गावजेवणातील वेगळी पंगत बंद करत अंनिसचा जातीभेदाला छेद

0 391

गावजेवणातील वेगळी पंगत बंद करत अंनिसचा जातीभेदाला छेद

 

 

नाशिक (सुनिल महाजन) : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ग्रामदेवता महादेवीच्या नावाने गावजेवणाची परंपरा सुरु आहे. परंतु त्यात विशिष्ट जातीतील लोकांना वेगळा स्वयंपाक करून त्यांच्या जेवणासाठी वेगळी पंगत बसण्याची ही परंपरा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून बंद झाली आहे.

महादेवी ट्रस्टकडून गावजेवणाचे आयोजन केले जाते. त्यात जवळपास दहा हजारापेक्षा जास्त लोक जेवण करतात. परंतू त्यात एका विशिष्ट समाजाच्या जेवणासाठी लागणारे अन्न हे लोकवर्गणीतून जमा झालेल्या एकाच रकमेतून खरेदी केलेल्या अन्नातून वेगळे शिजवून त्यांच्या जेवणाची वेगळी पंगत व इतर बहुजन समाजातील लोकांची वेगळी पंगत बसते अस महाराष्ट्र अंनिसच्या नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या कार्यकर्त्यांना हे गावजेवण रविवारी (दि. २३) होणार असल्याचे समजले होते. या गावजेवणात लोकांच्या इच्छेने पगंती बसत असतील तर त्याला विरोध न करता, ह्या जेवणाचा आनंद घेण्यासाठी येणारे सर्व गावकरी हे एकाच ठिकाणी शिजवलेल्या आणि एकाच पंगतीत वाटप होत असलेल्या अन्नाचा लाभ घेतील, ही भूमिका अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेऊन तसे निवेदन तहसिलदार, त्र्यंबकेश्वर व पोलीस निरीक्षक, त्र्यंबकेश्वर यांना एक दिवस अगोदर दिले.

गावजेवणाच्या पंगतीमध्ये झालेल्या भेदाबाबत मा. तहसिलदार व पोलिस अधिक्षक यांचे सोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. गावजेवणात एका विशिष्ट समाजासाठी वेगळ्या ठिकाणी अन्न शिजवणे व त्यांची वेगळी पंगत बसविणे ही अनिष्ट, अमानवीय, राज्य घटनेशी विसंगत असून सामाजिक विषमतेला बळ देणारी बाब आहे, हे तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांना तोंडी तसेच लेखी निवेदनातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, डॉ. सुदेश घोडेराव, अॅड. समीर शिंदे, संजय हरळे यांनी स्पष्ट केले.

गावजेवणाच्या वेगळ्या पंगती संदर्भात दिलेले निवेदन आणि झालेल्या चर्चेनंतर मा. तहसिलदारांनी संबंधित ट्रस्टींना बोलावून समज दिली. तसेच पोलीस प्रमुखांनीही कायद्याचे पालन करून एकोप्याने राहून सर्वांनी एकाच पंगतीत जेवणाचा आनंद घ्यावा, ह्या अंनिसच्या विचाराला पाठिंबा दिला. त्यानंतर ट्रस्टींनीही योग्य तो निर्णय घेत सर्वांनी एकाच पंगतीत जेवण घेण्यासाठी आवाहन केले. त्यामुळे परंपरागत चालत आलेली विशिष्ट समाजाची वेगळी पंगत बसण्याची ही प्रथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून व प्रशासनाच्या माध्यमातून संपुष्टात आली.

ही परंपरा संपुष्टात आणण्यासाठी पुढाकार जरी महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी घेतला तरी त्यासाठी मोलाचे कार्य हे तहसिलदार, पोलीस निरीक्षक यांचे असून महादेवी ट्रस्ट दाखवलेल्या मोठेपणाला आलेले हे यश आहे. यापुढे कुठेही माणसामाणसात भेदभाव केला जात असेल तर तो समाजातील शिकल्या सावरलेल्या नागरिकांनी पुढे येऊन थांबविण्याचा प्रयत्न केला पाहीजे अस आवाहन अंनिसच्या वतीने करण्यात आले.

या गावजेवणातील पंगतीत होणा-या भेदाविषयी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष संजय हराळे यांनी म्हटले की, गाणजेवणात पंक्तीभेद होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले होते. तशा प्रकारच्या तक्रारी स्थानिक भाविकांकडून प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हा शाखेला सोबत घेऊन प्रशासन व ट्रस्टींशी सुसंवाद केला. त्यातून हे परिवर्तन झाले आहे. अंनिस याचे स्वागत करते.

Leave A Reply

Your email address will not be published.