बनबरे परिवाराने वृक्ष लागवड करून सुतक फेडले – एक दिशादर्शक विधी!

0 952

बनबरे परिवाराने वृक्ष लागवड करून सुतक फेडले –
एक दिशादर्शक विधी!

 

देगलूर : देशातील ख्यातनाम विचारवंत तथा संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते शिवश्री गंगाधर बनबरे यांच्या आई मुक्ताबाई गोविंदराव बनबरे यांचे सोमवार दि.३१ जुलै २०२३ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी दु:खद निधन झाले. आई मुक्ताबाई यांच्या मृत्यू पश्चात बुधवार दि. २ ऑगस्ट २०२३ रोजी तिसऱ्याच दिवशी राख व अस्थी गंगेत न टाकता स्वतःच्या शेतामध्ये टाकून त्यावर आंब्याची झाडे लावली. अनावश्यक विधींचे कर्मकांड टाळले. राख गंगेत न टाकता प्रदुषणही टाळले. राख व अस्थी स्वतःच्या शेतात टाकून त्यावर आठवण म्हणून वृक्षारोपण केले. सुतक तथा विटाळ तीन दिवसात फेडला.
हा अंत्यविधी पूर्णतः शिवधर्म पद्धतीने केला. मुलींनी व सुनांनी प्रेतास खांदा दिला. मुलीच्याच हस्ते अग्नीदाह देऊन अंत्यविधी करण्यात आला. शेतामध्येच आईची व जिजाऊंची प्रतिमा ठेवून पूजन करण्यात आले. यावेळी शिवमती सुवर्णाताई गंगाधर बनबरे यांनी शिवधर्म गाथेचे वाचन केले व जिजाऊ वंदनेने हे सुतक फेडले. यामुळे कर्मकांडावर होणारा अनावश्यक खर्च, कुटुंब व नातेवाईक यांचा वेळेचा होणारा अपव्यय, यामुळे कुटुंबाचे होणारे नुकसान बनबरे परिवाराने वाचवले. जगासमोर एक आदर्श पायंडा निर्माण करून दिला. मराठा सेवासंघाच्या माध्यमातून पुरोगामी व आधुनिक विचारांचा वारसा बनबरे परिवाराने जोपासला.
यावेळी परभणीवरून बनबरे परिवाराला भेटायला आलेले आधुनिक स्मशानभूमीचे उद्गाते, झरी येथील क्रांतीकारी सार्वजनिक स्मशानभूमीचे जनक तथा कृषी भूषण कांतरावकाका देशमुख झरीकर यांची विशेष उपस्थिती लाभली. सोबतच परभणीचे शिक्षणाधिकारी तथा मराठा सेवा संघ परभणी जिल्हाध्यक्ष प्रा. विठ्ठल भुसारे सर, देऊळगाव येथील स्मशानभूमीचे जनक गोविंदराव दुधाटे, मराठा सेवा संघ परभणी जिल्ह्याचे कोषाध्यक्ष शिवश्री सुधाकरराव जाधव, संभाजी ब्रिगेड परभणी जिल्हा सचिव साहेब शिंदे आदींसह बनबरे परिवारातील गोविंदराव गुंडेराव बनबरे, मुलगा गंगाधर बनबरे, प्रल्हाद बनबरे व कन्या अनिताताई रणजीत हिंगोले, स्नुषा सुवर्णाताई गंगाधर बनबरे व उज्वलाताई प्रल्हादराव बनबरे आदींसह निऋती, ईशानी, विरोचन, निरजा, आदित्य व सई या नातवंडांसहीत नातेवाईक व मित्र मंडळी उपस्थित होती.
भारतीय समाजव्यवस्थेत माणसाच्या आयुष्यात जन्मापासून मृत्युपर्यंत अनेक नाहक कर्मकांड चिकटलेले आहे. त्यामुळेच देशाच्या प्रगतीला खीळ बसली आहे. अनेक लोकांना स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही हक्काचे घर नाही. परंतु शोषण करणारे कर्मकांड मात्र कायम चिकटलेले आहे. दशक्रिया विधी व तेरवी सारख्या विधींमुळे अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. स्वतःला सावरत देशाला सावरण्यासाठी अशाच पुरोगामी विचारांची गरज आहे. हाच आदर्श विचार आणि वारसा बनबरे परिवाराने प्रत्यक्षात समाजासमोर ठेवला आहे. मुक्ताबाई गोविंदराव बनबरे यांच्या स्मृतीस आणि बणबरे परिवाराच्या क्रांतिकारी कार्यास विनम्र अभिवादन….!

Leave A Reply

Your email address will not be published.