अरविंद चव्हाण, अर्जुन खोतकर माझ्या सुना आहेत – रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याने मतदारांमध्ये हास्यकल्लोळ

0 85

अरविंद चव्हाण, अर्जुन खोतकर माझ्या सुना आहेत
– रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याने मतदारांमध्ये हास्यकल्लोळ

जालना : मी चांगले काम केले म्हणून लोकांनी मला सभापती, आमदार, खासदार, मंत्री केले. पैसे आणणे माझे काम आहे, मी सासू आहे आणि अरविंद चव्हाण, अर्जुन खोतकर माझ्या सुना आहेत, असे रावसाहेब दानवे म्हणाल्याने एकच हश्या पिकला.

लोकसभा निवडणुकीत प्रचार शिगेला पोहचला आहे. काही जण जहरी टीका करत आहेत. आपल्या खुमासदार शैलीसाठी भाजप नेते रावसाहेब दानवे ओळखले जातात. त्यांनी जालन्यात केलेल्या भाषणामुळे प्रचाराला चांगलीच रंगत आली. मी जालन्याचा तर जालना माझे आहे. मी एका छोट्या गावाचा माणूस आहे. मी सरपंच असताना गावात लाईट आणली. मी चांगले काम केले म्हणून लोकांनी मला सभापती, आमदार, खासदार, मंत्री केले. पैसे आणणे माझे काम आहे, मी सासू आहे आणि अरविंद चव्हाण, अर्जुन खोतकर माझ्या सुना आहेत, असे सांगत त्यांनी एकच हश्या पिकवला. पुढच्या वेळेस मी आमदार होतो आणि अर्जुन राव यांना खासदार करतो. अर्जुन खोतकर माझी सून असले तरी जनता बाप आणि आजोबा आहे. मी केंद्रात बसलो याचे श्रेय जनतेला आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारच्या योजनांची जंत्रीच वाचून दाखवली. त्यांनी विरोधकांवर तुफान हल्लाबोल केला.
इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही
इंडिया आघाडी-महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. चेहरा नसलेली आघाडी मते मागत आहे, त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही. ममता दीदी म्हणाली मी पंतप्रधान, तर लालू हेल्यावर बसून आलेच समजा, असा चिमटा त्यांनी काढला. आघाडीचे सरकार चालत नाही. कुण्या एकाचे सरकार पाहिजे असा टोला त्यांनी इंडिया आघाडीला लगावला.
श्रीमंतीवर बोलू नका, उठ बशा काढेल
कल्याण काळे यांनी रस्ते विकासावर बोलावे. मी सहा हजार कोटी रस्त्यासाठी आणले, तुम्ही श्रीमंतीवर बोलू नका केंद्राने विविध योजनांसाठी निधी दिला. काँग्रेसने विकासावर बोलावे, असे आवाहन त्यांनी केले. मी खोटा ठरलो तर उठ बशा काढेल, असे ते म्हणाले.
………………………………………………..

Leave A Reply

Your email address will not be published.