पीक विमा अर्जासाठी पैसे मागणा-या सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकांविरोधात तक्रार करा : कृषी आयुक्त सुनील चव्हाण

0 210

पीक विमा अर्जासाठी पैसे मागणा-या सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकांविरोधात तक्रार करा : कृषी आयुक्त सुनील चव्हाण

 

बीड : प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी यावर्षीचा खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना केवळ १ रूपया भरावा लागत असला तरी मात्र तो विमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारक शेतकऱ्यांकडून १०० ते १५० रुपये घेऊन त्यांची लुट करत आहेत. यामुळे नाकापेक्षा मोती जड अशी भावना शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत. परंतू जे सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारक पैशाची मागणी करतील त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करता येणार आहे.

खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ हंगामाकरिता ३ वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतक-यांना केवळ १/- रुपया भरून विमा अर्ज भरला लागणार आहे. हा विमा अर्ज भरताना सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकांनी तो मोफत भरायचा आहे. मात्र हे केंद्रधारक शेतकऱ्यांची लुट करताना दिसत आहेत.

कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा यांनी काढलेल्या ०५ जुलै, २०२३ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकानूसार  प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ हंगामाकरिता ३ वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सन २०२३-२४ पासून “सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतक-यांना केवळ १/- रुपया भरून PMFBY पोर्टल https://pmfby.gov.in वर स्वतः शेतकरी यांना तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्र (CSC) यांचे मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल. पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रु.४०/- देण्यात येते. परंतु राज्यातील काही सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकाकडून शेतक-यांकडून अतिरीक्त पैसे घेण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

त्या अनुषंगाने सर्व शेतक-यांस आवाहन करण्यात येते की, सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकाकडून केवळ रु.१/- रुपया भरुन पीक योजनेत सहभागाची नोंदणी करावी व CSC ने अतिरीक्त रक्कमेची मागणी केल्यास आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार / तालुका कृषि अधिकारी, जिल्हाधिकारी / जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.