह्मा’ वरून आला आहे जो ‘अबराम’ वरून आला आहे आणि जो ‘अब्राहम’ किंवा ‘इब्राहिम’वरून आला, ज्यांना सर्व राष्ट्रांचे पिता मानले जाते. ब्राह्मण हे इब्राहिमचे वंशज असल्याचेही त्यांनी सांगितले. लकी अलींनी याआधी लिहिले होते की, ‘ब्राह्मण नावाची उत्पत्ती अबराम या नावावरून झाली आहे, जी अब्राहम किंवा इब्राहिमपासून आली आहे. ब्राह्मण हे इब्राहिमचे वंशज आहेत. अलैहिस्सलाम… सर्व राष्ट्रांचे पिता… मग प्रत्येकजण विनाकारण एकमेकांशी भांडण का करतो?

लकी अली बॉलिवूड अभिनेते मेहमूद यांचा मुलगा आहे. त्यांनी १९९६ मध्ये संगीत क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर त्यांनी ‘सूर’, ‘कांटे’ आणि ‘कसक’ या बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी गायली. सध्या लकी अली बॉलिवूडमध्ये फारसे सक्रिय दिसत नसले तरी देशभरात कॉन्सर्टच्या माध्यमातून ते प्रेक्षकांशी आपलं नातं जोडून आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.