मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात – सुरक्षा प्रदान करण्याचा राज्य सरकारकडून निर्णय

0 21
मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात
– सुरक्षा प्रदान करण्याचा राज्य सरकारकडून निर्णय
जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी आता पोलीस तैनात असणार आहे. जरांगे यांना सरकारी सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार शुक्रवार रोजी जरांगे यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी २४ तास दोन सशस्त्र  पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. हा निर्णय राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशाने घेण्यात आला आहे. याआधी सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांकडे मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी दोन कॉन्स्टेबल नेमण्यात आले आहेत.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात २९ आॅगस्ट रोजी आमरण उपोषण सुरु केले होते. या उपोषणस्थळी पोलिसांची लाठीचार्ज झाला आणि त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटू लागले. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली. मात्र दुसरीकडे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांनी विरोध केला. ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध नाही. मात्र, ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र नाही, अशांना कुणबी प्रमाणपत्र आरक्षण देऊ नये असा आक्रमक पवित्रा संघटनांनी घेतला आहे.
अध्यादेशाविरुध्द चंद्रपुरात मोर्चा
राज्यसरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाला चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी कडाडून विरोध केलाय. विशेष म्हणजे या अध्यादेशाविरुध्द ७ तारखेला चंद्रपुरात ओबीसी, एसबीसी आणि व्हीजे-एनटी यांचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात आमदार धानोरकर यांचा देखील सक्रीय सहभाग असणार आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.