पाण्यावर तरंगणा-या भोंदू बाबाचा अंनिसकडून पर्दाफाश

संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचा अभ्यास केल्याने सिद्धी प्राप्त झाल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र त्यांचा हा दावा फोल ठरवत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केला आहे.

0 324

पाण्यावर तरंगणा-या भोंदू बाबाचा अंनिसकडून पर्दाफाश

Hingoli News : मागील अनेक दिवसांपासून हिंगोली तालुक्यातील पाण्यावर तरंगणारे बाबा चांगलेच चर्चेत आले होते. भागवताचार्य हरिभाऊ राठोड यांच्या या व्हायरल व्हिडिओची सर्वत्र रंगली होती. संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचा अभ्यास केल्याने सिद्धी प्राप्त झाल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र त्यांचा हा दावा फोल ठरवत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सिद्धी प्राप्त झाल्याचा दावा करत तासंतास पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाचा हिंगोलीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन सकाळीच पाण्यावर तरंगणारा बाबा राहत असलेल्या धोत्रा गावामध्ये पोहोचले.
या बाबासोबत चर्चा केल्यानंतर अनिस कार्यकर्ते व पोलीस अधिकाऱ्यांनी धोत्रा शिवारातील विहीर गाठली आणि या विहिरीमध्ये सिद्धी प्राप्त झाल्याचा दावा करणारे हरी महाराज आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी प्रकाश मगरे या दोघांनीही विहिरीत उड्या टाकल्या.
विहिरीमध्ये महाराजांप्रमाणेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी देखील पाण्यावर तरंगत असल्याचे स्पष्ट झाले. मात्र नेहमीचा सराव नसल्याने या बाबासारखे जास्त वेळ ते पाण्यावर तरंगू शकले नाहीत, यानंतर पाण्यावर तरंगणाऱ्या या बाबाने सिद्धी प्राप्त झाल्याच्या दाव्यावरून घुमजाव केले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी देखील हा चमत्कार नसून सराव केल्याने कुणालाही होता येत असल्याचे यावेळी सांगितले आहे, त्यामुळे या बाबांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधिकारी व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.