बंजारा बांधवानो ज्योतिष्य (पंचाग) पाहू नका ?

संत सेवालाल महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महानायक वसंतराव नाईकसाहेब यांनी कधीही भविष्य पाहिले नाही. तरी ते यशस्वी झाले. तर आपण का होणार नाही ? माणसाच्या मनगटात ताकत असेल तर माणूस सर्वकाही प्राप्ती करून जीवन यशस्वी करू शकतो? शेवटी बाढं- भविष्य-पंचाग हे थोतांडच म्हणावे लागेल!

0 309

बंजारा बांधवानो ज्योतिष्य (पंचाग) पाहू नका ?

 

✍️याडीकार पंजाबराव चव्हाण

पुसद-9421774372

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

बंजारा समाजात ब्राह्मण जातीप्रमाणे पत्रिकेचे खुळ वाढलेले दिसते. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्वच विधी ज्योतिष्य (बाढ..भविष्य… पंचाग) पाहिल्याशिवाय सध्या तरी होत नाही. लग्न जुळवण्यासाठी जवळजवळ 90% लग्न कुंडली जमवुनच केली जातात. तरीही घटस्फोटाचे प्रमाण, गृहकलाचे प्रमाण बंजारा समाजात वाढताना दिसते. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. लग्न पत्रिका जुळवूनही वेळेवर लग्न न लावता नाच गाण्यातच वेळ घालणारे महाभागही अनेक आहेत. जर लग्नच वेळेवर लागत नसेल तर पत्रिका कशाला जुळवून घ्यायची? हे काही लोकांच्या लक्षात येत नाही. जर ज्योतिषाकडे विवाह कुंडली बघून लग्न झालेले असतील तर अपयशयाची कायदेशीर जबाबदारी ज्योतिषांनी स्वीकाराला काय हरकत आहे? अशा ज्योतिष्यांवर फसवणुकीच्या कायद्याखाली फौजदारी करावी. आर्थिक नुकसानीसाठी दिवाणी दावे करावेत. जर ज्योतिषी स्वतःला व्यवसायिक समजत असतील तर ग्राहक मंचात त्यांच्याविरुद्ध तक्रारी कराव्यात. अपयशाची जबाबदारी ज्योतिषांनी स्वीकारलीच पाहिजे .अन्यथा त्यांनी व्यवसायाच्या व अपेक्षाच्या मर्यादा स्पष्टपणे सांगाव्यात .यापुढे ज्योतिषाचा सल्ला घेणाऱ्यांनी लिखित स्वरूपात घ्यावा. व दिलेल्या पैशाची पावती घ्यावी. म्हणजे त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे सोपे पडेल. कुंडली जमत नाही. म्हणून मुलीचे लग्न वेळेवर होत नाही. चांगली स्थळे हातची जातात. माझ्या एका मित्राची मुलगी एमबीबीएस एमडी होती. मुलगा सुद्धा एमबीबीएस एमडी होता. पण त्यांची कुंडली जुळत नाही. असा मुलीच्या बापाचा आग्रह असल्यामुळे शेवटी लग्न जमले नाही. मी म्हणालो अरे ज्योतिष्यच पाहून तुला लग्न करायचे होते. तर मुलीला एमबीबीएस चे शिक्षण कशाला शिकवले?. पण मुलीचा बाप पक्का शिकून अनाडी . काही तर अशी मंडळी आहे की, कोर्टासमोर किंवा तहसील कार्यासमोर पोत्यावर बसलेल्या ज्योतिषेकडे पाच दहा रुपये देऊन भविष्य विचारतात. व तो सुद्धा ज्योतिष्य सांगतो की, सध्या तुमच्या पाठीमागे ग्रहदशा आहे. अमुक तमुक करा तुम्हाला गाडी, बंगला सर्वकाही मिळेल. अरे माझ्या अडाणी बांधवा तुला गाडी बंगला मिळेल म्हणून ज्योतिष्य तुझे भविष्य पाहून सांगतो तर ज्योतिषांना स्वतःचे भविष्य का समजत नसावे. कारण तो तर पोत्याच्या बसलेला आहे. यावरून आपल्या डोक्याची कीव आल्याशिवाय राहत नाही. ऑक्टोबर 2011 मधील अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रामध्ये एक हकीगत प्रसिद्ध झाली होती. एका राज्य ज्योतिषाने आपल्या नात्यातील मुलाची पत्रिका पाहून व त्याचे उज्वल भविष्य पाहून स्वतःच्या मुलीचा विवाह त्या मुलाशी ठरवला. विवाह विरचित तर झालाच पुढे नवरा मुलगा मानसिक रुग्ण झाला. व या सर्व प्रकाराने खचून जाऊन ज्योतिषाच्या मुलीने आत्महत्या केली. ज्याला स्वतःच्या मुलीचे भविष्य नीट कळत नाही. ते दुसऱ्याच्या भविष्य काय घडवणार ? दुसरे एक उदाहरण महाराष्ट्रातील एक नामवंत भविष्यकाराने एक दैनिक सुरू केले उण्यापुऱ्या एका वर्षाच्या आतच ते बंद झाले. यावर वृत्तपत्र सृष्टीत एक विनोद सांगितला जातो की, या भविष्यकाराने वृत्तपत्र सुरू करण्याच्या मूहुर्त नीट बघितला नव्हता काय? श्री अशोक कुलकर्णी हे ब्राह्मण सेवासंघाचे कार्यकर्ते असूनही ज्योतिषी सामाजिक गुन्हेगार या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र ऑक्टोबर २०११ च्या अंकात ज्योतिष्यीशास्त्राची चिकित्सा केलेली आहे. त्यातील काही भाग जरी या लेखात आला तरी उर्वरित विवेचन हे वाचनिय आहे. त्याबद्दल त्यांचे आभार!
सामान्य माणसाची मानसिक दुर्बलता हेच ज्योतिषाचा मूळ आधार आहे. दुसरा आधार माणसाच्या आयुष्यातील अनिश्चितता व लवकर श्रीमंत होण्याची वृत्ती. एकाच वर्गात शिकलेले दोन विद्यार्थी अधिकारी होतील असा नेम नसतो. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मतिथी वेळेनुसार एकूण १४ बालके जन्मली. सर्वांचे स्थळ, काळ, वेळ एक असूनही पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान झाले. तर काही रिक्षेवाले कारकून झाले. त्यामुळे जन्म कुंडलीच्या माणसाला काही उपयोग नाही. आजही बंजारा समाजातील बडे अधिकारी, नेतागण भविष्याच्या नादी लागलेले पाहून इंटरनेट युगात बंजारा समाजाची काय अवस्था आहे. हे दिसल्या वाचून राहत नाही. याबाबतीत छत्रपती शाहू महाराज यांची एक आठवण या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. छत्रपती शाहू महाराज जेव्हा शिकारीला निघाले होते. त्यावेळेस काही ज्योतिष्य पाहणारी मंडळी त्यांच्यासमोर येऊन महाराज आज आपल्याला अपघात होईल. तरी आपण शिकारीला जाऊ नये असे आवर्जून सांगू लागली. छत्रपती शाहू महाराजांचा कर्मकांड, ज्योतिष्य यावर विश्वास नव्हता. त्यांनी प्रधानाला लगेच आदेश देऊन या सर्व ज्योतिषांना वाड्यात डांबून ठेवा. मी परत येईपर्यंत यांना जेवण अथवा पाणी सुद्धा देऊ नका. असे सांगितले प्रधानांनी आदेशाप्रमाणे काम केले. महाराज दुसऱ्या दिवशी दरबारात येऊन प्रधानाला सांगितले त्या काल भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाला घेऊन या आणि ज्योतिषी समोर येताच त्यांना महाराज म्हणाले तुम्हाला तुमचे भविष्य कळलं असतं तर तुम्हाला रात्रभर उपाशी राहण्याची पाळी आली नसती. या घटनेवरून आपण बोध घ्यायला पाहिजे. अनेक राजकीय नेते, कलाकार, ज्योतिष-भविष्य पाहिल्याशिवाय कोणतेही काम आरंभ करत नाही. परंतु बंजारा समाजाचे नेते माजी अन्न व औषधी प्रशासन मंत्री मा. मनोहरभाऊ नाईक हे कधीही ज्योतिष-भविष्य पाहत नाही. स्वतःच्या भूमिकेवर व कर्तृत्वावर इतके ठाम आहेत की, ते निवडणुकीचा फॉर्म भरताना मुहूर्त सुद्धा पाहत नाही. परंतु बहुमताने निवडून येतात अर्थात अशी कणखर मनाची माणसे बंजारा समाजात फार दुर्मिळ आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय माणूस सर्व क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हावा. यशस्वी व्हावा म्हणून आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले. १९३३ मध्ये मुंबईला देवी देवता किंवा भविष्य पाहून तुमचा उद्धार होणार नाही. तर तुमचा उद्धार तुम्हीच कराल असा संदेश देताच शिक्षण घेणाऱ्यांनी शिक्षण घेतले व यशस्वी झाले व जे कर्मकांड ,भविष्य ,भूत-खेत,धागा-दोरी,नवस-हवस, उपास -तपास यामागे लागले ते अयशस्वी झाले. खरोखरच बंजारा समाजाला आज मार्गदर्शन करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे वैद्यकीय शास्त्रात डॉक्टर शस्त्रक्रियेपूर्वी किंवा उपचारापूर्वी यशस्वीतेची टक्केवारी सांगतात. व अपयशाची जबाबदारी विशद करतात. त्यात त्याला शरीराची स्वाभाविक रचना ,पेशंटच्या शरीराचा स्वभाव,( नेचर ऑफ बॉडी) व उपचाराला दाद देण्याची शरीराची पद्धती ( रिस्पॉन्स) व रोग्याची मानसिकता यावर वैद्यकीय उपचाराची फलनिष्पत्ती अवलंबून आहे. असे स्पष्टपणे सांगतात यामुळे वैद्यकीय शास्त्राच्या मर्यादा स्पष्ट होतात. व या शास्त्रावरील विश्वास वाढतो. वैद्यकीय शास्त्र दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय व लोकोपयोगी होण्यामागे त्या शास्त्राचा स्पष्टपणा व पारदर्शकता कारणीभूत आहे. ही पद्धती ज्योतिषांनी स्वीकारावयास काय हरकत आहे?. जीवनात यश व अपयश येतच राहतात. हे सर्व पचविण्यासाठी माणसाला सशक्त मानसिकतेची गरज आहे. परिस्थितीशी जुळवून घेण्याची मानसिक ताकद प्रगतीसाठी झटण्याची जिद्द, सुदृढ कुटुंब व्यवस्था, एकमेकाला आधार देणारी कुटुंबातील व्यक्ती व त्यांच्यावर झालेले चांगले संस्कार असणारी कुटुंब ,प्रसंगावर मात करू शकतात. सातासमुद्रापलीकडून शिडाच्या जहाजातून आलेला इंग्रज खंडप्राय भारत देशावर राज्य करू शकतो. तर ज्योतिषाचा ताफा बाळगणारे पेशवे अयशस्वी ठरतात.? पेशवाई सुद्धा पहिले बाजीराव हे रांगडे शिपाईगडी होते. कच्च्या मक्याची कणसे व हिरव्या मिरच्या तोंडी लावून त्यांनी मोहिमा पत्ते केल्या .तत्कालीन पुण्यातील ब्राह्मण वर्गाने त्यांच्यावर अब्राह्मणांचा आरोप करून बहिष्कार टाकला. ते पहिले बाजीराव पेशवे सर्वच युद्धात व राजनीतीत यशस्वी ठरले. या उलट नंतरच्या काळात कर्मकांडात व ब्राह्मणतत्वाच्या आहारी गेलेले पेशवे पूर्णपणे अपयशी ठरले. मुला मुलीची लग्नपत्रिका जुळत नसेल तर त्याला हजार रुपये घेऊन मॅच करणारी मंडळी भरपूर आहेत. कुंडलीतला मंगळ अथवा राहू, केतू हे ग्रह हा बसल्या जागी ज्योतिषी फिरवतो. यावरून कल्पना करा की, त्यामध्ये किती ताकद आहे .हे जर आपल्याला समजत नसेल तर आपले दुर्दैवच म्हणावे लागेल. कुंडली ऐवजी वधू-वरांची वैद्यकीय तपासणी आवश्यक करावी. विशेषता एच.आय.व्ही. टेस्ट करणे अगत्याचे आहे. त्याचबरोबर ब्लड ग्रुप, हिमोग्लिनचे प्रमाण इत्यादी आवश्यक तपासण्या करूनच विवाह ठरवावेत. ज्योतिषशास्त्र ही भारतातील उत्कृष्ट कालमापन पद्धती आहे.(Astromy, Astrophysics & Almac) जगातील सर्व कालमापन पद्धती व दिशाशास्त्र हे भारतीय ज्योतिष्यशास्त्रावर आधारित आहे. एवढेच नव्हे तर पाश्चात्य राष्ट्रात वापरले जाणारे ग्रेगरियन पंचांग (Solar) ही कालमापन पद्धती सुद्धा भारतीय ज्योतिष्यविद्येवर आधारित आहे. लोकमान्य टिळक हे ज्योतिष्य शास्त्राचे अत्यंत तज्ञ होते. त्यांनी ज्योतिषशास्त्र विषयक अनेक पुस्तके लिहिली व संशोधन केले.तथापि त्यात एक वाक्यही फलज्योतिषावर लिहिलेले नाही. फलज्योतिष्यही कोणातरी पोटार्थी अथवा धूर्त व्यक्तीने शोधून काढलेली कला आहे. याला शास्त्राचा आधार नाही. यामागे पोट भरण्याची किंवा राजकीय महत्त्व वाढविण्याची कला आहे ज्यावेळेस प्लेग, कॉलरा, देवी यासारख्या रोगांच्या साथीत लाखो लोक मरत त्यावेळेस ज्योतिषशास्त्र काय करत होते? दुष्काळ, महापूर ,भूकंप या दुर्घटनेला कुठली ग्रहदशा म्हणायची? अशा आपत्तीत लाखोंनी माणसे मरतात मरणाऱ्यात बाराही राशीची माणसे असतात. मग सगळ्याच कुंडल्यासारख्या असतात का? अनेक राशीच्या व्यक्तीच्या एकत्रित मरण्याला फलज्योतिष काय उत्तर देऊ शकेल? कुठलाही राष्ट्रीय, नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्ती ज्योतिष्य टाळू शकले नाही. ज्या देशात ज्योतिष्य पाहिले जात नाही. त्या राष्ट्रात भारताच्या तुलनेत अत्यंतिक प्रगती झालेली आहे. केप आँफ गुड होप्सला वळसा घालून शिडाच्या नावातून भारत खंडावर राज्य करणारे इंग्रज कुठलेही पंचाग घेऊन पाहून निघाले नव्हते. अथवा अमेरिकेचा शोध लावणारा कोलंबस याने कुठल्याही शुभमुहूर्ताचा आधार घेतला नव्हता. याउलट पाणीपतच्या लढाईवर पंचांगाची गाठोडी घेऊन पेशव्यांच्या सैन्याबरोबर युद्धावर गेलेले ज्योतिष्यविषयक मार्गदर्शन करण्यासाठी गेलेले ज्योतिष्य एक तर स्वतःचा जीव गमावून बसले, त्याचबरोबर त्यांच्या बायका मुले कंदहाराच्या बाजारात गुलाम म्हणून विकल्या गेले. पानिपतच्या पराभवा पाठीमागे धार्मिक भावनांचा अतिरेक व ज्योतिषाचा अनावश्यक प्रभाव युद्धनीतीवर व युद्ध शास्त्रावर झाला ही सुद्धा कारणे आहेत. कुठल्याही परिस्थितीत फलज्योतिष्य हे थोतांड असून ते कुठल्याही दृष्टीने कुटुंबाच्या व्यवस्थेत व राष्ट्र उभारणीस उपयोगी नाही. केवळ व्यक्ती- व्यक्ती मधील द्धेष भावना, असंतोष व कमकुवत मानसिकता याचा फायदा फल ज्योतिष्य लोकांनी घेतलेला आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने मानसिक व बौद्धिक क्षमता, विज्ञानावरील निष्ठा वाढविल्यास व चिकित्सक बुद्धी ठेवून मनोदुर्बलता कमी केल्यास ज्योतिषाच्या आधाराची गरज नाही. सामाजिक जीवनात बंधुनो आपल्या जेवढ्या अडचणी आहेत. तेवढ्याच अडचणी कौटुंबिक जीवनात ज्योतिषाला आहेत. जर असे असेल तर त्यांच्याकडे स्वतःचा प्रश्न घेऊन जाणारा काय उपाययोजना करून त्यातून मुक्ती मिळवणार हेच कळत नाही. मी ज्योतिषी असल्यामुळे माझ्याकडे ग्रहाचा कोप होत नाही, परिणाम भोगावे लागत नाही, मी स्वतःला व कुटुंबीयांना ग्रहदशांपासून दूर ठेवतो. असे सांगणारा एकही ज्योतिषी भेटत नाही. याकरिता आपण ज्योतिष्यापासून चार हात दूर राहिले पाहिजे. आपल्या बुद्धीचा विकास करावयाचा असेल तर मुलनिवासी नायक व अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र आपण नियमित वाचले पाहिजे देशोन्नतीच्या संशोधित शब्द आनआयडेंन्टीफाइड बाबांचा हा एक वेगळा प्रकार आहे. व्यवसाय व्यापारात मंदी आली अथवा एखाद्याच वणवण फिरूनही नोकरी लागत नाही, लग्न जुळत नाही, अपत्य प्राप्ती होत नाही, अथवा झाल्यास ते दगावणे, वारंवार आजारी पडणे आदी प्रकार घडत असल्यास असे अरिष्ट निवारण्याचा दावा करणाऱ्या ज्योतिषामध्ये सर्वसाधारण फलज्योतिषांचा समावेश होतो. अशा अरिष्ट निवारणासाठी हे बाबा काळसर्प योग नावाची इडा (वक्री मंगळसारखा प्रकार ) राशीस्थानी असल्याचा बनाव करतात. हा काळसर्प योग नष्ट करायचा असेल तर नाशिक येथे अमुक अमुक महाराजाकडे जा तो महापूजा करून काढावा लागतो .असा सल्ला ते देतात. ज्यांच्या राशीस्थानि कथित काळसर्प योग आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी दहा ते वीस हजार एवढे तगडे शुल्क आकारले जाते. यावरून वाचण्यात आलेली एक घटना आठवते.. एका व्यापाऱ्याला धंद्यात तेजी-मंदी सुरू राहते. त्यामुळे तो हैराण होतो. व ज्योतिषाकडे जातो ज्योतिषी त्याला काळसर्प पूजा करण्यास सांगतात. तो काळर्सप पुजासाठी वीस ते तीस हजार खर्च केल्यावर काही फरक पडत नाही. शेवटी पुन्हा ज्योतिषाकडे जातो. पुन्हा पुजा मध्ये कमतरता राहिली म्हणून दुसरी पूजा करून घेतात आणि तीस हजार रुपये उकळल्या जाते. तरीही काहीही फरक पडत नाही. शेवटी हताश होऊन तो व्यापारी ज्योतिषाकडे येतो. ज्योतिषी त्याला नागमणी बाबत माहिती देतो. व आंध्रप्रदेशच्या पत्ता देतो. त्यानुसार व्यापारी व त्याचा मुलगा जाऊन नागमणी घेऊन येतात. तरीही काहीही फरक पडत नाही. शेवटी नागमणी नकली निघतो. तो व्यापारी ज्योतिषाकडे जातो. त्याबाबत विचारणा करतो तर त्याला सरळ आंध्रप्रदेशच्या दलाला भेट म्हणून सांगतो .त्याला फोन केला तर तो जीवे मारण्याची धमकी देतो. जेव्हा व्यापाराच्या लक्षात आपण फसवल्याचे येते तेव्हा कपाळावर हात मारून बसल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून बंजारा बांधवांनो संत सेवालाल महाराजांच्या संदेश जाणंजो… छाणंजो..पचचं..माणंजो यावर चिकित्सक बुद्धीने विचार करून स्वतःच्या सामर्थ्यावर व कर्तृत्वावर विश्वास ठेवा. महात्मा फुले यांचे तृतीय रत्न नाटक व सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक जरूर वाचले पाहिजे. संत सेवालाल महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महानायक वसंतराव नाईकसाहेब यांनी कधीही भविष्य पाहिले नाही. तरी ते यशस्वी झाले. तर आपण का होणार नाही ? माणसाच्या मनगटात ताकत असेल तर माणूस सर्वकाही प्राप्ती करून जीवन यशस्वी करू शकतो?
शेवटी बाढं- भविष्य-पंचाग हे थोतांडच म्हणावे लागेल!

जय…गोर….जय…संविधान!

Leave A Reply

Your email address will not be published.