लग्न समारंभातील विकृत प्रथा बंद करून अनावश्यक खर्च टाळा मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांचे आवाहन

0 76

लग्न समारंभातील विकृत प्रथा बंद करून अनावश्यक खर्च टाळा मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांचे आवाहन

 

चिखली : अलीकडील काळात लग्नावर पैशांची प्रचंड उधळपट्टी होते. लग्न वेळेवर लागत नाही, यासह मरणदारीसुद्धा अनेक वाईट प्रथा रूढ होताहेत. लग्न समारंभातील विकृत प्रथा थांबविण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले आहे. तथापि यातून बहुजन समाजाने बाहेर पडावे, असे आवाहन करतानाच काही मार्गदर्शक सूचनादेखील त्यांनी केल्या आहेत.

मराठा बहुजन समाजामधील लग्न कार्यातील अनेक विकृत बाबींवर चिंता व्यक्त केली. लग्न समारंभ दिवसेंदिवस अतिशय खर्चिक होत चाललेले आहेत. यामध्ये समाजाचे तसेच कौटुंबिक, सांस्कृतिक, सामाजिक, अध:पतनसुद्धा होत असल्याचे मत त्यांनी नोंदविले आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी बहुजन समाजासाठी विविध मार्गदर्शक विचारदेखील दिला आहे. सोबतच काय करायला हवे, काय नको, याबाबत एक नियमावलीदेखील प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने लग्न समारंभात अवास्तव उधळपट्टी थांबवा, असे स्पष्ट केले आहे. डीजेमुळे हृदय रुग्ण, ध्वनी प्रदूषण होते. सोबतच वरातीत अगदी मुलेसुद्धा दारू पिऊन नाचायला लागलेली आहेत, ही विकृती वेळीच थांबवायला हवी, म्हणून लग्न समारंभात दारू व डीजेमुक्त लग्न संकल्पना राबविण्याबाबत त्यांनी सूचित केले.

ग्रामसभेत ठराव घ्या!१ मेला सर्व गावांमध्ये ग्रामसभा होणार आहेत. या ग्रामसभेमध्ये किमान डीजेमुक्त लग्न, दारूमुक्त वरात व वेळेवर लग्न हे तीन ठराव घ्यावेत, समाजातील सर्व विचारवंतांनी, विविध पक्षांतील कार्यकर्ते, नेत्यांनी यासाठी पुढाकार घेतल्यास परिवर्तनाला केवळ सुरुवातच नाही, तर वेगही मिळेल. पक्षीय राजकारणाचा विचार न करता या पुरोगामी विचार धारेला, परिवर्तनाच्या चळवळीला आपापल्या परीने सहकार्य करावे, असे आवाहन खेडेकर यांनी केले.

कुणबी, मराठा, देशमुख, पाटील, राजपूत यांच्या नातेसंबंध जुळावेत, हलके भारी हा भेदभाव टाळावा, आंतरधर्मीय, आंतरजातीय व आंतरराष्ट्रीय प्रेम विवाहांचा स्वीकार करावा, अंधश्रद्धा टाळावी, लग्न वेळेवर लावावेत, अनाठायी खर्च टाळावा, हुंडा टाळावा, प्री-वेडिंग, असे प्रकार टाळावे, या व इतर ३८ सूचना मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी समाजाला केल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.